जरा : महाभारत या महाकाव्यातील एक प्रसिद्ध पात्र. जरेची कथा महाभारताच्या सभापर्वातील (अध्याय १६, १७) एका उपपर्वात येते. ह्या उपपर्वाचे नाव जरासंधवधपर्व असे आहे. यात जरासंधाच्या जन्माची कथा आणि त्याच्या नावाची व्युत्पत्ती ज्या राक्षसीच्या नावावरून येते ती मांसशोणितभोजना (मनुष्याचे रक्त आणि मांस खाऊन जगणारी) राक्षसी यांचे वर्णन आढळते. मगधदेशात बृहद्रथ नावाचा राजा होता. त्याला काशीराजाच्या जुळ्या कन्या असणार्‍या दोन बायका होत्या. एकदा चण्डकौशिक ऋषी तिथे येतात. तेव्हा राजा आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी अशी इच्छा बोलून दाखवतो. चण्डकौशिक ऋषी प्रसाद म्हणून एक फळ देतात. ते दोन्ही बायका अर्धेअर्धे खातात. परिणामवशात काही महिन्यांनी त्या जेव्हा प्रसूत होतात तेव्हा मानवी शरीराच्या दोन अर्धशकलांना जन्म देतात. राजा सत्वर दोन दासींना बोलावून ती शकले फेकून देण्यासाठी सांगतो. त्या दासी ती दोन शकले नगरातील एका चतुष्कोणात टाकून देतात. त्याचवेळी तिथे जरा नावाची राक्षसी येते. ती खाण्यासाठी म्हणून ही दोन शकले उचलते, तेव्हा उचलताक्षणीच ती दोन शकले जोडली जातात आणि ते बाळ जिवंत होऊन जोरात रडू लागते. अशा तर्‍हेने त्या बाळाला पुन्हा जन्म मिळतो. त्याचे नाव या राक्षसीच्या नावावरूनच ठेवले जाते. “जरया संधितो यस्मात् जरासंधःस उच्यते” जरेकडून सांधला गेला म्हणून हा जरासंध अशी त्याच्या नावाची व्युत्पत्ती येते. ही राक्षसी त्या बाळाला घेऊन बृहद्रथ राजाकडे जाते. ह्या कथानकात बृहद्रथ राजा ह्या राक्षसीसाठी जी विशेषणे वापरतो त्यातून ह्या राक्षसीची एक वेगळीच सकारात्मक प्रतिमा साकार होते. अराक्षसी, कल्याणी, नवहेमाभा, पुत्रप्रदायिनी अशी विशेषणे वापरून राजा तिला देवतेची उपमा देतो. तुझ्या घरात माझे नित्य पूजन केले जाते, त्यामुळे उपकार म्हणून मी ह्या दोन शकलांना एकत्र जोडले अशी भावना व्यक्त करून ती राक्षसी अंतर्धान पावते. ह्या कथानकातच ही राक्षसी म्हणजे देवता असल्याचा ओझरता उल्लेख आला आहे. ही राक्षसी जिवती नावाच्या लहान मुलांचे रक्षण करणार्‍या देवेतेशी साम्य दाखवते. सतराव्या शतकातील महाभारताचा टीकाकार नीलकंठ जरेच्या धार्मिक विधीचे वर्णन करतो.

संदर्भ :

  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, सभापर्व (महाभारत चिकित्सित संशोधित आवृत्ती), पुणे, १९६६-६९.

समीक्षक : मंजूषा गोखले