थिओडोसियस डॉब्झॅन्सकी : (२५ जानेवारी १९०० – १८ डिसेंबर १९७५) डॉब्झॅन्सकी यांचे मूळ रशियन नाव फीओडोसि ग्रिगॉरेविच डोब्रझॅन्स्की (Feodosy Grigorevich Dobrzhansky) होते, ते उच्चारायला कठीण होते म्हणून त्यांनी थिओडोसियस डोब्झॅन्सकी नाव धारण केले. थिओडोसियसचा जन्म नेमिरॉव्ह (युक्रेन) या त्याकाळच्या रशियन साम्राज्यात झाला. थिओडोसियस बालपणी फुलपाखरे आणि इतर अनेक प्रकारचे कीटक जमवत आणि एकूणच घराबाहेर निसर्ग सान्निध्यात रमत. ऐन तारुण्यात त्यांना व्हिक्टर लुच्निक नावाचा हौशी, कीटकांच्या प्रेमाने झपाटलेला युवा कीटकशास्त्रज्ञ भेटला. व्हिक्टरला कठीण पंख असलेल्या भुंगेरे (बीटल्स) प्रकारच्या कीटकांत रस होता. व्हिक्टर यांच्या प्रभावामुळे शाळकरी वयातच थिओडोसियसनी जीवशास्त्रज्ञ व्हायचे ठरवले. वयाच्या अठराव्या वर्षीच डॉब्झॅन्सकींनी त्यांचा पहिला कीटकांविषयी वैज्ञानिक निबंध प्रकाशित केला.

थिओडोसियस यांचे महाविद्यालयीन शिक्षण युक्रेनची राजधानी असलेल्या कीएव्ह शहराच्या कीएव्ह विद्यापीठात झाले. पदवीनंतर डोब्झॅन्सकी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये  प्राणीविज्ञान अध्यापनाचे काम करू लागले. नंतर ते लेनिनग्राड (सध्याचे) सेंट पीटर्सबर्ग येथे नव्याने सुरू केलेल्या अनुवंशशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. युरी फिलिपचेन्को यांचे मदतनीस म्हणून रूजू झाले. सेंट पीटर्सबर्गमध्ये त्यांनी ड्रॉसॉफिला मेलॅनोगॅस्टर (Drosophila melanogaster) या फळमाशीवर संशोधन सुरू केले. विशेषतः या फळमाशीतील बहुप्रभावी जनुकांचा (pleiotropic genes) त्यांनी अभ्यास केला. थिओडोसियस काही काळाने अमेरिकेतील न्यूयॉर्क-कोलंबिया विद्यापीठात रॉकफेलर छात्रवृत्तीवर आले. विख्यात अनुवंशशास्त्रज्ञ थॉमस हंट मॉर्गन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना संशोधन करण्याची संधी मिळाली. कालांतराने त्यांना कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पासाडीना, कॅलिफोर्निया येथे आनुवंशिकीतील सहाय्यक अध्यापक पद मिळाले. तेव्हा ते मॉर्गन यांच्याबरोबर कॅल्टेकमध्ये आले. पुढे ते पदोन्नतीने प्राध्यापक झाले. त्यांनी दिलेल्या जेसप व्याख्यान सत्रामुळे आनुवंशिकीत रस असणाऱ्या शास्त्रज्ञांनी त्यांना नावाजले. थिओडोसियस यांचा अमेरिकेतील मुक्क्काम वाढला. पुढे त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले.

सन १९४० मध्ये थिओडोसियस कोलंबिया विद्यापीठात प्राणीशास्त्राच्या प्राध्यापक पदावर परतले. तेथे युवा अनुवंशवैज्ञानिकांबरोबर अनुवंशशास्त्रात संशोधन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १९६२ च्या सुमारास ते न्यूयॉर्कमधील रॉकफेलर इन्स्टिट्यूटच्या म्हणजेच हल्लीच्या रॉकफेलर विद्यापीठाच्या प्राध्यापकांमध्ये सामील झाले. निवृत्त होईपर्यंत ते तेथेच राहिले. निवृत्तीनंतरही त्यांचा प्रोफेसर एमेरिटस नात्याने डेविस येथे कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संबंध राहिला. सन १९२० ते १९३५च्या दरम्यान गणितज्ञ आणि जीवशास्त्रात रस असणाऱ्या विचारवंतांनी मेंडेलच्या अनुवंशशास्त्राचा आणि डार्विनच्या उत्क्रांतीशास्त्रविषयक सिद्धांताचा एकत्रित विचार करायला सुरुवात केली. थिओडोसियस यांच्या व्यासंगातून जे. बी. एस. हाल्डेन, सर रोनाल्ड एल्मर फिशर, सिवॉल राईट अशा भिन्न विषयातील तज्ज्ञांनी उत्क्रांती आणि आनुवंशिकता यांच्या संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांचे उत्क्रांतीवरील विवेचन सामान्य वाचकांना समजायला कठीण होते. पुढे थिओडोसियस यांनी लिहिलेली पुस्तके सोप्या भाषेत गणितविरहित होती त्यामुळे ती अधिक वाचकस्नेही होती.

सन १९३७ मध्ये प्रकाशित झालेले थिओडोसियस यांचे जेनेटिक्स अँड द ओरिजिन ऑफ स्पेशिस हे पुस्तक विसाव्या शतकातील अनुवंशशास्त्राचे सर्वोत्तम पुस्तक मानले जाते. त्यात विशद केला गेलेला अतिमहत्त्वाचा मुद्दा – उत्परिवर्तन हे जैवविविधतेचे मूळ हा आहे. या पुस्तकाच्या नव्याने संपादित केलेल्या सुधारित आवृत्या पुढे दोनदा निघाल्या. या पुस्तकामुळे अर्न्स्ट मेयर, जुलियन हक्सले, जॉर्ज सिम्पसन, जी. एल. स्टेबिन्स यांसारख्यांना पुस्तके लिहून आपले दृष्टीकोन जगापुढे मांडण्याची प्रेरणा मिळाली.

जेनेटिक्स अँड द ओरिजिन ऑफ स्पेशिस हे पहिले असे पुस्तक की ज्यात मेंडेल आणि डार्विन यांच्या अनुवंशशास्त्राचा उत्क्रांतीशास्त्राचा आंतरसंबंध जाणून घेण्याचा आणि त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या समजुतीनुसार नैसर्गिक निवडीतून समान  रचना आणि शरीरक्रिया असणाऱ्या जीवांच्या अपत्यांमध्ये फायदेशीर गुण एकत्र आले तर असे जीव जीवनसंघर्षात टिकून राहतात. थिओडोसियस यांच्या अभ्यासामुळे हा दृष्टीकोन बदलायला मदत झाली. त्यांनी फळमाशीची नैसर्गिक अधिवासात विनेगारवर पोषण होणारी जात ड्रॉसॉफिला सुडोऑबस्क्यूरा (Drosophila pseudoobscura), अशा कीटकांच्या केलेल्या अभ्यासातून थिओडोसियस यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे केली. एक प्राणी जाती विभागून प्राण्यांचे दोन गट (वाण) कसे होतात, पुढे त्यांत आणखी बदल होऊन दोन प्राणीजाती कशा निर्माण होतात (speciation) हे पाहिले. या प्रयोग आणि निरीक्षणांचे वैशिष्टय म्हणजे यासाठी केवळ काही महिन्यांचा कालावधी लागला. घातक उत्परिवर्तने (lethal genes) जवळजवळ प्रत्येक गुणसूत्रावर असतात. परंतु एखाद्या सजीवात ती जोडीने समजातीय गुणसूत्रांवर असली तरच ती जीवघेणी ठरतात, हे थिओडोसियस यांनी सिद्ध केले. गुणसूत्रावर जनुके रांगेने रचलेली असतात. गुणसूत्रावर गुणसूत्रबिंदू असतो अशा तत्वतः माहीत असलेल्या गोष्टी थिओडोसियस यांनी प्रत्यक्ष प्रयोगाने दाखवल्या.

त्यांना प्रवासाची आवड होती. उत्तर धृवाजवळील अलास्कापासून दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकाकडील टिएरा डेल फुएगो द्वीपसमूहापर्यंत ते अभ्यासासाठी फिरले. जगातील विस्तृत भूभागातून, खरेतर अंटार्क्टिकाशिवाय इतर सर्व खंडांतले सजीवांचे नमुने त्यांनी जमविले. थिओडोसियस यांना सहा भाषांचे उत्तम आणि अन्य कित्येक भाषांचे जुजबी ज्ञान होते. घोडेस्वारी, इतिहास, संगीत, पायी भटकंती असे अनेक छंद त्यांना होते.

इजिप्त, ब्राझील, चिली यांसारख्या देशांत डॉब्झॅन्सकींच्या प्रेरणेने अनुवंशशास्त्र आणि उत्क्रांतीशास्त्र प्रयोगशाळा चालू करण्यात आल्या. थिओडोसियस यांनी १९१८ पासून सुरू झालेल्या आपल्या सुमारे पस्तीस वर्षांच्या कार्यकालात पाचशे अडुसष्ट लेख आणि वैचारिक तथा शोधनिबंध अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांत प्रकाशित केले. त्यांनी उत्क्रांतीशास्त्र, अनुवंशशास्त्र, जीवाश्मशास्त्र, मानवतावाद, तत्त्वज्ञान या ज्ञानक्षेत्रातील आपली विचारसंपदा मांडणारे डझनभर ग्रंथ लिहिले. विषय अगदी भिन्न वाटले तरी त्यांना जोडणारे सूत्र होते, उत्क्रांती सिद्धांत. त्यांपैकी मुख्य ग्रंथ म्हणजे बायॉलॉजिकल बेसिस ऑफ ह्युमन फ्रीडम; मनकाइंड इव्हॉल्विंग; उत्क्रांती आणि धर्म यांचा उहापोह करणारे बायॉलॉजी ऑफ अल्टिमेट कन्सर्न आणि जेनेटिक्स ऑफ द इव्हॉल्युशनरी प्रोसेस.

थिओडोसियस यांना गणित, संख्याशास्त्र अशा शाखांचे विशेष ज्ञान नव्हते पण त्या विषयतज्ज्ञांची मदत घेऊन ते आपण जमवलेल्या माहितीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत. थिओडोसियस यांच्या प्रयत्नांमुळे ‘अनुवंशशास्त्र’ ही नवी ज्ञानशाखा उदयास आली. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ घेण्यास उत्सुक, तरूण संशोधक, विविध देशांतून थिओडोसियस यांच्या प्रयोगशाळेत काम करण्यासाठी येत असत. थिओडोसियस यांच्याकडून संशोधनाबद्दल नवा दृष्टीकोन, नवी कौशल्ये शिकत असत.

थिओडोसियस यांची यु. एस. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून निवड झाली. द अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस अँड सायन्सेसचे आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्यत्व त्यांना मिळाले होते. परदेशातील प्रमुख प्रतिष्ठित संस्थांनी – द रॉयल सोसायटी ऑफ लंडन,  द रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस, द रॉयल डॅनिश अकादमी ऑफ सायन्सेस, द ब्राझिलियन अकादमी ऑफ सायन्सेस, जर्मनीतील द अकादमिया लिओपोल्डिना, इटालीतील अकादेमिया नॅसिओनाले दे लिन्चे यांनी थिओडोसियस यांना मानद परदेशीय सदस्यत्व दिले.

थिओडोसियस जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिका, सोसायटी फॉर द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन, अमेरिकन सोसायटी ऑफ झूलॉजिस्टस, द अमेरिकन तिलहार्ड द चार्दिन असोसिएशन, द बिहेविअर जेनेटिक्स असोसिएशन या संस्थांचे अध्यक्ष होते.

त्यांना ल्युकेमिया हा रक्त कर्करोग झाला होता. या रोगाशी त्यांनी सात वर्षे लढा दिला. मात्र हृदयविकाराने त्यांचे अमेरिकेतील डेविस, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा