मोदी, चिनू : (३० सप्टेंबर १९३९- १९ मार्च २०१७). गुजराती आणि उर्दू या दोन्ही भाषांमध्ये सकस लेखन करणारे गुजराती कवी, कादंबरीकार आणि समीक्षक. वडील चंदुलाल तर आई शाशिकांताबेन या दाम्पत्यापोटी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अहमदाबाद जवळील विजापूर आणि धोलका या गावांत झाले. गुजराती भाषा आणि इतिहास या विषयातून त्यांनी पदवी शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय अहमदाबाद येथून पूर्ण केले. विधी शाखेतूनही त्यांनी पदवी प्राप्त केली होती. गुजराती भाषेतील खंडकाव्य या विषयावर संशोधन करून त्यांनी आचार्यपदवी प्राप्त केली (१९६८). अहमदाबाद आणि परिसरातील विविध महाविद्यालातून त्यांनी गुजराती साहित्य अध्यापनाचे कार्य केले (१९६१ ते २००१). भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अहमदाबाद येथेही त्यांनी सेवाकार्य केले आहे.
चिनू मोदी यांची साहित्य संपदा – कवितासंग्रह :- व्यातन (१९६३), उरनाभ (१९७४), शापित वनमा (१९७६), देशावतो (१९७८), क्षीण ना महेल्मा, दर्पण नी गालिमा (१९७५), इरशादगढ (१९७९), अफवा (१९९१), इनायत (१९९६); नाटक :- दयाल ना पंखी (१९६७), कॉलबेल (१९७३), हुकुम मलिक (१९८४), जलाका (१९८५),अश्वमेघा (१९८६), नैषाधय (१९९६), शुकदान (२०००), धोलीदो (२००८); कादंबरी :- भाव-अभाव (१९६९), भावचक्र (१९७५), लीला नाग (१९७१), दहेशत (२००४), पद्छायन मानस (२००८); आत्मकथन :- जलसा अवतार (२०१४) इत्यादी. चिनू मोदी यांची कविता ही छंदात्मक आहे. मानवी जीवनाला व्यापून उरणारी उदासीनता हा त्याच्या कवितेतील प्रकट असणारा भाव आहे. मानवी जीवनातील दुःखाची अपरिहार्यता त्यांच्या कवितेतून अभिव्यक्त झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कवितेतून सौंदर्यानुभव आणि जीवनमुल्यांतील उपरोधिकता व्यक्त होते. त्यांच्या कवितेवर अस्तित्त्ववादाचा प्रभाव जाणवतो. यंत्रसंस्कृतीने मानवी जीवनाने घेतलेला ताबा आणि शास्त्रापेक्षा व्यवहार मोठा हे त्यांच्या नाटकातील मुख्य विषय आहेत. त्यांची नाटके प्रयोगशील आहेत. अश्वमेघा हे एका स्त्रीमधील लैंगिक उत्कटतेचे आणि त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीचे चित्रण करणारे त्यांचे एक उल्लेखनीय तीन अंकी नाटक आहे, जे बळी देणारा घोडा आणि अश्वमेघ करणारी राजाची राणी यांच्यातील लैंगिक संभोगाच्या शास्त्रोक्त विधीवर आधारित आहे. एकांकिका ते बहुविध नाटकांपर्यंत त्यांची लेखकीय वाटचाल झाली आहे.त्याच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादेमी, वाली गुजराथी आणि नरसी मेहता असे मानाचे पुरस्कार लाभले आहेत.
अल्पशा आजाराने अहमदाबाद येथे त्यांचा मृत्यू झाला.