वातावरणात जेव्हा एखाद्या ठिकाणी निर्माण झालेल्या जास्त भाराच्या केंद्राकडून सभोवतालच्या कमी भाराच्या प्रदेशाकडे चक्राकार वारे वाहतात, तेव्हा त्या वातावरणीय आविष्काराला ‘प्रत्यावर्त’ किंवा ‘अपसारी चक्रवात’ या संज्ञा वापरल्या जातात. आवर्ताप्रमाणेच प्रत्यावर्त हाही हवेचा एक भोवरा असतो. काही विशिष्ट स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागात हवेचा जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो आणि सभोवताली हवेचा भार कमी होत जातो. यामुळे केंद्रभागातील हवेच्या जास्त भाराकडून सभोवतालच्या कमी भाराकडे चक्राकार वारे वाहू लागतात. हवेच्या अशा भोवऱ्यालाच प्रत्यावर्त असे म्हणतात. प्रत्यावर्ताचा प्रवासमार्ग निश्चित नसतो. काही वेळेस प्रत्यावर्त एकाच प्रदेशात बराच काळ स्थिर असतात. वायुभारात मंद बदल होत असल्यामुळे प्रत्यावर्तात वाहणारे वारे अतिशय मंद गतीने वाहतात.
त्यांपासून बहुदा पाऊस पडत नाही. वादळी हवामानाने ग्रासलेल्या आवर्तामध्ये ज्या चक्राकार पद्धतीने उपरिवारे (वातावरणातील विविध पातळ्यांवर वाहणारे वारे) भ्रमण करीत असतात, त्याच्या अगदी उलट पद्धतीने वाऱ्यांचे अभिसरण प्रत्यावर्ताने व्यापलेल्या क्षेत्रांवर दिसून येते. प्रत्यावर्तात वरच्या पातळीवरील हवा भूपृष्ठाकडे येऊन केंद्रीय प्रदेशातून बाहेर निघून इतरत्र पसरते. पृष्ठभागावरील दैनिक हवादर्शक नकाशावर प्रत्यावर्त सहज दिसून येतात. अशा क्षेत्रात मध्यभागी हवेचा दाब सर्वाधिक असून परिघाकडे तो कमीकमी होत जातो. हवादर्शक नकाशावर प्रत्यावर्तातील समभार रेषा (नकाशावरील समान वायुभाराची ठिकाणे जोडणारी रेषा) वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असून केंद्रभागातील रेषा सर्वांत जास्त वातावरणीय भार दर्शविते. चक्रीवादळाच्या अथवा आवर्ताच्या विरुद्ध गुणधर्म असलेल्या या वातचक्रास प्रसिद्ध इंग्रज हवामानशास्त्रज्ञ फ्रान्सिस गॉल्टन यांनी इ. स. १८६१ मध्ये ‘अँटिसायक्लोन’ म्हणजे ‘प्रत्यावर्त’ असे नाव सुचविले. हे प्रत्यावर्त (चक्रवात) हजारो चौ. किमी. क्षेत्रफळ व्यापतात. त्यांची त्रिज्या सुमारे ३५० ते २,००० किमी. इतकी असते. त्यांच्या गाभ्याभोवती (केंद्राभोवती) वारे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेला अनुसरून (सव्य दिशेने), तर दक्षिण गोलार्धात ते उलट दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने (अपसव्य दिशेने) वाहतात. प्रत्यावर्ताच्या गाभ्यात वातावरणीय दाब साधारणपणे १,०२० ते १,०३० मिलीबार इतका जास्त असतो. हिवाळ्यात कधीकधी हा दाब १,०५० ते १,०८० मिलीबारची कमाल मर्यादा गाठतो. परिघाकडे जाताना क्रमाक्रमाने तो कमी होतो.
आवर्तामध्ये चोहोबाजूंनी भिन्न गुणधर्मांच्या वायुराशी केंद्रप्रदेशाकडे येतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांना ऊर्ध्व गती मिळते आणि त्यांचे अभिसरण होऊन वादळी हवामान उद्भवते. याच्या उलट प्रत्यावर्तात उंचीवरील हवा भूपृष्ठाच्या मध्यभागाकडे प्रतिदिवशी १०० ते ५०० मी. अशा वेगाने संथपणे खाली येते आणि तिचे अपसरण होऊन (वातचक्रातून निसटून) ती भूपृष्ठावर चोहोबाजूंना फैलावते. वावटळी वारे, मेघव्याप्त आकाश व जोरदार वृष्टी ही आवर्तांची वैशिष्ट्ये असतात; तर मंदगती वारे, नाममात्र आर्द्रता, निरभ्र आकाश आणि पर्जन्याचा अभाव ही प्रत्यावर्ताशी निगडित असलेल्या हवामानाची लक्षणे असतात.
पृथ्वीवरील स्थिर स्वरूपाचे महत्त्वाचे प्रत्यावर्त दोन्ही गोलार्धातील महासागरांवर ३०° अक्षांशाच्या जवळपास आढळतात. आकाराने लंबवर्तुळाकृती असून त्यांचा विस्तार त्याच अक्षवृत्तावरील महासागरांच्या रुंदीइतका असतो. पृथ्वीच्या बहुतेक सर्व अक्षवृत्तांवरील हवामानाचे अंदाज वर्तविण्याच्या दृष्टीने या प्रत्यावर्ताच्या जागा आणि त्यांची तीव्रता या गोष्टींना फार महत्त्व असते. गाभ्यातील (केंद्रभागातील) हवेच्या तापमानानुसार प्रत्यावर्तांचे दोन प्रकार पडतात. एक थंड व दुसरा उष्ण. हिवाळ्यात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा वायव्य भाग व पूर्व सायबीरियासारख्या विषुववृत्तापासून अतिदूरच्या अक्षवृत्तावरील शीत भूखंडीय प्रदेशावर थंड प्रत्यावर्त निर्माण होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागातून व लगतच्या वातावरणातील थरांतून रात्रीच्या प्रारणक्रियेमुळे व उष्णता अवकाशात विलीन झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या चक्रवातांना ऊष्मीय प्रत्यावर्त म्हणतात. उन्हाळ्यात भूखंडीय प्रत्यावर्त भूपृष्ठावरून नाहीसे होतात आणि त्यांची जागा भूखंडीय ऊष्मीय न्यूनदाब क्षेत्रांनी घेतली जाते; तथापि उच्चस्तरीय वातावरणात त्यांचे अस्तित्व दिसू शकते. त्या वेळी ते थोडेसे विषुववृत्ताकडे सरकलेले असतात. सागरी प्रत्यावर्त बव्हंशी उष्ण असतात. अशा चक्रवातांत फिरणारी हवा पृष्ठभागालगतचे काही थर सोडल्यास बव्हंशी उष्ण असते. त्यांना ‘गतिमान प्रत्यावर्त’ असेही म्हणतात. कधीकधी वाढत्या उंचीप्रमाणे त्यांच्या वेगाची तीव्रता वाढत असली, तरी त्यांच्या तीव्रतेत बरीच स्थिरता आढळते. थंड प्रत्यावर्त उथळ असतात. अशा चक्रवातात जसजसे वर जावे, तसतसा वातावरणीय दाब झपाट्याने कमी होत जातो. उष्ण प्रत्यावर्त उथळ नसतात. वातावरणात बऱ्याच उंचीपर्यंत ते आढळतात. दक्षिण गोलार्धातील सागरावर २०° ते ४०° अक्षांशाच्या पट्ट्यात कायम स्वरूपाचे उष्ण प्रत्यावर्त आढळतात. ऋतुनुसार त्यांची जागा थोडीशी बदलते; पण बव्हंशी ते त्याच अक्षवृत्तीय पट्ट्यात राहतात. शेवटी माथ्यावरील उच्च वातावरणात न्यूनदाबाचे क्षेत्र निर्माण होते. उत्तर गोलार्धात प्रत्यावर्त उन्हाळ्यात सागरी प्रदेशांवर, तर हिवाळ्यात विस्तृत भूखंडीय प्रदेशांवर निर्माण होतात. ऋतू बदलले की, आवर्तांच्या ठिकाणी प्रत्यावर्त निर्माण होतात आणि प्रत्यावर्तांच्या ठिकाणी आवर्त निर्माण होतात.
समीक्षक : नामदेव स. गाडे