आवर्ताच्या निर्मितीमुळे जो पाऊस पडतो त्यास ‘आवर्त पर्जन्य’ असे म्हणतात. एखाद्या प्रदेशात जेव्हा केंद्रस्थानी निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याभोवती सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून अतिशय वेगाने वायुराशी चक्राकार वाहत येतात, त्या आविष्काराला वातावरणविज्ञानात आवर्त असे म्हणतात. आवर्तातील वारे उत्तर गोलार्धात घड्याळकाटे दिशेच्या विरुद्ध दिशेत, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळकाटे दिशेला अनुसरून वाहतात. आवर्तातील हवा वेगाने वर जात असते. हवा वर जात असताना उत्तरोत्तर तिचे तापमान कमी होऊन ती बाष्पसंपृक्त बनत जाते. बाष्पसंपृक्त हवेचे संद्रवण किंवा संघनन (बाष्पकणांचे जलकणांत रूपांतर होण्याची प्रक्रिया) होऊन मेघनिर्मिती होते आणि अनुकूल परिस्थितीत पाऊस पडू लागतो. या पर्जन्यास ‘आवर्त पर्जन्य’ असे संबोधले जाते.

वेगवेगळ्या प्रदेशातील आवर्त निर्मितीचे स्वरूप वेगवेगळे असते. जेव्हा भिन्न तापमानाच्या, आर्द्रतेच्या आणि घनतेच्या वायुराशी एकत्र येतात, तेव्हा स्वाभाविकत:च उबदार वायुराशी हलक्या असल्यामुळे त्या वस्तुमानाने जड असलेल्या थंड वायुराशींवर आरूढ होतात. ऊर्ध्व दिशेने जाणाऱ्या उष्णार्द्र हवेचे संघनन होऊन मेघनिर्मिती होते आणि अनुकूल परिस्थितीत पाऊस पडू शकतो. उष्णार्द्र हवेच्या प्रवाहांत काही विकृती आल्यास त्यात न्यूनदाबाची क्षेत्रे निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर चोहोबाजूंकडून हवा अशा न्यूनदाबाच्या केंद्रभागाकडे जाऊ लागते. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्यामुळे या हवेला उर्ध्व दिशेने जाण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे संनयनी ढग निर्माण होतात व ते विस्तृत क्षेत्रावर पाऊस देतात. कित्येकदा गर्जन्मेघही (क्युम्युलोनिंबस) निर्माण होतात.

आवर्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना ते ज्या प्रदेशांवरून जातात तेथे पाऊस पडतो. उष्ण कटिबंधात आवर्तांपासून अल्पकाळात मुसळधार व वादळी स्वरूपाचा पाऊस पडतो, तर समशीतोष्ण कटिबंधात दीर्घकाळ मर्यादित स्वरूपाचा पाऊस पडतो. न्यूनदाब क्षेत्रे समुद्रावर निर्माण झाल्यास आर्द्रतेचा भरपूर पुरवठा होत असल्यामुळे ती क्षेत्रे चक्री वादळांचे किंवा उग्र अभिसारी चक्रवातांचे स्वरूप धारण करतात. चक्री वादळांत विस्तृत प्रमाणावर आर्द्र हवा वर नेली जाते. चक्री वादळे चलनशील असतात. ही चक्री वादळे समुद्रावरून किनाऱ्यावर येऊन थडकतात, तेव्हा अल्पावकाशात तेथे प्रचंड पाऊस पडून महापूर संभवतात. यानंतर भूपृष्ठावरून जाताना आर्द्रतेचा पुरवठा तुटल्यामुळे उत्तरोत्तर ती क्षीण होतात. त्या प्रमाणात पावसाचे प्रमाणही कमी होत जाते. यामुळे किनारपट्टीपासून दूर असलेल्या अंतर्गत प्रदेशात पर्जन्यमान लक्षवेधी प्रमाणात कमी होत असते.

अंदमान समुद्रात व बंगालच्या उपसागरात साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये निर्माण होणारी चक्री वादळे जेव्हा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन थडकतात, तेव्हा ती किनाऱ्यावरील विस्तृत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वादळी स्वरूपाचा पाऊस देतात. ही वादळे खूपच विनाशकारी असतात. यांचा सर्वाधिक तडाखा तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांना बसतो. उत्तर भारतात २५° अक्षवृताच्या उत्तरेस हिवाळ्यात अनेक उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवात पश्चिमेकडून प्रवेश करून पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे निघून जातात. त्यांत उष्ण व शीत सीमापृष्ठे निर्माण झालेली असतात. उत्तर भारतातील हिवाळी पाऊस बव्हंशी या सीमापृष्ठीय अभिसारी चक्रवातांमुळेच पडतो. काही गडगडाटी वादळांमध्ये ढगफुटीही (पर्जन्यवृष्टिस्फोट) संभवते.

समीक्षक : माधव चौंडे