वातावरणातील हवेच्या अभिसरण प्रवाहांमुळे पडणाऱ्या पावसाला ‘आरोह पर्जन्य’ किंवा ‘अभिसरण पर्जन्य’ असे म्हणतात. सौर प्रारणामुळे भूपृष्ठ तप्त झाल्यास निकटवर्ती थरातील आर्द्र हवा गरम होऊन हलकी होते. त्यामुळे स्वाभाविकच वातावरणात अभिसरण वातप्रवाह निर्माण होऊन ती आर्द्र हवा वर जाऊ लागते. वाढत्या उंचीनुसार वातावरणीय तापमान आणि दाब कमी होत जातो. त्यामुळे ही आर्द्र हवा जसजशी वर जाईल, तसतसे तिचे तापमान कमी होऊन हवा विरळ होत जाते. विशिष्ट उंचीवर ती हवा संपृक्तता (ज्या तापमानाला हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिकतम असते ते तापमान) गाठते व हवेत पुरेशा संख्येने संद्रवण किंवा संघनन (बाष्पकणांचे जलकणांत रूपांतरण होण्याची प्रक्रिया) होऊन मेघकण तयार होतात व मेघनिर्मिती होते. साधारणपणे रासिमेघ (क्युम्युलस) प्रकारचे ढग तयार होतात. उत्तरोत्तर ऊर्ध्वगामी हवा अधिकच त्वरेने वर जाऊ लागल्यास संघनन प्रक्रियेने अल्पावकाशात उत्तुंग गर्जन्मेघ (क्युम्युलसनिंबस) तयार होतात. या उंचीनंतरही जलबाष्पाचा सारखा पुरवठा होत गेला आणि हवा वर चढतच राहिली, तर तिचे  तापमान कमी होत जाते, बाष्पधारणशक्ती कमी होते; तथापि हवा संपृक्तता अवस्थेतच राहते. ढग उंच वाढतच असतो, त्यामुळे अतिरिक्त जलबाष्पाचे भिन्न आकारमानाच्या असंख्य जलबिंदूत रूपांतर होते. ढगांची जाडी जसजशी वाढत जाते, तसतशी त्यांची वर्षणक्षमता वाढून पर्जन्यवृष्टी होते.

सर्वांत प्रभावी प्रक्रिया म्हणजे जलबाष्पयुक्त हवेचे ऊर्ध्वगमन (ऊर्ध्व दिशेने वर जाणे) हीच होय. हवेच्या अशा ऊर्ध्वगतीवर पाऊस किती पडेल हे अवलंबून असते. मेघकण वाढून मोठा झाला की, पाऊस पडणे शक्य होते. पुरेशा जलबाष्पयुक्त हवेचा सतत पुरवठा झाल्यास काही तास जोरदार पावसाच्या सरीवर सरी कोसळतात. अशा प्रकारे वातावरणातील हवेच्या अभिसरण प्रवाहांमुळे हा पाऊस पडत असल्यामुळे त्या पर्जन्यास आरोह किंवा अभिसरण पर्जन्य असे म्हणतात. आरोह पर्जन्य पडण्यासाठी सौर ऊर्जेने बाष्पीभवन अधिक होऊन वातावरणाला पुरेशा बाष्पाचा पुरवठा व्हायला हवा की, जेणेकरून सापेक्ष आर्द्रता उच्च होईल. आरोह पर्जन्याची त्वरा वातावरणातून ऊर्ध्व दिशेने जाणाऱ्या आर्द्रतायुक्त हवेच्या वेगावर अवलंबून असते. जितका हा वेग जास्त, तितकी पाऊस पडण्याची तीव्रता अधिक असते.

आरोह पर्जन्य मर्यादित क्षेत्रावर व अल्प कालावधीत पडतो. कित्येकदा ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट होऊन मुसळधार पाऊस पडतो. तसेच काही वेळा या पावसाबरोबर गारांची वृष्टीही होते. अनेकदा हा पाऊस विनाशकारी ठरतो. विषुववृत्तीय प्रदेशांत वर्षभर दररोज साधारणपणे दुपारनंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझॉनचे खोरे, आफ्रिकेतील काँगोचे खोरे आणि आग्नेय आशियातील काही बेटांवर या प्रकारची पर्जन्यवृष्टी होते. त्याशिवाय ऊष्ण कटिबंधात उन्हाळ्यात तसेच उत्तर गोलार्धातील खंडांतर्गत प्रदेशात अशा प्रकारचा पाऊस पडतो.

समीक्षक : नामदेव स. गाडे