फिनलेसन, जॉन:  (२७ ऑगस्ट १७८३ – १३ एप्रिल १८६०)  जॉन फिनलेसन स्कॉटलंडमधील केथनेसमधील थर्सो येथे जन्मले. त्यांचे शालेय शिक्षण स्कॉटलंडमध्येच झाले. या काळात अभिजात साहित्य त्यांच्या आवडीचे तर गणित नावडीचे होते. नादमधुर कवितांसाठी स्थानिकांत ते लोकप्रिय होते. मात्र विचार तर्कशुद्धपणे मांडण्याकडे त्यांचा कल होता. फिनलेसननी सर बेंजामिन डनबार यांच्याकडे व्यावसायिक मध्यस्थाचे काम केले, तर लॉर्ड डफस् आणि लॉर्ड केथनेस यांच्या संपूर्ण मालमत्तांचे उत्तमरित्या व्यवस्थापन केले. त्यानंतर एडिंबर्गमध्ये कायद्याचा अभ्यास संपवून ते लंडनमधील वकील, जेम्स ग्लेन्न यांच्याकडे रुजू झाले.

वकिली सोडून फिनलेसन बोर्ड ऑफ नेव्हल रिव्हिजन या मंडळामध्ये आधी लिपिक व नंतर मुख्य लिपिक म्हणून कार्यरत होते. या काळांत, वयाच्या केवळ तेविसाव्या वर्षी, त्यांनी मंडळाचा अकरावा आणि बारावा अहवाल बनविला. तसेच रसद विभागांच्या सुधारणेसाठी परिणामकारक प्रणालीही विकसित केली. डेप्टफोर्ड येथील केवळ एका गोदी-आवारातच फिनलेसन यांच्या प्रणालीमुळे पहिल्याच वर्षी ६०,००० स्टर्लिंग पौंडांची बचत झाली.

फिनलेसनवर नौसेनाधिकरणातील पत्रव्यवहार आणि आवक-जावक दस्तऐवजांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पडली. नऊ महिन्यांच्या अथक प्रयत्नांती फिनलेसननी निर्माण केलेल्या पध्दतीमुळे दस्तऐवज किंवा माहिती शोधणे कमी त्रासाचे आणि वेळाचे झाले. यासाठी असंख्य दस्तऐवज धुंडाळून त्यांनी त्यांच्याशी निगडीत १०४ मुख्य विषय निश्चित केले. त्या प्रत्येकाखाली त्यांनी जरूरीनुसार तपशीलवार वर्णनांसहित उपविषय घातले. ते केवळ एकच व्यक्ती किंवा गोष्टीशी निगडीत होते. यातील मुख्य आणि उपविषयांना स्वतंत्र अनुक्रम दिलेला सारसंग्रह त्यांनी संदर्भासाठी निर्माण केला. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या दस्तऐवजांवर घातलेले क्रमांक-उपक्रमांक तसेच संग्रह करणाऱ्या कपाट-खणाचे क्रमांक यांत एकवाक्यता आणली गेली. त्यामुळे दस्तऐवजांचा शोध घेणे सुलभ झाले.

फिनलेसनची ही दस्तऐवज व्यवस्थापन पद्धत फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि रशियातही अंगिकारली गेली. त्याबद्दल अठराव्या लुईकडून त्यांना फ्लूअर-द-ली हे प्रतिष्ठेचे पदक मिळाले. याच कर्तबगारीवर त्यांना नौसेनाधिकरणाचे अभिलेखपाल, मुख्य अधिकारी आणि ग्रंथपाल नेमण्यात आले, जेणेकरून तेथील दुरवस्था सुधारावी.

वर्षाला जवळपास ४०,००० कागदपत्रांचे व्यवस्थापन सलग १२ वर्षे सांभाळतानाच, ग्रंथपाल म्हणून फिनलेसननी ५,००० खंडांच्या पद्धतशीर मांडणीचे ग्रंथालय सिद्ध केले. परराष्ट्र सचिव, मुलग्रेव यांच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांतील बचावासाठी, नौदलाच्या कारभाराचा हिशोब तसेच संगणने, युक्तिवाद इत्यादी विपुल उपयुक्त सामग्री, फिनलेसननी तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पुरवली. यामुळे मुलग्रेव यांच्या यशस्वी कार्यशैलीवर शिक्कामोर्तब झाले.

नौसेनाधिकरणातील विविध प्रकारच्या विभागांना आवश्यक असणाऱ्या अवाढव्य नोंदींचे संकलन, संबंधीत कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन, गैरकारभारांवर सुधारणांच्या उपायांसह अभ्यासपूर्ण अहवाल लेखन, यांबरोबरच फिनलेसननी डबघाईला गेलेल्या सरकारी कोषागारातील बुडीत भाराचा, म्हणजे अर्ध-पगार आणि निवृत्तीवेतन यांच्यावरील खर्चाचा तपास नेटाने बहुतांशी एकहाती पूर्ण केला.

इंग्लंड आणि आयर्लँडच्या राज्य निधी नियामक कार्यालयाकडील १६९५ ते १७८९ दरम्यानची जीवनविमाधारकांची आणि कर्ज निवारण निधीच्या वार्षिकीकर्त्यांची करारपत्रे मिळवून फिनलेसननी १९,००० मृत्युंचे तपशील घेतले. दिवसाला १२ तासांहून अधिक काळ, अचूकतेची खात्री होईपर्यंत काही संगणनांची पुनरावृत्ती करत, चार वर्षांत त्यांनी जीवन-वार्षिकीच्या मूल्यांचे आणि हप्त्यांचे संगणन तडीस नेले. याच प्रकारे सुपरअॅन्युएशन कायद्याच्या अनुषंगाने नौदलातील १४,००० अर्धपगारी किंवा निवृत्तीवेतनधारक व्यक्तींच्या वयाच्या तपशीलवार विश्लेषणाची प्रचंड संगणने फिनलेसननी महिनोनमहिने केली.

फिनलेसनना कोषागारातील नॅशनल डेट अँड गव्हर्नमेंट कॅल्क्युलेटर विभागाचे मुख्य विमाशास्त्रज्ञ तसेच लेखाकार नेमले गेले. हे काम त्यांनी निवृत्त होईपर्यंत केले. सदोष नॉर्थहॅम्पटन सारण्यांच्या वापरामुळे देशाच्या महसुलास आठवड्याला ८,००० स्टर्लिंग पौंडांचा तोटा होत असल्याचे फिनलेसनचे निरीक्षण स्वीकारून कोषागाराची लाइफ ॲन्युइटी सिस्टीम त्वरित थोपविण्यात आली. पुढे फिनलेसननी तयार केलेल्या सारण्या वापरून जीवनवार्षिकीच्या सुधारलेल्या किंमती आणि हप्त्यांसह, ती पुन्हा सुरू केली. यामुळे पांच वर्षांत ३९,००,०० स्टर्लिंग पौंड वाचले. त्यांच्या नवीन सारण्यांमागील आधार आणि मूलभूत तत्त्वे विषद करणारा अहवाल त्याच वर्षी त्यांनी बनवला. तो संसदेने प्रकाशित केला.

नौदल आणि भूदलातील अर्धपगारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे अंशराशीकरण (commutation) करण्यासंबंधातील, तसेच एकट्या आणि दोन व्यक्तींच्या संयुक्त वार्षिकीसाठी नऊ प्रकारच्या व्याजदरांनुसार, अर्ध-वार्षिक, वार्षिक आणि आयुष्याच्या शेवटच्या वर्षातील अर्धवट काळासाठी विमाधारकांना देय असलेल्या रकमांसाठीची सर्व संगणने फिनलेसननी अंकगणिती कौशल्यांसह, अचूकता सांभाळत, परिश्रमपूर्वक पार पाडली. हाऊस ऑफ कॉमन्सच्या परिपत्रकातून त्याची मुक्तकंठाने प्रशंसा झाली.

फिनलेसननी लंडन लाइफ अ‍ॅश्युरन्स असोसिएशनच्या तर डी मॉर्गन यांच्यासह सुप्रसिध्द अ‍ॅमिकेबल सोसायटीच्या कारभाराच्या चौकशीचा अहवाल फायद्यासाठीच्या शिफारसीसह बनविला. अ‍ॅमिकेबल सोसायटीसाठी त्यांनी नवीन मृत्युसारण्यांचा संचही बनवला. त्यांनी रॉयल नेव्हल अँड मिलिटरी लाइफ अ‍ॅश्युरन्स सोसायटीसाठीही सल्लागार विमाशास्त्रज्ञ म्हणून आवश्यक सारण्या तयार केल्या.

नौदलातील जवळजवळ ६,००० अधिकाऱ्यांच्या सेवा, गुणवत्ता आणि कमतरता यासारख्या तपशीलांचे नोंदपुस्तक बनवणे; गुलामांच्या मुक्ततेसाठी मालकांना अदा करण्याच्या रकमेसंबंधी, चर्चच्या मालमत्ता भाडेतत्वावर देण्यासंबंधी दरांचा अहवाल बनवणे, लंडन फिवरच्या संदर्भांत दहा वर्षांतील ६,००० रुग्णांच्या नोंदींवरून तापाने होणाऱ्या मृत्युदराचे संगणन करणे, यांसारखी फिनलेसनांची असंख्य कामे अविस्मरणीय आहेत.

इन्स्टिट्यूट अँड फॅकल्टी ऑफ ॲक्च्युरिजतर्फे त्यांच्या स्मरणार्थ, विमाशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी फिनलेसन-रौप्यपदक दिले जात आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युरिजचे फिनलेसन एकमताने अध्यक्ष बनले आणि तिथे मृत्युपर्यंत कार्यरत राहिले.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर