टुटोला, एमस : (२० जून १९२० – ८ जून १९९७). प्रसिद्ध नायजेरियन लेखक. आफ्रिका खंडातील नायजेरिया हा देश आदिम, नैसर्गिक आणि गूढ आदिबंधात्मक सांस्कृतिक विशिष्टतेसाठी प्रसिद्ध आहे. जंगलाची आणि त्याच्या अवतीभवती वावरणाऱ्या प्राणिमात्रांची आदिमता, तेथील लोकजीवन या नाविन्यपूर्ण बाबी एमस टुटोला यांच्या लेखनाचा विषय होत. त्यांचा जन्म नायजेरियातील आबेओकुटा शहरामधील इपोस एके येथे योरुबा ख्रिश्चन कुटुंबात झाला. १९३९ मध्ये त्यांचे शेतकरी वडील चार्ल्स टुटोला यांच्या अकाली निधनामुळे एमस यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले. साल्वेशन आर्मी मिशनरी शाळेतून प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांना काही काळ शेती व नंतर एका स्थानिक प्रशासकीय लेखनिकाच्या घरी नोकरी करावी लागली. तरुण वयामध्ये त्यांनी काही काळ ब्रिटनच्या रॉयल एयर फोर्समध्ये तांबट म्हणून काम केले. व्हिक्टोरिया अलेक यांच्याशी त्यांचा १९४७ मध्ये विवाह झाला व त्यांना ८ मुले झाली. लहानपणापासूनच एमस यांना योरुबा जमातीशी संबधित लोककथा ऐकण्याचा व्यासंग होता. या लोककथांचा त्यांच्या लेखनावर विशेष प्रभाव दिसतो. तांबट म्हणून त्यांनी सुरू केलेला स्वतंत्र व्यवसाय अयशस्वी झाल्यावर त्यांनी नायजेरियाच्या कामगार विभागामध्ये कोठाराचे लेखनिक व संदेशवाहक म्हणून काम केले. या कामादरम्यान त्यांनी योरुबा कथालेखन चालू केले. इफे विद्यापीठात त्यांनी अभ्यागत संशोधन-अधिछात्र म्हणून तसेच आयवा विद्यापीठ आयोजित आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमात सहयोगी म्हणून काम केले.

एमस यांनी १९५२ मध्ये लिहिलेल्या द पाम वाइन ड्रिंन्कर्ड या साहित्यकृतीला वाचकांची प्रचंड पसंती मिळाली. सदर कृतीला आदिम साहित्याचा उत्कृष्ट नमूना म्हणून मान्यता मिळाली. या कृतीत वापरलेल्या अपारंपरिक इंग्रजी भाषेलाही वाचकांनी दाद दिली. १९५२ मध्ये लिखित माय लाईफ इन द बुश ऑफ घोस्ट ही कादंबरी एमस यांच्या अलंकारिक भाषेचा आणि आत्मकथनात्मक लिखाणाचे उदाहरण ठरली. त्यांच्या लिखाणामध्ये सिंबी अँड द सटायर ऑफ द डार्क जंगल (१९५५), द ब्रेव्ह आफ्रिकन हण्ट्रेस (१९५८), फिदर वुमन ऑफ द जंगल (१९६२), अजेयी अँड हिज इनहेरिटेड पॉवर्टी (१९६७), द विच हर्बलिस्ट ऑफ द रिमोट टाऊन (१९८१), द वाईल्ड हंटर इन द बुश ऑफ द घोस्ट्स (१९८२), योरुबा फोकटेल्स (१९८६), पॉपर, ब्रॉऊलर अँड स्लॅण्डरर (१९८७) आणि द व्हीलेज विच डॉक्टर अँड अदर स्टोरीज (१९९०) इत्यादी साहित्यकृतींचा समावेश होतो. एमस यांच्या साहित्यकृती फ्रेंच, जर्मन, रशियन आणि पॉलिशसह जगातील ११ भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत.

एमस यांच्या साहित्यकृतींमध्ये नायक-नायिकेचा स्वयंप्रेरित आत्मशोध, जंगलामधील धाडसी प्रसंग, देवदेवता, भुते, दैत्य, वनदेवता, जादूगार आदी गोष्टींचा मुबलक प्रमाणात वापर आढळतो. ख्रिश्चन पाश्चात्य सभ्यता आणि आफ्रिकन पौराणिक विश्व यांचा उत्कृष्ट मेळ त्यांच्या साहित्यात दिसतो. प्रसिद्ध वेल्श कवी दिलन थॉमस यांच्या आब्झर्वर या वृतपत्रात प्रकाशित समीक्षेमुळे एमस यांची द पाम वाइन ड्रिंन्कर्ड ही साहित्यकृती खूप प्रसिद्ध झाली. या साहित्यकृतीच्या निवेदनातील मौखिक कथनपरंपरेचा वापर, उत्कृष्ट पात्रे व कथानक यामुळे ती समीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरली. व्ही.एस.प्रिसेट या समीक्षकाने एमस यांच्या या कृतीची होमरच्या ओडिसी या महाकाव्याशी, जॉन बण्यानच्या पिल्ग्रिम्स प्रोग्रेस या काव्याशी तसेच जॉनाथन स्विफ्टच्या गलीवर्स ट्रॅव्हल्स या कादंबरीशी तुलना केली आहे. समीक्षकांच्या मते त्यांच्या कादंबऱ्यांची भाषा अत्यंत मोहक आणि प्रभावी आहे. योरुबा भाषेचे प्रत्यक्ष भाषांतर, आधुनिक नायजेरियन वाक्प्रचार, महाकाव्य लेखनशैली या गोष्टींचे मिश्रण त्यांच्या लेखनात दिसते.

एमस यांच्या लिखाणामधील प्रगल्भ कल्पकता आणि अपारंपरिक भाषाशैली यामुळे त्यांच्या साहित्याला इंगजी तसेच अमेरिकन समीक्षकांनी प्रचंड दाद दिली. नायजेरियन समीक्षकांनी मात्र त्यांच्या साहित्याला अंधश्रद्धाळू आणि असभ्य ठरवले. नायजेरियन समीक्षकांच्या मते एमस यांच्या लेखनात वापरली गेलेल्या असभ्य व अप्रमाणित इंग्रजी भाषा जागतिक पातळीवर नायजेरियाच्या प्रतिमेस मारक आहे. त्यांनी एमस यांच्या लिखाणातील भाषेची अपरिपक्वता व व्याकरणदृष्ट्या त्रुटी यांचाही उल्लेख केला. त्यांच्या मते एमस यांच्या साहित्यातील खंडित भाषाशैली आणि आदिम लेखनशैलीमधून आफ्रिकेचे मागासलेपण जागतिक स्तरावर अधोरेखित करतात.

एमस यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना १९८३ न्यू ओरलेन्सचे मानद नागरिकत्व मिळाले. १९८५ मध्ये त्यांना इटलीमधील तुरीन येथे द पाम वाइन ड्रिंन्कर्ड आणि माय लाईफ इन द बुश ऑफ घोस्ट या कादंबर्‍यांसाठी पारितोषिके मिळाली. पॅन आफ्रिकन रायटर्स असोसिएशनद्वारे दिला जाणारा नोबेल पॅट्रॉन ऑफ आर्ट्स हा पुरस्कार त्यांना १९९२ साली प्रदान करण्यात आला.

एमस यांचा मृत्यू धमणीकाठिन्य आणि मधुमेह या आजारामुळे नायजेरियातील इबादान येथे झाला.

संदर्भ :

  • Lindfors, Bernth, Dictionary of Literary Biography (Amos Tutuola in Twentieth-Century, the Caribbean and Black African Writers), Detroit, 1983.
  • Mbembe, Achille; Mitsch, R. H., Research in African Literatures (Life, sovereignty, and terror in the fiction of Amos Tutuola), 2003.
  • Owomoyela, Oyekan, Twayne’s World Author Series (Amos Tutuola Revisited), New York.