वज्रसेनसूरी : (इ.स. १२ वे शतक). मध्यकाळातील जैनकवी. गुजरातमधील जैनसाधू देवसूरी (वादिदेवसूरी) यांचे हे शिष्‍य. देवसूरीचा आयुष्‍यकाल इ. स. १०८५ ते ११७० असा नोंदवण्‍यात आला आहे. त्‍यामुळे वज्रसेनसूरी हे १२ व्‍या शतकात हयात असावेत असे अनुमान काढले जाते. वज्रसेनसूरी यांनी भरतेश्‍वर बाहुबली -घोर या कृतीची रचना केली असून त्‍यात ऋषभदेवाचे दोन पुत्र, भरत आणि बाहुबली यांच्‍यात झालेल्‍या घोर संग्रामाचे वीररसप्रधान चित्रण करण्‍यात आले आहे. आतापर्यंत उपलब्‍ध अशा गुजराती साहित्‍य कृतीतील सर्वात प्राचीन साहित्‍यकृतीचा मान तिला देण्‍यात येतो. इ. स. ११८५ मधील भरतेश्‍वर बाहुबलि रास या साहित्‍यकृतीपेक्षा या कृतीची भाषा जुनी आहे यावरूनही प्रस्‍तुत कृतीची प्राचीनता लक्षात येते. स्‍थानिक भाषेत झालेली लेखनाची सुरूवात या कृतीच्या निवेदनात्‍मक पद्यातून दिसून येते.

संदर्भ:वैद्य, भारती, मध्यकालीन राससाहित्य, १९६६.