पॅपीन, डॅनिस : (२२ ऑगस्ट १६४७ – २६ ऑगस्ट १७१३) डॅनिस पॅपीन याचा जन्म फ्रांसमध्ये चीतेने येथे झाला. सोसायटी ऑफ जीझसच्या जेसुईट शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. ते अँगर विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यांनी वैद्यकशास्त्राची पदवी प्राप्त केली असली तरी त्यांना भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात रस होता.

त्यांनी खिश्चियन ह्यूजेन्स गॉटफ्राइड लिबनिझ यांच्याबरोबर पॅरिस येथे काम केले. वातावरणात पोकळी निर्माण करून वाफेची शक्ति निर्माण करण्यात त्यांना रुची निर्माण झाली. नंतर त्यांनी लंडन येथे स्थलांतर केले. तेथे रॉबर्ट बॉइल याच्यासोबत तीन वर्षे काम केले. याच कलावधीत त्यांनी स्टीम डायजेस्टर नावाचे यंत्र तयार केले. सुरक्षा झडप असलेले  पाण्याच्या वाफेवर काम करणारे हे एक भांडे होते. तो एक प्रकारचा प्रेशर कुकर होता. बराच काळ लंडनमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात नोकरी पत्करली.

आश्चर्याची गोष्ट अशी की १७ व्या शतकात शोधलेल्या या स्टीम डायजेस्टरचे महत्त्व १९३० च्या दशकापर्यंत कारखानदारांच्या लक्षात आले नाही. १६७९ साली शोधलेल्या या भांड्याची उपयोजिता आणि त्यातील पाण्याच्या शक्तीचा वापर स्वयंपाकघरात, प्रयोगशाळेत एवढेच काय पण भविष्यात वाफेचे इंजिन तयार करण्यासाठी होईल असे कोणालाही वाटले नव्हते. हा शोध म्हणजे भविष्यातील औद्योगिक क्रांतीचा शुभारंभ होता. १६७९ साली त्यांनी आपला स्टीम डायजेस्टर रॉयल सोसायटीतील थोर भौतिक शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, पेशीशास्त्राचा उद्गाता रॉबर्ट हुक आणि सूक्ष्मजीवशास्त्राचा जनक अँटनी व्हॅन ल्युएनहॉक यांच्या उपस्थितीत सादर केला होता.

सन १६७९ साली त्यांनी वापरण्यास योग्य असा बोन डायजेस्टर तयार केला. या यंत्राचा वापर फक्त अन्न शिजवण्यासाठीच नव्हे तर हाडांपासून खत निर्मिती करण्यासाठी आणि हाडांना मऊ करण्यासाठीदेखील करण्यात आला. डेव्हिड वुटॉन म्हणतात ‘यंत्र म्हणजे वाफेच्या तंत्रज्ञानातील क्रांती आहे. यात वाफेचा दाब आणि  तापमान यांचा मेळ घालून ती गोष्ट उकळवली जाते. एखादी गोष्ट उकळते म्हणजे तो वाफेने निर्माण केलेल्या दाबाचा परिणाम असतो. वाफेच्या दाब यंत्रात दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे वाफ निर्माण होते आणि दुसरे म्हणजे ही वाफ दाब निर्माण करते.’ १६८१ साली A New Digester or Engine for softening Bones या आपल्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे की, पाकशास्त्र ही फार जुनी कला आहे. या माझ्या यंत्राचा वापर या कलेसाठी सर्वसामान्यांना इतका वारंवार करावा लागणार आहे की लोक नक्कीच त्याच्यात सुधारणा घडवून आणतील. रॉयल सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात डॅनिस पॅपीन म्हणतात या पुस्तकात माझ्या यंत्राचा वापर करून मटन, बिफ, लॅम्ब, ससा, कबुतर अशा प्राण्यांचे मांस शिजवण्याच्या पाककृती दिलेल्या आहेत.

पॅपीन स्टीम डायजेस्टर

या यंत्रात तीन दंडगोलाकार भांडी वापरतात. दोन पितळेची आणि एक काचेचे. पाणी किंवा अन्नपदार्थ काचेच्या भांड्यात ठेवले जातात. या भांड्यांना झाकण असते ते स्क्रूच्या सहाय्याने घट्ट केले जाते. भांड्यात  वाफेचा दाब जेव्हा असुरक्षित पातळी गाठतो तेव्हा एका वजनाच्या सहाय्याने झडप उघडली जाते आणि त्यातून जास्तीची वाफ बाहेर पडते.

सध्याच्या प्रेशर कुकरपेक्षा हा आकाराने मोठा असला तरी त्याचे मूळ वैज्ञानिक तत्त्व मात्र सारखेच आहे. डेव्हिड वुटॉन म्हणतो ‘यात अन्न हे वेगाने शिजवले जाते कारण ते उच्च तापमानाला आणि वाफेवर शिजते, कोरड्या उष्णतेवर किंवा जाळावर शिजवले जात नाही. वाफेवर शिजवल्यामुळे प्राणीजन्य पदार्थांमधून पातळ किंवा लिबलिबीत पदार्थदेखील बाहेर पडतात. उदाहरणार्थ हाडामधून त्यातील मगज बाहेर पडतो.’

सन १२ एप्रिल १६८२ रोजी त्यांनी आपल्या या प्रेशर कुकरचा वापर करून रॉयल सोसायटीच्या सदस्यांसाठी जेवण तयार केले. सदस्य जॉन एव्हेलीन आपला अनुभव सांगतांना म्हणतात, ‘मटन आणि बीफमधली टणक हाडे लोण्यासारखी मऊ पडली होती. पाण्याचा वापर न करता आणि अत्यंत कमी इंधन वापरुन अत्यंत चविष्ट सार तयार झाले होते. इतकी चविष्ट मेजवानी मी यापूर्वी मी कधी जेवलो नव्हतो.’ पुढे त्यांनी आपल्या यंत्रात सुधारणा केली. यात कधी कधी वाफेचा स्फोट होत असे. म्हणून त्यांनी कुकरच्या सुरक्षा झडपेत क्रांतिकारी बदल केले. या झडपेवर संशोधन करत असतांना वाफेने निर्माण केलेला ऊर्ध्वगामी जोर त्यांनी बारकाईने अभ्यासला. हे बघून डेव्हिड वुटॉन म्हणाले ‘तुम्ही वाफेचा बंबतर बनवला आहेच, बस ! आता गरज आहे एका दट्याची (Piston), म्हणजे वाफेचे इंजिन तयार व्हायला कितीसा वेळ लागणार आहे ?’ नंतर त्यांनी प्रेशर कुकर या विषयावर दुसरे पुस्तक लिहिले. दट्याच्या आधारावर चालणारे इंजिन या संकल्पनेवर त्यांनी काही वर्षे संशोधन केले आणि सप्टेंबर १६८८ आणि जून १६९० च्या Acta Eruditorum या संशोधन पत्रिकेत अशा इंजिनचे सचित्र वर्णन प्रसिद्ध केले. थॉमस सेवेरी यांनी १६९६ साली दट्यामुक्त इंजिन बनवून औद्योगिक क्रांती केली आणि पॅपीन यांनी इंजिन या विषयातून आपले लक्ष काढून घेतले.

पुढे १९ व्या शतकाच्या शेवटी म्हणजे तब्बल २०० वर्षानंतर लुई पाश्चर यांनी सूक्ष्मजीव सिद्धांत (जर्म थियरी) मांडला. सर जोसेफ लिस्टर यांनी निर्जंतुकीकरणाचा सिद्धांत मांडला. आणि चार्ल्स एडवर्ड चेंबरलँड यांनी पॅरिसमध्ये लुई पाश्चर यांच्या प्रयोगशाळेत विविध सूक्ष्मजीवशास्त्रीय पोषणमाध्यमे निर्जंतुक करण्यासाठी जे वाफेवर चालणारे उपकरण बनवले ते पॅपीनच्या तत्त्वावर चालणारे स्टीम डायजेस्टरच होते. यात चेंबरलँड यांनी वाफेचा दाब आणि आणि पाण्याचा उत्कलन बिंदू याचा मेळ घालून १५ पौंड वाफेचा दाब निर्माण करून आतील पाण्याचा उत्कलन बिंदू १२१ डिग्री सेल्शियस इतका वाढवून पोषणमाध्यमे निर्जंतुक करण्यात यश मिळवले.

सन १६७९ सालच्या पॅपीनच्या स्टीम डायजेस्टर या यंत्रालाच १९ व्या शतकात ऑटोक्लेव्ह या नावाने ओळखले जाऊ लागले. सध्याच्या सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत ऑटोक्लेव्ह हे वारंवार वापरले जाणारे अपरिहार्य असे यंत्र मानले जाते.

डॅनिस पॅपीन यांचा लंडन येथे मृत्यू झाला.

संदर्भ : 

समीक्षक : नितिन अधापुरे