विजय राघवन, कृष्णस्वामी : (३ फेब्रुवारी १९५४-) कृष्णस्वामी विजय राघवन, यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला. विजयराघवन यांनी आयआयटी कानपूरमधील रासायनिक अभियांत्रिकीतून बी. टेक. आणि एम. टेक. केले. मुंबईतील टी.आय.एफ.आर.मधील ज्येष्ठ ओबेद सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली रेण्वीय जीवशास्त्रात त्यांनी पीएच्.डी. केली. त्यानंतर त्यांनी अल्पकाळ केंब्रिज मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या प्रयोगशाळेत प्रशिक्षण घेतले. पुढे ते वर्षभर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधक अभिछात्र होते. त्यानंतरची दोन वर्षे ते कॅल्टेकमध्येच वरिष्ठ संशोधक अभिछात्र होते. सिद्दिकींच्या सल्ल्यावरून ते मुंबईत टी.आय.एफ.आर.मध्ये परतले. सिद्दिकी, विजय राघवन आणि अन्य ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून १९९२ साली बंगळुरुत नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस (NCBS) ही संस्था साकारली. सिद्दिकींनंतर एनसीबीएसच्या संचालक पदाची धुरा विजय राघवन यांच्याकडे आली. ती त्यांनी सलग सोळा वर्षे समर्थपणे सांभाळली.
विजय राघवन यांनी फळमाशी ड्रॉसॉफिला मेलॅनोगॅस्टर वर (Drosophila melanogaster) काम केले. त्यातून चेतापेशी आणि स्नायूपेशी भ्रूण अवस्थेत कशा वाढतात, स्नायूपेशींचे, विशेषतः उडण्यासाठी लागणाऱ्या स्नायूंचे नियंत्रण करणारी नेमकी जनुके कोणती आहेत हे कळले. हॉक्स HOX नामक जनुकसंच, कीटक भ्रूणातील चेतापेशी, स्नायूपेशी वाढीवर, पेशीय आणि रेण्वीय पातळीवर नियंत्रण ठेवतात. त्यातून गुंतागुंतीची वर्तणूक कशी घडते हे समजण्यास विजय राघवन यांच्या अभ्यासामुळे मदत झाली.
राघवन अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. २०१३ पासून पाच वर्षे ते दिल्लीत डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे, कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, सीएसआयआरचे सचिव पद आणि पृथ्वीविज्ञान मंत्रालय, तसेच आरोग्य विभागाचे सचिव पद, यांचा अतिरिक्त पदभार होता.
स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, रॉयल सोसायटीचे सदस्य, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस यूकेचे सदस्यत्व, यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशी मानद सदस्यत्व, इन्फोसिस पदक, एच. के. फिरोदिया ॲवार्ड, पद्मश्री असे सन्मान त्यांना मिळाले. त्यांची बुद्धिमत्ता, संघटनात्मक आणि प्रशासकीय कुशलता लक्षात घेऊन एप्रिल २०१८ मध्ये भारत सरकारने त्यांची मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक केली. या अधिकारात ते आधुनिक ज्ञान इंग्रजीतून प्रमुख भारतीय भाषांत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
राघवन यांनी अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांत संशोधन निबंध लिहिले आहेत. नेचर; जर्नल ऑफ सेल बायॉलॉजी; सेल; न्यूरल सिस्टिम्स अँड सर्किट्स; जर्नल ऑफ मॉलेक्युलर बायॉलॉजी; प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस; जर्नल ऑफ न्यूरोसायन्स, इत्यादी. पत्रिकांत त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. इ-लाईफ या वैज्ञानिक नियतकालिकाचे ते मुख्य संपादक आहेत.
ते इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे सदस्य आहेत. जपानमधील, ओकिनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील, हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूटच्या जॅनेलिया प्रयोग संकुलातील संशोधन संस्थेचे वैज्ञानिक सल्लागार आहेत. तसेच यूरोपियन मॉलेक्युलर बायॉलॉजी ऑर्गनायझेशनचे परदेशी सदस्य आहेत.
संदर्भ :
- https://www.thebetterindia.com/135783/krishnaswamy-vijayraghavan-biologist-india-principal-scientific-advisor/
- https://www.psa.gov.in/mission/national-biodiversity/35
- https://researchmatters.in/ta/node/793
- https://www.psa.gov.in/mission/bioscience-human-health/37
समीक्षक : मोहन मद्वाण्णा