भारतीय कृषी सांख्यिकी संस्था : (स्थापना – ३ जानेवारी, १९४७) दिल्ली येथे १९४६ साली भरलेल्या ३४ व्या भारतीय विज्ञान काँग्रेस अधिवेशनात संख्याशास्त्रज्ञ व कृषी अधिकारी यांच्या सभेमध्ये एक ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तो ठराव असा होता : संख्याशास्त्र आणि कृषी तसेच पशु विज्ञान यांचा अभ्यास व संशोधन यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कृषी आणि पशु संवर्धन संस्था स्थापन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे भारतीय कृषी सांख्यिकी संस्थेची स्थापना ३ जानेवारी १९४७ ला झाली. पुढे संस्थेच्या नावातील पशु संवर्धन हे शब्द गाळण्यात आले. १९४८-४९ मध्ये तिची, १८६० च्या संस्था नोंदणी कायदा २१ च्या अनुसार, रीतसर नोंदणी करण्यात आली.

संख्याशास्त्र आणि त्याचा कृषी, पशु संवर्धन, कृषीअर्थशास्त्र आणि संलग्न विषय यांचा अभ्यास व संशोधन यांना चालना देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट ठरवण्यात आले. त्यासाठी पुढील बाबींचा अंतर्भाव केला गेला : १) वरील विषयांवर चर्चा व्हावी म्हणून परिषदा, चर्चासत्र, परिसंवाद यांचे आयोजन करणे; २) व्याख्याने व पाठ्यक्रम आयोजित करणे; ३) ज्ञानपत्रिका (जर्नल) प्रसिद्ध करणे; ४) परिषदा, चर्चासत्र, परिसंवाद यातून मिळालेल्या उपयुक्त माहितीचा सारांश लेखन, व्याप्तीलेख, वरील विषयासंबंधी पुस्तके प्रसिद्ध करणे आणि ५) समउद्देशी संस्थांशी सहकार्य करणे.

संस्था कृषी संख्याशास्त्र यातील प्रश्नांसाठी संशोधन हाती घेणे, त्यासाठी संशोधन गट स्थापन करणे त्यांना आणि आर्थिक व इतर मदत पुरवणे हे काम प्रामुख्याने करत असते. संस्थेच्या अनेक उपक्रमांशिवाय खालील प्रतिष्ठित व्याख्यानांचे आयोजन नियमितपणे केले जाते.

  • डॉ. राजेन्द्रप्रसाद स्मृति व्याख्यान: डॉ. राजेन्द्रप्रसाद संस्थेच्या १९४७ सालच्या स्थापनेपासून १९६२पर्यंत संस्थेचे अध्यक्ष होते त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित केले जाते.
  • डॉ. व्ही. जी. पानसे स्मृति व्याख्यान: डॉ. पानसे हे संस्थेचे संस्थापक सदस्य होते. २२ जुलै १९६९ रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी संस्था शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करते.
  • डॉ. डी. एन. लाल स्मृति व्याख्यान: कृषी व संबंधित क्षेत्रातील कळीच्या प्रश्नावर संख्याशास्त्राच्या दृष्टीने प्रकाश टाकणा-या तज्ञाचे व्याख्यान ठेवले जाते.

संस्थेतर्फे १९४८ पासून Journal of the Indian Society of Agricultural Statistics ही ज्ञानपत्रिका वर्षातून तीन वेळा एप्रिल, ऑगस्ट व डिसेंबरमध्ये प्रकाशित होत आलेली आहे.

संस्थेतर्फे संशोधनासाठी खालील पारितोषिके दिली जातात :

  • सांख्यिकी भूषण पुरस्कार:कृषी संख्याशास्त्र क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या संशोधकास दोन वर्षांतून एकदा दिला जातो.
  • प्रा. पी. व्ही. सुखात्मे सुवर्णपदक पुरस्कार:हा पुरस्कार कृषी संख्याशास्त्र व संबंधित क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या, तसेच संस्थेच्या कार्यात रस असणाऱ्या ख्यातनाम संशोधकास दिला जातो.
  • डॉ. डी. एन. लाल स्मृति व्याख्यान पुरस्कार: ज्याने संख्याशास्त्र विषयात वा त्याचा उपयोग कृषी व संबंधित क्षेत्रे यामध्ये खास योगदान दिले आहे अशा व्यक्तीस दोन वर्षांतून एकदा पुरस्कार दिला जातो.
  • उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार: संख्याशास्त्रातील संशोधनास चालना मिळून ज्ञानपत्रिकेचा दर्जा व गुणवत्ता वाढावी म्हणून संस्थेने ज्ञानपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या संख्याशास्त्रातील प्रयोग संकल्पन (Design of Experiments), नमुना पहाणी, संख्याशास्त्रीय जनुकीय अभ्यास, संख्याशास्त्रीय सिद्धांत व पद्धती आणि उपयोजित संख्याशास्त्र या प्रत्येक शाखेतील उत्कृष्ट लेखांसाठी बक्षिसे ठेवली आहेत.

संस्थेने हरित क्रांतीच्या परिणामांचे मोजमाप, प्रकृष्ट पशुसंवर्धन कार्यक्रमाचे संख्याशास्त्रीय मूल्यांकन, कृषी क्षेत्रातील संशोधनात प्रगत संगणकीय तंत्रे, कृषी क्षेत्रातील आर्थिक सुधारणा – संख्याशास्त्रीय मूल्यांकन इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद वेळोवेळी आयोजित केले आहेत.

संस्थेचा पत्ता – इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स, आयएआरआय परिसर, ग्रंथालय रस्ता, पुसा, नवी दिल्ली -११००१२.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर