भारताच्या मध्य प्रदेश राज्यातून वाहणारी चंबळ नदीची एक उपनदी. ती शिप्रा या नावानेही ओळखली जाते. तिची लांबी सुमारे २४० किमी. आहे. तिच्या द्रुतगती प्रवाहामुळे तिला क्षिप्रा (जलद वाहणारी) असे म्हटले जात असावे. तसेच शुचिता किंवा विशुद्धी करणारी (आत्म्याची, भावनेची, शरिराची) किंवा मोक्षदायिनी या अर्थीही या नदीचा शिप्रा असा उल्लेख केला जातो. हिंदूंची ही एक पवित्र नदी असून प्राचीन साहित्यात तिला सिप्रा किंवा शिप्रा, तर पुराणांत ज्वरघ्नी, पापघ्नी व अमृतसंभवा अशी नावे आहेत. स्कंद पुराणातील अवंतीखंडात तिचे माहात्म्य वर्णिले आहे. मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहराच्या आग्नेयीस सुमारे १९ किमी. अंतरावर, विंध्य पर्वताच्या उत्तर भागातील काक्री बर्डी टेकड्यांत क्षिप्रा नदीचा उगम झाला असून माळव्यात तीला ‘सपराजी’ म्हणतात. उगमानंतर नागमोडी वळणे घेत ती सामान्यपणे वायव्येस वाहत जाते. क्षिप्रा नदीच्या काठावर अनेक पवित्र व धार्मिक स्थळे असून त्या स्थळांशी निगडित अनेक धार्मिक आख्यायिका आहेत. त्यांपैकी उज्जैन हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून नदीकाठी अनेक घाट बांधले आहेत. या एकसंध घाटांमुळे येथे प्रवाहमार्गाला धनुष्याकार प्राप्त झाला आहे. उज्जैन येथील नदीच्या काठावर अनेक मंदिरे, ऋषींचे आश्रम व इतर धार्मिक वास्तू असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले महाकालेश्‍वराचे मंदिर येथे आहे. शहरापासून काही अंतरावर नदीच्या पात्रात कालिया डोह हा एक मोठा डोह आहे. या डोहाच्या पुढे क्षिप्रेचा प्रवाह दुभंगला गेला असून त्यांदरम्यान एक लहानसे बेट निर्माण झाले आहे. बेटाच्या पुढे हे दोन्ही प्रवाह पुन्हा एकत्र येतात. या बेटावर पूर्वी सूर्यनारायणाचे मंदिर होते. ते माळव्याचा सुलतान नासिरुद्दीन खलजी याने पाडून तेथे कालिया डोह महल बांधला. उज्जैन येथे अनेक उत्सव होतात. त्यांपैकी दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ पर्वणीला येथे फार मोठा कुंभमेळा भरतो. उज्जैननंतर पुढे उत्तरेस वाहत गेल्यानंतर मध्य प्रदेश राज्याचा मंदसोर जिल्हा आणि राजस्थानमधील झालवाड जिल्हा यांच्या सीमेजवळ, बरखेडा गावाच्या ईशान्येस उजवीकडून ती चंबळ नदीला मिळते.

पूर्वी क्षिप्रा नदीला भरपूर पाणी असे; परंतु उद्योगधंदे व शेती यांसाठी तिच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यामुळे आता पावसाळ्यानंतर नदीला अत्यल्प पाणी असते. तसेच नदीच्या काठावरील उद्योगांमधील दूषित द्रव्ये तसेच खेडी, शहरे यांमधील वाहितमल नदीत सोडल्यामुळे तिच्या पाण्याचे प्रदूषण बरेच वाढले आहे. खान व गंभीर या क्षिप्राच्या उपनद्या आहेत. क्षिप्रा व खान यांच्या संगमस्थानाला त्रिवेणी संगमाचे स्थान म्हणून महत्त्व आहे.

‘नर्मदा शिप्रा सिंहस्थ लिंक परियोजना’ या नदीजोड प्रकल्पांतर्गत क्षिप्रा नदी नर्मदा नदीला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाचा २०१२ मध्ये शुभारंभ होऊन तो प्रकल्प २०१५ मध्ये पूर्ण झाला. या प्रकल्पांतर्गत नर्मदा नदीवरील वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणारे पाणी ३५० मीटर वर उचलून ५० किमी. अंतरावरील क्षिप्रा नदीच्या उगमाकडील, उज्जैनजवळच्या पात्रात सोडले आहे. त्यामुळे क्षिप्रा नदीला सलग पाणीपुरवठा होत असतो. नर्मदा नदी माळवा प्रदेशाशी जोडण्याच्या योजनेतील हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यामुळे ‘नर्मदा – माळवा लिंक प्रोजेक्ट’ या दुसऱ्या टप्प्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात नर्मदा नदी क्षिप्रा, गंभीर, कालीसिंध व पार्वती या नद्यांना जोडली जाणार आहे. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेशाला आणि एकूणच माळवा प्रदेशातील शेती व उद्योगधंद्यांना फार मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १५८ गावांतील सुमारे ५०,००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

समीक्षक : माधव चौंडे