स्वयंपाक करताना अनेक सुविधांची मदत घेणे आजच्या धावपळीच्या युगात आवश्यक आहे. विद्युत शक्तीवर चालणारी घरगुती उपकरणे मिश्रक (Mixer) व अन्न शिजवण्या आधी त्याची पूर्व तयारी करणारे अन्न पूर्वप्रक्रिया यंत्र (Food Processor) यांची वेळ वाचवण्यात खूप मदत होते. या यंत्रांची रचना, कार्य व देखभाल समजावून घेतल्यास या यंत्रांचा पूर्ण फायदा करून घेता येतो.

मिश्रक (Mixer)

(हस्त मिश्रक; उभे मिश्रक; मिश्रण यंत्र). हे यंत्र तुलनेने कमी क्षमतेचे असते, यंत्राच्या खालील बाजूस एक कला सर्वयोग्य चलित्र  (Single Phase Universal Motor) उभे बसवलेले असते. चलित्राच्या वरच्या बाजूला वेगवेगळ्या आकाराची व क्षमतेची प्लॅस्टिक किंवा निष्कलंक पोलादाची (Stain Steel) भांडी बसवण्यासाठी उपाययोजना केलेली असते. मुख्यतः तीन प्रकारांची भांडी या यंत्राबरोबर असतात.

मिश्रक

१) सुके पदार्थ दळण्यासाठी लहान भांडे (Dry Grinder). उदा. सुके मसाले, शेंगदाणे इत्यादींची बारीक पूड करणे.

२) मध्यम ओलावा असलेले पदार्थ बारीक वाटण्यासाठी भांडे (Wet Grinder). उदा., ओले खोबरे अथवा चटणी वगैरे वाटण्यासाठी.

३) द्रव पदार्थ एकत्र करण्यासाठी (Liquid mixing Jar). उदा., दुग्धजन्य सरबते (Milk Shake) बनवण्यासाठी.

चलित्रात पाणी जाऊ नये म्हणून संलग्न व त्यावर बसवण्यात येणाऱ्या भांड्यांना जलनिरोधक चकत्या (Water proof washers) बसवलेल्या असतात.

चलित्राला चार स्थिती असलेल्या स्विचमुळे शून्य ते तीन अशा गतींमध्ये वापरता येते. काही मिश्रकांत शून्य स्थितीच्या डाव्या बाजूस क्षणिक स्थिती (Inching position) दिलेली असते. या स्थितीत चलित्राचे पीडन बल वाढवले जाते आणि गती कमी केली जाते. याचा उपयोग कठीण पदार्थांचे प्रथम बारीक तुकडे करण्यासाठी केला जातो. या स्थ‍ितीत चलित्र सतत फिरविता येत नाही. स्विचवरील हात सोडताच तो शून्य स्थितीत येतो (Spring Return).

काही मिश्रकात चलित्राचे रक्षण करण्यासाठी जास्त भार झाल्यास विद्युत प्रवाह खंडित करण्याची व्यवस्था केलेली असते (Overload Protection). जास्त भार झाल्यास विद्युत प्रवाह आपोआप खंडित केला जातो आणि खालील बाजूस लाल रंगाची लहान दांडी बाहेर येते, अशा वेळी गती स्विच प्रथम शून्य स्थितीत आणावा एक मिनिट थांबून दांडी वरील बाजूस दाबल्यावर विद्युत प्रवाह परत सुरू करता येतो.

चलित्र वजनाने जड असल्याने खालील बाजूस प्लॅस्टिकच्या आवरणात बसवलेले असते, यामुळे मिश्रकाला स्थिरता प्राप्त होते.

मिश्रकाचा वापर व देखभाल : मिश्रक उत्पादकांनी दिलेल्या वेळेपर्यंतच चालवावे. अन्यथा चलित्राचे तापमान नियत तापमानापेक्षा जास्त वाढून चलित्राच्या गुंडाळ्या जळून चलित्र बंद पडू शकते. चलित्राच्या आवरणात पाणी जाणार नाही याची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे, यासाठी चलित्राचे आवरण ओल्या दमट कपड्याने पुसून स्वच्छ करावे.

अन्न पूर्वप्रक्रिया यंत्र (Food Processor)

मिश्रकापेक्षा याचा उपयोग जास्त होतो. हे यंत्र १९७३ मध्ये प्रथम उत्तर अमेरिकेत कार्ल सोन्थायमर या अभियंत्याने बाजारात आणले. एक वर्षभरात याची उपयुक्तता लोकांना कळाली आणि झपाट्याने याचा वापर वाढू लागला.

अन्न पूर्वप्रक्रिया यंत्र

रचना : याची रचना बरीचशी मिश्रकासारखी  असते, या यंत्रात एक कला सर्वयोग्य चलित्र (Single phase universal motor) वापरले जाते, परंतु चलित्राची क्षमता (Horse Power) मिश्रकापेक्षा जास्त असते. चलित्र यंत्राच्या खालील बाजूस अथवा एका बाजूला उभे बसवलेले असते. खालील बाजूस बसविलेल्या चलित्रावर वरच्या बाजूस गती प्रवर्तक दांडी (Driving Shaft) बसविलेली असते. एका बाजूला बसविलेल्या चलित्राला जोडलेला पट्टा समोरील  बाजूस गती प्रवर्तक दांडीला जोडलेला असतो.

गती प्रवर्तक दांडीवर पारदर्शक प्लॅस्टिकचे गोल भांडे बसविण्यात येते. या भांड्याच्या आधारे पृष्ठभागावर विशिष्ट आकार दिलेल्या चकत्या व इतर संलग्न जोडण्या बसवण्यात येतात. या चकत्या व इतर जोडण्यांद्वारे या यंत्राचा उपयोग भाज्या चिरणे, फळे कापणे, कणिक व केकचे साहित्य मळणे, फळांचा रस काढणे अशा विविध कामांसाठी करता येतो. या यंत्राची देखभाल मिश्रकाप्रमाणेच करावी लागते. फक्त प्लॅस्टिकचे गोल भांडे खराब होणार नाही किंवा त्याला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.

अशा तऱ्हेने मिश्रक व अन्न पूर्वप्रक्रिया यंत्र (Food Processor) आजच्या धावपळीच्या काळात आपल्या गृहिणींना वरदान ठरले आहे.

संदर्भ :