वॉलेस, आल्फ्रेड रसेल : (८ जानेवारी १८२३  – ७ नोव्हेंबर १९१३ ) आल्फ्रेड रसेल वॉलेस यांचा जन्म युनायटेड किंग्डमचा घटक असलेल्या, वेल्स या देशात झाला. इंग्लंडमधील हर्टफोर्ड ग्रामर स्कूल या शाळेत ते सहा वर्षे शिकले. पुढे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना मेकॅनिक्स इन्स्टिट्यूटमध्ये सुतारकाम करणाऱ्या भावाबरोबर लंडनमध्ये राहताना स्वयंशिक्षण घेता आले. मेकॅनिक्स इन्स्टिट्यूटमधील विज्ञान दालन पाहून आणि वेगवेगळ्या श्रमजीवी मजूर, कारागिरांबरोबर वावरून आल्फ्रेड अनेक गोष्टी शिकले. लवकरच वॉलेस स्वतःच्या जमीन सर्वेक्षण व्यवसायात मदतनीस म्हणून काम  करू लागले. नवी करप्रणाली आणि सार्वजनिक जमिनीची विभागणी यामुळे जमिनीचे अचूक सर्वेक्षण करणे, नकाशे तयार करणे या व्यवसायात सुमारे दहा वर्षे वॉलेसनी जमीन सर्वेक्षण व्यवसायात घालविली. एका नियोजित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे मोठे काम केले.

जमीन सर्वेक्षणासाठी वॉलेसना तासन तास उघड्यावर काम करावे लागे. त्यात निसर्ग निरीक्षण होई. लौकिक शिक्षण नसले तरी अभ्यासू वृत्तीमुळे वॉलेस वाचन करीत. डार्विन, थॉमस माल्थस, अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट अशा विचारवंतांची पुस्तके वाचत. अशा वाचनातून आणि ऐकलेल्या विद्वज्जनांच्या भाषणांतून राजकारण, अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र, जैविक उत्क्रांती, इतिहास, संमोहनशास्त्र, कवटीचा आकार आणि मेंदूची क्षमता अशा विषयांचा विशाल पट त्यांच्या समोर उलगडत गेला.

प्रख्यात वेल्श समाजसुधारक रॉबर्ट ओवेन आणि त्यांचे पुत्र, रॉबर्ट डेल ओवेन यांची पुस्तके वाचून वॉलेसना जगाकडे पाहण्याचा नवा बुद्धीप्रामाण्यवादी दृष्टीकोन मिळाला. ते अधिक चिकित्सक, विज्ञानवादी बनले. स्वतःच्या कर्तबगारीच्या जोरावर कालांतराने वॉलेस मानवतावादी, निसर्गप्रेमी आणि अभ्यासू संशोधक, भूगोलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, मानववंशशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि चित्रकार अशा अनेक रूपांमध्ये प्रसिद्ध झाले. बी.बी.सी ने ‘असेंट ऑफ मॅन’ नामक एक डॉक्युमेंटरी टेलिव्हिजन मालिका तेरा भागांत सादर केली. जेकब ब्रॉनॉस्की या प्रख्यात गणिती आणि इतिहासकाराने ही मालिका लिहिली. जगभर पाहिल्या गेलेल्या या मालिकेत वॉलेस लिखित ट्रॅव्हल्स ऑन द अमॅझॉन पुस्तकातील  वॉलेसरचित जाविताचे वर्णन या कवितेचा भाग उद्धृत करण्यात आला.

वॉलेस अनेक गोष्टींत रस घेत. उदा., समाजवाद, अध्यात्म, मंगळावर जीवसृष्टी सापडण्याची शक्यता, लहान मोठ्या बेटांवरील जीवप्रकार आणि त्यांची उत्क्रांती, मानवी जीवनातील नैतिक, सामाजिक, राजकीय मूल्ये. ते रस घेत तो केवळ वाचन आणि चर्चा यापुरता मर्यादित नव्हता. विज्ञानाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी या क्षेत्रांत प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे असे त्यांचे ठाम मत होते. अशा क्षेत्रांत ते स्वतः कसून काम करत आणि भर घालत. उदा., वॉलेसनी मॅन्स प्लेस इन द युनिव्हर्स हे पुस्तक प्रकाशित केले. पृथ्वीखेरीज अन्यत्र कोठे जीवसृष्टी आहे का यावर प्रकाश टाकणारा हा एका जीवशास्त्रज्ञाचा पहिला प्रयत्न होता. जीवसृष्टीला पोषक वातावरण नसल्याने पृथ्वीखेरीज अन्यत्र कोठे जीवसृष्टी नसेल असे मत त्यानी मांडले. वॉलेसनी ‘मंगळ ग्रह जीवसृष्टीधारणेस योग्य आहे का?’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात पर्सिवल लॉवेल या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाचे मंगळ ग्रहावर हुशार जीवांनी कालवे बांधले आहेत या मताचे क्ष-किरण पंक्तिदर्शीच्या मदतीने निरीक्षण करून साधार खंडन केले.

रॉबर्ट चेम्बर्स या ‘चेम्बर्स विश्वकोशा’साठी प्रसिद्ध असलेल्या लेखकाचे Vestiges of the Natural History of Creation हे पुस्तक वॉलेसनी वाचले. त्यामुळे त्यांना उत्क्रांतीवादाचा सखोल अभ्यास करण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली. हेन्री वॉल्टर बेट्स हे निसर्गतज्ज्ञ त्यांचे मित्र होते. त्यांच्याबरोबर काही वर्षे वॉलेस ब्राझीलमध्ये अमॅझॉन महानदीच्या खोऱ्यात हिंडले. ब्राझीलमध्ये नद्यांचे विस्तृत जाळे आणि मनुष्यस्पर्श न झालेली निबिड वर्षावने आहेत. तेथील भटकंतीत दोघांनी मिळून नकाशे काढले, जमिनीचे परीक्षण केले. फुलपाखरे, अन्य कीटक, पक्षी यांचे अनेक जैविक नमुने गोळा केले. त्यांची चित्रे काढली. नमुन्यांची ओळख पटवून, वर्गीकरण करून इंग्लंडमध्ये पाठवून स्वतःच्या हौशी, प्रायोजक-विरहित निसर्ग प्रवास मोहिमांसाठी वॉलेसनी थोडा निधी गोळा केला.

ते या प्रदीर्घ साहसी प्रवास काळात भेटलेल्या लोकांच्या भाषा आणि संस्कृती शिकले. त्यांच्या नोंदी केल्या. पाहिलेल्या सर्व गोष्टींचे वनस्पती आणि प्राणी यांच्या उत्क्रांती-संदर्भांत महत्त्व काय अशा विचारांची जुळणी करत राहिले. वॉलेसनी काढलेली अनेक टिपणे बोटीने इंग्लंडला पाठवली होती पण दुर्दैवाने बोटीला आग लागून त्यातील बरीचशी नष्ट झाली. तरीही या प्रवासाचे फलित म्हणजे त्यांचे अनेक लेख आणि दोन पुस्तके प्रकाशित झाली. त्यांची नावे Palm Trees of the Amazon and Their Uses and Narrative of Travels on the Amazon and Rio Negro आणि ‘अमॅझॉन आणि काळी नदी यावरील प्रवासाचे वर्णन.’ तसेच वॉलेसनी काढलेल्या काळ्या नदीच्या (Rio) प्रवाह रेखाटन नकाशाचे सक्रीय कौतुक रॉयल जिओग्राफिक सोसायटीने केले. या कामाचे महत्त्व जाणून रॉयल सोसायटीने, मलय द्वीपसमूहाच्या मोहिमेसाठी निधी संमत केला. वॉलेसनी आठ वर्षे मलय द्वीपसमूहात प्रवास आणि मुख्यतः प्राणी जीवनाचा अभ्यास केला. त्यांच्या असे लक्षात आले की इंडोनेशियन द्वीपसमूहांचे अभ्यासाच्या सोयीसाठी दोन वेगळे भाग करता येतात. पश्चिमेकडील भागात मूळचे आशियाई प्राणी प्रामुख्याने आढळतात आणि पूर्वेकडील भागात मुख्यत: ऑस्ट्रेलियातील प्राणी सापडतात. या आशिया-ऑस्ट्रेलिया खंडातील वनस्पती आणि प्राणीसृष्टीचे भौगोलिक विभाजन दाखवणाऱ्या, काल्पनिक द्विभाजक रेषेला नंतर वॉलेस रेषा (Wallace line) असे नाव ठेवले गेले. वॉलेस रेषा निश्चित करता येणे म्हणजेच दोन महाप्रचंड खंडांतील जीव भूगोलावर अधिवासाच्या आधारावर सुस्पष्टपणे अलग करता येणे. हा वॉलेस यांच्या उत्क्रांतीतील नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बळकट करणारा पुरावाच ठरला. मलय द्वीपसमूहाच्या अभ्यासावर आधारित अनेक लेख त्यांनी लिहिले. त्यातील दोन लेखांत प्राण्यांच्या नव्या जाती कशा निर्माण होतात याचे विवेचन केले. एका लेखात त्यांनी असा निष्कर्ष काढला की नव्याने निर्माण झालेल्या प्रत्येक जातीशी मिळती-जुळती आधीची जात त्याच काळात आणि प्रदेशात अस्तित्वात असते. जीवन संघर्षात जुन्या जातींत सतत बदल होत राहतात आणि जैवविविधता निर्माण होते. त्यापैकी काही जाती जीवन संघर्षात तग धरू शकतात. मलय द्वीपसमूहाच्या प्रवास, निरीक्षणावर आधारित ‘मलय आर्किपेलॅगो-लँड ऑफ ओरांगुटांग अँड द बर्ड ऑफ पॅराडाइझ’ आणि ‘उत्क्रांतीतील नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताची उपपत्ती’ अशी दोन पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. यातील दुसऱ्या क्रमांकाच्या पुस्तकात आणि अन्य काही लेखांतून वॉलेसनी आयुष्याच्या उत्तरार्धात केवळ नैसर्गिक निवडीमुळे मानवाची तरल बुद्धिमत्ता निर्माण होणे कठीण आहे असे नमूद केले.

वॉलेसनी बोर्निओमध्ये काम करत असताना ॲनल्स अँड मॅगझिन ऑफ नॅचरल  हिस्टरीमध्ये नवीन जातींच्या अवतरण्याचे नियंत्रण करणारा नियम अशा शीर्षकाच्या निबंधात सध्या अस्तिवात असलेल्या तसेच अश्मीभूत झालेल्या जातींबद्दल नैसर्गिक निवडीच्या  सिद्धांताचा तात्विक विचार मोघम रूपात मांडला होता. त्यानंतरच्या काळातील स्वतंत्र निबंधात वॉलेसनी तो अधिक स्पष्ट केला. तो डार्विनच्या हाती पडला. त्यात नैसर्गिक निवड असा डार्विन वापरत तो वाक्प्रचार नसला तरी नैसर्गिक निवडीची, डार्विन त्या आधीची वीस वर्षे काम करत असलेली संकल्पना मांडली होती. डार्विनना वॉलेसनी काढलेले निष्कर्ष त्यांच्या स्वतःच्या विचारांशी मिळते जुळते वाटले. म्हणून त्यांनी आपले मित्र, भूशास्त्रतज्ञ चार्ल्स लाइल आणि वनस्पतीशास्त्रज्ञ जोसेफ डाल्टन हूकर यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी डार्विन, हूकर आणि लाइल यांनी समन्वयाने, डार्विन आणि वॉलेस या दोघांच्या लेखांचे सारांश काढून ते लेखसंक्षेप एकत्र करून लिनियन सोसायटीकडे पाठवून दिले. हे लेख लिनियन सोसायटीने त्यांच्या इतिवृत्तात प्रकाशित केले.

वॉलेस यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांताचा तात्विक विचार विशद करणारा शोधनिबंध मिळेपर्यंत डार्विनना नैसर्गिक निवडीचे अनेक पुरावे स्वतः मिळवले असूनही आपला सिद्धांत प्रकाशित करण्याची निकड वाटली नव्हती. परंतु वॉलेस यांचा निबंध मिळाल्यावर डार्विन स्वतःचा ऑन द ओरिजन ऑफ स्पॅसीज हा ग्रंथ प्रकाशित करण्यास प्रवृत्त झाले.

वॉलेसनी त्या काळच्या इतर बहुतेक संशोधकांप्रमाणे एकच एक नोकरी केली नाही. त्यांची राजकीय मते, पारंपारिक शास्त्रीय विचारधारेबाहेरची असल्याने आणि त्याबाबत ते उघडपणे आग्रही असल्यानेही नोकरीत स्थिर होणे अवघड झाले असावे. वॉलेसनी स्वतंत्रपणे कामे आणि कष्टप्रद प्रवास केले. एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त जैविक नमुने गोळा केले. परंतु शोधून काढलेल्या, प्रवासात गोळा केलेल्या प्राण्यांच्या विक्रीतून मिळवले. वॉलेसनी आयुष्यभर कष्ट करून भरपूर आणि दर्जेदार लिखाण केले. एका विज्ञान इतिहासकाराने केलेल्या मोजणीनुसार त्यात बावीस पुस्तके, सातशे सत्तेचाळीस लहानमोठे लेख यांचा समावेश होतो. यापैकी पाचशे आठ लेख शास्त्रीय शोधनिबंध आहेत आणि त्यातील एकशे एक्याण्णव लेख उत्क्रांती, भौगोलिक प्राणीशास्त्र, मानववंश शास्त्र इ. विषयांवर असून नेचरसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकात ते प्रकाशित झाले आहेत. एनसायक्लोपिडीया ब्रिटानिकाच्या नवव्या आवृत्तीसाठी वॉलेसनी काही नोंदी लिहिल्या.

वॉलेस एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये त्यांच्या वैज्ञानिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतील विचारदेखील परखडपणे जाहीररीत्या मांडण्याबद्दल जनसामान्यांनाही माहीत झाले होते. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर प्रस्थापिताना ते आवडतील की नाही याची तमा न बाळगता वॉलेस आपले विचार मांडत. उदा., लसीकरणाच्या विरुद्ध, स्त्रीहक्कांच्या बाजूने, जमिनीच्या सरकारी मालकीकरणाच्या बाजूने इत्यादी.

वॉलेसना त्यांच्या आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे पदक, डार्विन पदक, कोप्ली पदक, लिनियन सोसायटी ऑफ लंडनचे सुवर्ण पदक, रॉयल जिओग्राफिक सोसायटीचे फाउंडर पदक ही पदके त्यांना मिळाली. याशिवाय डब्लिन विद्यापीठाने आणि ऑक्स्फर्ड विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिल्या. रॉयल सोसायटी सदस्य म्हणूनही ते निवडून आले.

डार्विनप्रमाणेच वॉलेसनेही भरपूर संशोधन कार्य प्रत्यक्षपणे कामाच्या जागी जाऊन केले होते. आधी काही वर्षे अ‍ॅमेझॉन नदीच्या पात्रात आणि नंतर मलय द्वीपसमूहात. वॉलेसनी केलेले प्रवास त्यांचे जगभर विविध प्रदेशात केलेले प्रचंड काम यामुळे त्याना जैवभौगोलिक शास्त्राचे (Biogeography) जनक मानतात. वयाच्या नव्वदाव्या वर्षी अल्पशा आजाराने स्वतःच्या ओल्ड ऑर्चर्ड  नावाच्या घरात वॉलेस मरण पावले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा