ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकामुळे लाव्हाशंकूच्या मुखाशी खोलगट बशीसारखा खळगा दिसतो. हा खळगा साधारणपणे एक किमी. पेक्षा मोठ्या व्यासाचा असल्यास त्याला ज्वालामुखी महाकुंड म्हणून ओळखले जाते. ज्वालामुखी महाकुंडाला कटाह आणि काहील या नावांनीही ओळखले जाते. तोच खळगा साधारण एक किमी. पेक्षा कमी व्यासाचा असेल, तर त्याला ज्वालामुखी कुंड म्हणून संबोधले जाते. ज्वालामुखी महाकुंड हे ज्वालामुखी कुंडाचे विस्तारित रूप आहे. महाकुंडे सामान्यपणे खडकांच्या उभ्या कड्यांनी वेढलेली आढळतात. ज्वालामुखी महाकुंड हा पृथ्वीवरील एक अत्यंत वैशिष्यपूर्ण भूविशेष आहे. लाव्हाशंकू आतील रिकाम्या शिलारस कोठीत कोसळल्यामुळे आणि स्फोटक ज्वालामुखी उद्रेकामुळे अशा दोन भिन्न पद्धतीने महाकुंड निर्माण होते.

महाकुंड हे ज्वालामुखी स्फोटामुळे लाव्हाशंकूचा माथा किंवा शंकूंचे समूह उडून जाण्यापेक्षा खालचा आधार निघून गेल्यामुळे आत कोसळून तयार झालेले असते. अत्यंत तीव्र स्फोटक उद्रेकानंतर अनेक ज्वालामुखींच्या मुखाशी प्रचंड महाकुंडे निर्माण झालेली दिसतात. प्रथमदर्शनी शंकूमाथ्याचा भाग स्फोटामुळे उडून गेल्यामुळेच त्यांची निर्मिती झाली असावी, असे वाटते. किंबहुना, त्यामुळेच महाकुंड निर्माण होत असल्याचे पूर्वी मानले जाई; परंतु संशोधना अंती असे आढळून आले की, जर माथ्याचा भाग उडून गेला असल्यास आजूबाजूला विखरून पडलेल्या अग्निदलिक पदार्थांच्या राशीत माथ्याच्या खडकांचे तुकडे सापडायला हवेत; मात्र तसे आढळत नाही. याचा अर्थ ज्वालामुखी स्फोटामुळे लाव्हाशंकूचा माथा उडून जाऊन महाकुंड निर्माण होत नाही, तर स्फोटामुळे ज्वालामुखीच्या नळीतील सर्व लाव्हा उडून गेल्यामुळे नळीत किंवा अंतर्गत भागातील शिलारसाच्या कोठीत पोकळी निर्माण होते. त्यामुळे छ्ताचा आधार नाहीसा होऊन त्याच्यावरील खडकाचे संपूर्ण अधांतरित छत त्या पोकळीत कोसळते. त्यामुळे तेथे महाकुंड बनत असावे, असे अनुमान निघते. परिणामत: तेथील मूळ शंकूचे किंवा शंकूंचे अस्तित्व संपुष्टात येते. काही वेळेस नळीतील लाव्हा खालून दुसऱ्या एखाद्या मार्गाने निघून गेला म्हणजे माथ्याच्या आतल्या बाजूचा आधार जाऊन माथा आत कोसळतो.

सिलिका-समृद्ध वितळलेला आणि विपुल वायूंनी युक्त शिलारस भूगर्भात खोलवर असलेल्या शिलारस कोठीतून वरच्या दिशेने सरकतो. सिलिकाने समृद्ध शिलारस काहीसा घट्ट असतो. ज्यामुळे त्यात जास्त दाबाखाली वायूचे बुडबुडे निर्माण होतात. जेव्हा ते बुडबुडे भूपृष्ठालगत येतात, तेव्हा दाब कमी झाल्यामुळे प्रसरण पावून शिलारसातून वेगाने वर उसळी मारतात आणि फुटतात, तेव्हा प्रचंड स्फोट होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खडक फोडला जाऊन तेथे महाकुंड तयार होते. यातील काही स्फोटांमध्ये कित्येक घन किलोमीटर लाव्हारस आणि खडक बाहेर पडतात.

सर्वांत मोठी महाकुंडे मिश्र प्रकारच्या ज्वालामुखीची असतात. त्यामानाने ढाल प्रकारच्या ज्वालामुखींची महाकुंडे लहान असतात. हवाई बेटावरील कीलाउआ ज्वालामुखी महाकुंडाची लांबी सुमारे ५ किमी., रुंदी ३.२ किमी., खोली १५२ मीटर, परिघ १२.६३ किमी. आणि क्षेत्रफळ १०.७ चौ. किमी. आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ऑरेगन राज्यातील मझामा ज्वालामुखीवरील महाकुंडात प्रख्यात क्रेटर सरोवर निर्माण झाले आहे. या सरोवराची म्हणजेच महाकुंडाची लांबी ९.७ किमी., रुंदी ८ किमी., व्यास १० किमी., परिघ ४२ किमी., क्षेत्रफळ ५२ चौ. किमी. आणि खोली ५९२ मीटर आहे. अ. सं. सं. पैकी अलास्का राज्यातील अल्यूशन पर्वतरांगेत अ‍ॅनीअ‍ॅचॅक हे महाकुंड आहे. सुमारे ३,४०० वर्षांपूर्वी झालेल्या महाउद्रेकाने हे महाकुंड निर्माण झाले असून त्याचा व्यास १० किमी. आणि खोली ५०० ते १,००० मीटर आहे.

यापेक्षाही मोठी महाकुंडे न्यू मेक्सिकोत जेमेस पर्वतात (२६ किमी. व्यासाचे), तसेच जपान आणि सुमात्रा बेटांवर आढळतात. त्यांपैकी सुमात्रा बेटावरील लेक टोबा या राक्षसी महाकुंडाने १,८०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. जावा व सुमात्रा बेटांदरम्यानच्या खाडीत क्राकाटाऊ ज्वालामुखी आहे. इ. स. १८८३ मध्ये प्रचंड स्फोटक उद्रेक घडून आले. त्या वेळी उद्रेकाच्या जागी ६.५ किमी. व्यासाचे प्रचंड महाकुंड तयार झाले. काही महाकुंडांमध्ये शिसे, सोने, पारा, लिथियम, युरेनियम या खनिजद्रव्यांचे साठे आढळतात. जगातील बहुतेक महाकुंडे प्रसिद्ध पर्यटनस्थळे बनली आहेत. काही महाकुंडांचे परिसर राष्ट्रीय उद्याने म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी