अंबा : महाभारतातील एका उपाख्यानाची नायिका. महाभारताच्या आदिपर्वात आणि उद्योगपर्वात हे उपाख्यान येते. महाभारताच्या कथानकाच्या दृष्टिकोणातून हे अतिशय महत्त्वाचे उपाख्यान आहे आणि त्याचप्रमाणे त्याची नायिका सुद्धा महत्त्वाची आहे. ज्येष्ठ अभ्यासक रॉबर्ट गोल्डमन यांच्या मतानुसार महाभारतातील उपाख्याने ही दुय्यम नसून प्रमुख कथानकाला पुढे नेणारी आहेत. अंबेचे उपाख्यान उद्योगपर्वात येण्यामागचे पण हेच कारण असावे. महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या वाटाघाटी उद्योगपर्वात येतात. जिथे या युद्धाची अटळता निश्चित होते तिथे अंबेचे उपाख्यान येते. दुर्योधन पितामह भीष्मांना विचारतो, “तुम्ही शिखण्डीशी युद्ध का करणार नाही?” तेव्हा त्याच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून भीष्म अंबेचा (शिखण्डीचा) पूर्ण वृत्तांत सांगतात.
अंबा ही काशीराजाची कन्या आहे. अंबा, अंबिका, अंबालिका ह्या काशीराजाच्या तीन कन्या आहेत. महाभारताच्या आदिपर्वात आणि उद्योगपर्वात या तिघींच्या स्वयंवराची कथा येते. विचित्रवीर्य या हस्तिनापुराच्या युवराजासाठी भीष्म या तिघींचे अपहरण करतात. त्यावेळी अंबा त्यांना सांगते की, माझे सौबलदेशाच्या शाल्वराजावर प्रेम असून, मी त्याला मनाने पती म्हणून वरले असल्यामुळे मी अन्य कोणाची पत्नी होऊ शकत नाही. त्यावर भीष्म तिला त्याच्याकडे जाण्याची अनुमती देतात. त्याप्रमाणे ती त्याच्याकडे जाते. पण तिचे विवाहासाठी अपहरण होताना शाल्व भीष्मांकडून पराभूत झालेला असल्यामुळे तिच्याशी विवाह करायला अतिशय अपमानास्पद पद्धतीने नकार देतो. त्यामुळे ती स्वतःचा, स्वतःच्या पित्याचा आणि भीष्मांचा धिक्कार करते. त्यानंतर ती शास्त्रांमधे आणि आरण्यकांमधे तज्ज्ञ असलेल्या शैखावत्य नावाच्या एका तापसाच्या आश्रमात आश्रयासाठी जाते आणि आपला वृत्तांत कथन करते. तिच्या प्रव्राजिका होण्याच्या निर्णयाला हे सगळे तापस विरोध करतात. ही सगळी चर्चा सुरू असताना तिथे तिचे मातामह राजर्षी होत्रवाहन येतात. ते तिला जामदग्न्य परशुरामांकडे जाण्याचे सुचवतात. ते तुझ्या दुःखाचा नाश करतील आणि भीष्मांचा पराभव करतील असे सांगतात. ही चर्चा सुरू असतानाच परशुरामशिष्य अकृतव्रण हे तिथे येतात. अंबेचा वृत्तांत ऐकून ते चिंतित होतात. दुसर्या दिवशी सकाळी परशुराम स्वतःच शैखावत्य आश्रमात येणार असल्याचे निवेदन करतात. अंबा त्यांच्याकडे भीष्मांना युद्धात पराभूत करण्याची मागणी करते. परशुराम स्वतः काही ब्राह्मणांसह त्या कन्येला घेऊन कुरुक्षेत्रात येतात आणि सरस्वतीच्या तीरावर वास करतात. शक्यतो हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा असेच त्यांच्या मनात असते. भीष्म जेव्हा त्यांना भेटायला जातात तेव्हा ते समजावून सांगायचा प्रयत्न करतात की, तुझ्यामुळे ही अंबा स्त्रीधर्मापासून च्युत झाली आहे. पण भीष्म त्यांचे म्हणणे मान्य करत नाहीत. त्या वादाचे पर्यवसान शेवटी युद्धात होते. हे युद्ध प्रदीर्घ काळ चालते. शेवटी भीष्म प्रस्वाप अस्त्राचा प्रयोग करण्याचे ठरवतात. त्यावेळी नारद आणि परशुरामांचे पितर तिथे येऊन ह्या दोघांची समजूत घालून हे युद्ध थांबवतात.
निराश झालेली अंबा यमुनेच्या तीरावरील ऋषींच्या आश्रमात जाऊन घोर तपश्चर्या सुरू करते. एक दिवस गंगा तिच्यासमोर प्रकट होते. गंगेला तिच्या तपश्चर्येचे कारण कळते तेव्हा, गंगा तू फक्त पावसाळ्यातच वाहणारी क्षुद्र नदी होशील असा शाप देते. गंगेच्या शापानंतरही तपश्चर्येच्या सामर्थ्यामुळे तिचे अर्धे शरीर नदीचे होते आणि अर्धे शरीर स्त्रीचेच राहते. तरीही अंबा तिची तपश्चर्या सोडत नाही. भीष्मांचा वध केल्याशिवाय मला शांती मिळणार नाही असे निश्चयावर ठाम राहून ती सांगते. स्त्रीत्वामुळे मला ह्या त्रिशंकू अवस्थेला सामोरे जावे लागले, म्हणून मी आता पौरुष प्राप्त करण्यासाठी शिवाची आराधना करते आहे, असे प्रतिपादन करून ती शिवाची आराधना सुरू करते. तू तुझ्या पुढच्या जन्मात भीष्मांचा वध करशील. पण त्याही जन्मी तू स्त्री म्हणून जन्माला येशील आणि नंतर तू एका पुरुषाचे रूप धारण करशील. पण भीष्मांचा वध तुझ्याच हातून होईल, असा वर देऊन शिव अंतर्धान पावतात. त्यानंतर अंबा एक चिता रचते आणि त्या चितेत उडी मारते.असे विस्तृत वर्णन महाभारतात अंबेबद्दल आले आहे.
द्रुपदराजा हा पुत्रप्राप्तीसाठी शिवाची आराधना करत असतो. त्याला शिव वर देतो की, तुला कन्येची प्राप्ती होईल पण कालांतराने हीच कन्या पुरुषत्व धारण करेल. द्रुपदराजा आपल्या कन्येचे शिखण्डिनी असे नामकरण करतो. मात्र तो आणि त्याची राणी तिला पुत्रवत् वाढवतात. आणि हे रहस्य त्या दोघांव्यतिरिक्त फक्त भीष्मांना त्यांच्या चारांकडून माहीत होते. पण जेव्हा तिच्या विवाहाचा प्रश्न येतो तेव्हा स्थूणाकर्ण नावाच्या यक्षाकडून ती त्याचे पौरुष प्राप्त करून घेते आणि स्वतःचे स्त्रीत्व त्याला प्रदान करते. द्रौपदी आणि शिखण्डी ह्या दोघीजणी द्रुपदराजाच्या कन्या होत आणि त्या दोघीही महाभारतीय युद्धाला कारणीभूत ठरतात. भीष्म स्वतःच सांगतात त्याप्रमाणे, ते इच्छामरणी तर आहेतच पण त्यांनी अंगीकारलेल्या व्रतानुसार स्त्रीवर, पूर्वी स्त्री असणार्या पण नंतर पुरुष झालेल्या व्यक्तीवर, स्त्रीचे नाव असणार्या, स्त्रीचे रूप धारण करणार्या व्यक्तीवर ते बाण सोडणार नाहीत. त्यामुळे महाभारताच्या युद्धात शिखण्डीची ढाल करून अर्जुन भीष्मांना शरशय्येवर झोपवण्यात यशस्वी होतो.
संदर्भ :
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, महाभारत (चिकित्सित संशोधित आवृत्ती), पुणे, १९६६-६९.
समीक्षक : मंजूषा गोखले