सावित्री : महाभारतातील एक प्रसिद्ध पात्र. सावित्रीचे उपाख्यान हे महाभारताच्या वनपर्वात येते. वनवासात असताना युधिष्ठिर मार्कण्डेय ऋषींशी राज्यापहरण आणि द्रुपदकन्या द्रौपदी यांविषयी बोलत असतो. द्रौपदीसारख्या अतिशय भाग्यवान आणि पतिव्रता स्त्रीला पाहिलं आहे का किंवा तिच्याविषयी ऐकलं आहे का? त्या प्रश्नाचे उत्तर देताना मार्कण्डेय ऋषी सावित्रीची कथा सांगतात. महाभारतात येणारं हे उपाख्यान अत्यंत महत्त्वाचं आहे. महाभारताची नायिका असणारी द्रौपदी आणि तिच्याशी सर्वार्थाने तुल्य असणारी ह्या उपाख्यानाची नायिका सावित्री ह्या दोन व्यक्तिरेखांमधे असणारं साधर्म्य खूपच महत्त्वाचं आहे.

सावित्री ही मद्रदेशाच्या अतिशय धर्मशील असणार्‍या अश्वपती राजाची कन्या आहे. निपुत्रिक असणारा राजा सातत्याने १८ वर्षे सावित्रीमंत्राचा प्रयोग करून यजन करतो. तेव्हा प्रत्यक्ष सावित्री ही देवता त्याच्यासमोर प्रकट होते आणि तेजस्वी कन्याप्राप्तीचा वर देते. राजाला एक अतिशय तेजस्वी आणि बुद्धिमान अशी कन्या होते. सावित्रीच्या यजनामुळे आणि वरामुळे झालेली कन्या म्हणून सावित्री असेच तिचे नामकरण केले जाते. सावित्री लग्नाच्या वयात येते, ती एखाद्या सुवर्णाच्या पुतळीसारखी दिसू लागते. तिच्याकडे पाहून, ही कोणी एक देवकन्याच असावी असे लोकांना वाटू लागते. पण तिच्या तेजस्वितेमुळेच एकही राजपुत्र तिची पत्नी म्हणून निवड करत नाही. शेवटी निरुपाय होऊन राजा तिला पती शोधायला सांगतो. आपल्या पित्याची आज्ञा घेऊन, एका सुवर्णाच्या रथावर आरूढ होऊन सावित्री स्वतःच काही सेवकांना बरोबर घेऊन, स्वतःसाठी पती शोधायला बाहेर पडते. शाल्वदेशाचा राजा द्युमत्सेन याचा पुत्र सत्यवान याची ती आपला पती म्हणून निवड करते.

त्यावेळी सावित्री द्युमत्सेन राजाचा सर्व वृत्तांत सांगते. राजाला अंधत्व आलेले असते. त्याच्याच काही जवळच्या माणसांनी पूर्ववैमनस्यातून त्याचे राज्यही हिरावून घेतलेले असते. पण तरीही सावित्री सत्यवानाच्या गुणांकडे पाहून त्याचीच आपला पती म्हणून निवड करते. हे सगळे ती आपल्या पित्याला आणि नारदमुनींना सांगते. राजा अश्वपती नारदमुनींच्याकडे सत्यवानाच्या गुणांविषयी विचारणा करतो. तेव्हा नारद त्याचे सर्व गुण सांगतात. दोषांविषयी सांगताना आजपासून एका वर्षानंतर त्याचा मृत्यू होणार आहे असेही नमूद करतात. त्यामुळे राजा आणि नारदमुनी तिला या विवाहापासून परावृत्त करू पाहतात. पण सावित्री तिच्या निश्चयावर ठाम रहाते. त्यानंतर सावित्रीचा सत्यवानाशी विवाह होतो. ती सर्व आभरणांचा त्याग करून वल्कले धारण करते आणि सासूसासर्‍यांची सेवा करते. जेव्हा सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ यायला लागतो तेव्हा ती रात्रंदिवस उभी राहून, तीन दिवसांचे कठोर व्रत करते. त्या व्रताच्या समाप्तीनंतर तिला आशीर्वाद मिळतो.

सत्यवान वनात वनात लाकडॆ तोडत असताना परिश्रमाने श्रान्त होऊन कोसळतो. त्यावेळी सावित्रीला एक पुरुष येताना दिसतो, जो यम असतो. तो  सत्यवानाच्या शरीरातून अंगठ्याएवढ्या दिसणार्‍या पुरुषाला (अंतरात्म्याला) काढून घेऊन जाऊ लागतो. तेव्हा सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागते. यम तिला परत जाऊन मृत्यूनंतरचे विधी करायला सांगतो. त्यावर ती माझ्या पतीला जिथे नेले जात आहे किंवा तो जिथे जात आहे तिथे जाणे हा माझा धर्म आहे, असे सांगते. सत्यवानाच्या बरोबर जाणे हा पतिव्रताधर्म आहे असेही ती सांगते. त्यावेळी ती धर्म ह्या विषयावर साकल्याने चर्चा करते.

यम तिच्या स्वरव्यञ्जनयुक्त आणि तर्कसुसंगत वाणीने प्रसन्न झाल्याचे सांगतो आणि वर देण्याचे मान्य करतो; मात्र पतीचे प्राण सोडून काहीही माग ही अट घालतो. सावित्री पहिल्या वराने स्वतःच्या सासर्‍याची दृष्टी आणि बल मागून घेते. दुसर्‍या वराने स्वतःच्या सासर्‍याचे राज्य परत मागून घेते. ती यमाची स्तुती करते. त्यावर तिसर्‍या वराने ती तिच्या पित्याला पुत्र प्राप्त होतील हा वर मागून घेते. सावित्री ही एक अतिशय बुद्धिमान आणि संवादकुशल स्त्री असते म्हणून ती यमाशी संवाद साधते. यम तिला परत फिरायला सांगतो ; मात्र माझ्या पावलांच्या वेगापेक्षा माझ्या मनाचा वेग कितीतरी जास्त आहे असे बोलून ती यमावर प्रभाव टाकते. तू विवस्वानाचा पुत्र वैवस्वत आहेस, तू धर्माचे काटेकोर पालन करून प्रजेचं रक्षण करणारा आहेस, म्हणूनच तुला धर्मराज असे संबोधले जाते, असा स्तुतीपर संवाद ती साधते. तिच्या संवादकौशल्यामुळे प्रसन्न होऊन यम चवथ्या वरामधे सत्यवानापासून शत औरस पुत्र प्राप्त होतील असा वर देतो. शेवटी यम हे मान्य करतो की, सावित्रीच्या धर्माला अनुसरून बोललेल्या वचनांमुळे त्याचे मन अनुकूल होते आणि तो सत्यवानाला पाशातून मुक्त करतो. ही कथा वटपौर्णिमा ह्या व्रताबरोबर कहाणी म्हणून सांगितली जाते.

संदर्भ :

  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, वनपर्व (महाभारत चिकित्सित संशोधित आवृत्ती), पुणे, १९६६-६९.

समीक्षक : मंजूषा गोखले