अमेरिकेतील एक पर्वतरांग. उत्तर अमेरिकेच्या वायव्येस असलेल्या संयुक्त संस्थानांच्या अलास्का राज्यात अलास्का पर्वतरांगा आढळतात. या पर्वतश्रेण्यात ब्रुक्स, अलास्का व अल्यूशन या तीन प्रमुख पर्वतरांगांचा समावेश होतो. अलास्काच्या दक्षिणेस अलास्का उपसागराच्या किनाऱ्यालगत अलास्का व अल्यूशन या दोन प्रमुख पर्वतरांगा धनुष्याकृती पर्वतरांगांनी युक्त आहेत. या रांगांमुळे पॅसिफिक महासागराचा किनारा जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश बनला आहे. अलास्का आणि अल्यूशन या पर्वतरांगा सलग पट्ट्यात पूर्वेकडील कॅनडाच्या सीमेपासून प्रथमतः वायव्येकडे, नंतर दक्षिण दिशेला पसरत जाऊन पुढे पश्चिमेकडे पसरत गेलेल्या आहेत. मध्यवर्ती अलास्का पर्वतरांग नैर्ऋत्येला अल्यूशन पर्वतरांगेत विलीन होऊन अल्यूशन बेटांना जोडली गेली आहे.

अल्यूशन पर्वतरांग अलास्का राज्याच्या नैर्ऋत्येला पसरली आहे. या पर्वताचा विस्तार अन्कोरेजच्या नैर्ऋत्येला १३० किमी अंतरावर असलेल्या चाकचामना सरोवरापासून सुरुवात होवून तो पुढे  अलास्का द्वीपकल्पाच्या नैर्ऋत्येकडील शेवटच्या टोकावर असलेल्या युनिमाक बेटापर्यंत पसरला आहे. या पर्वतरांगेत अलास्का द्वीपकल्पातील सर्व पर्वतांचा समावेश होतो. या रांगेला मोठ्या संख्येने असलेल्या जागृत ज्वालामुखींच्या अस्तित्वामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अलास्का मुख्यभूमीत अल्यूशियन पर्वतरांग सुमारे १,००० किमी लांब असून या रांगेच्या पुढे पश्चिमेस सुमारे १,६०० किमी लांबीच्या भागात अल्यूशन बेटे पसरली आहेत; तथापि अधिकृतपणे अल्यूशन पर्वतरांगेत मुख्यभूमी व युनिमाक बेटावरील शिखरांचाच समावेश होतो. महासागरीय अल्यूशन पर्वताची शिखरे समुद्रात बुडालेल्या ज्वालामुखी शिखरांची सलग रांग असून तिची एकूण लांबी सुमारे २,६०० किमी व रुंदी ३२ ते ९६ किमी.पर्यंत आहे. समुद्र तळापासून या रांगेची उंची ३,३५० मी आहे. या रांगेत समाविष्ट असलेल्या बेटांचा आकार धनुष्याकृती असून संपूर्ण द्वीपसमूहांची सलग रांग अलास्का द्वीपकल्पापासून ते अतिपश्चिमेकडील टोकावर असलेल्या अट्टु बेटापर्यंत एकूण १,७७० किमी लांबीची आहे. मुख्य अल्यूशियन पर्वतरांग तीन गटांत विभागली असून ते तीन गट नैर्ऋत्य दिशेकडून वायव्येकडे अलास्का द्वीपकल्प व युनिमाक बेटावरील पर्वतरांगा, चीगमिट पर्वतरांगा आणि निकोला पर्वतरांगा या क्रमाने पसरले आहेत.

अट्टु अल्यूशन रांगेच्या आग्नेये भागात अट्टु बेटापासून ते माउंट स्परपर्यंत पसरलेल्या अरुंद व लांब पट्ट्यात पसरलेली शिखरे सतत धुक्याने वेढलेली असतात. त्यांच्यावर सातत्याने वादळांचा मारा होत असतो. ही पर्वतरांग बेरिंग समुद्र व पॅसिफिक महासागर यांना विभागते. ही संपूर्ण पर्वतरांग दुर्गम, ओसाड व निर्मनुष्य आहे. या रांगेत पसरलेला विस्तीर्ण भाग कटमाई राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखला जातो. ‘कटमाई राष्ट्रीय उद्यानात’ जाण्यासाठी बोटीने किंवा विमानानेच जावे लागते.

अल्यूशन पर्वतीय पट्ट्यात एकूण ८० ज्वालामुखींची नोंद झाली असून त्यांतील निम्मे ज्वालामुखी गेल्या ३ ते ४ शतकांपासून जागृत अवस्थेत आहेत. इ. स. १९१२ मध्ये अल्यूशन रांगेतील एका ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ‘व्हॅली ऑफ टेन थाउझंड स्मोक्स’ची निर्मिती झाली.

अल्यूशन पर्वतातील पाव्लोफ ज्वालामुखी हे शिखर अन्कोरेजच्या नैर्ऋत्येला ९३० किमी.वर स्थित असून पाव्लोफ उपसागराच्या पश्चिमेस आहे. अलास्का द्वीपकल्पाच्या नैर्ऋत्य टोकावर ते स्थित असून ते अलास्कामधील सर्वांत उंच ज्वालामुखींपैकी एक आहे. त्याची उंची २,५१८ मी.पेक्षा जास्त असून इ. स. १७९० पासून त्याचे एकूण ४० उद्रेक नोंदविले गेले आहेत. पाव्लोफ ज्वालामुखीच्या ईशान्येस जुळे जागृत ज्वालामुखी आहेत. पूर्वेकडील अल्यूशन बेटांवर २००८ मध्ये दोन ज्वालामुखींचे उद्रेक झालेत. १२ जुलै २००८ या दिवशी माउंट ओकमोक या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो सलग एक महिना होत राहिला. या ज्वालामुखीच्या उद्रेकातून उद्भवलेली राख व वायूंचे लोट सुमारे १५,२४० मी. उंचीपर्यंत पोहोचले होते. तसेच माउंट कासाटोची या ज्वालामुखीचा ७ व ८ ऑगस्ट २००८ रोजी उद्रेक होऊन त्याच्या धुळीचे व वायूचे लोट सुमारे १५,००० मी. उंचीपर्यंत पोहोचले होते. या ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या सल्फरडाय ऑक्साईड वायू वातावरणातील स्थिताम्बर पट्ट्यात पसरल्यामुळे काही काळ या भागातील विमानवाहतूक प्रतिबंधित केली होती. तसेच या पर्वतरांगेत काटमाई २,०४७ मी; व्हेनियामिनोफ २०,५०७ मी; रेडौब्त ३,१०८ मी. इत्यादी जागृत ज्वालामुखी आहेत.

अल्यूश पर्वतरांगेत लेक क्लार्क राष्ट्रीय उद्यान, काटमाई राष्ट्रीय उद्यान व अनियाक्चक राष्ट्रीय स्मारक व संरक्षक क्षेत्र इत्यादी महत्त्वाची क्षेत्रे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी