रेड्डी, जी. राम (Reddy, G. Ram) : (४ डिसेंबर १९२९ – २ जुलै १९९५). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, दुरस्त शिक्षणाचे विशारद आणि भारतातील मुक्त शिक्षणाचे जनक. रेड्डी यांचा जन्म करीमनगर (तेलंगणा राज्य) जिल्यातील मायलाराम या छोट्या खेड्यात एका अल्पशिक्षित कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किस्या आणि आईचे काटथाम्मा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मायलाराम येथे झाले. नंतरच्या शिक्षणासाठी ते करीमनगर येथे गेले आणि उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले. तेथे त्यांना पहिल्यांदाच शालेय पुस्तकांव्यतिरिक्त इतरही पुस्तके व वर्तमानपत्र असतात याची माहिती झाली. रेड्डी लहानपणापासूनच अभ्यासू व हुशार होते. त्यांना वाचनाची फार आवड होती. त्यांच्या गावातून शालेय शिक्षण घेणारे ते पहिलेच विद्यार्थी होते. रेड्डी यांनी इ. स. १९४९ मध्ये हैदराबाद येथील उस्मानीया विद्यापीठातील निझाम कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शालेय शिक्षण उर्दू माध्यमातून झालेले असल्यामुळे शहरातील संस्कृती आणि इंग्रजी माध्यम यांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी १९५५ मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर राज्यशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करून नालगोंडा येथे प्राध्यापक म्हणून शिकविण्यास सुरुवात केली. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी म्हणजे १९५७ मध्ये ते लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्समध्ये अभ्यासासाठी प्रयाण केले.
रेड्डी यांनी लंडनहून परत आल्यानंतर कला महाविद्यालयात लोकप्रशासन या विषयासाठी १९५९ ते १९७७ या कालावधीत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून कार्य केले. नंतर १९७७ मध्ये ते वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू झाले. या काळात विद्यार्थी संघटना कार्यरत होत्या. त्यांची प्रवेश योग्यता, सौम्यता आणि लोकशाही मूल्यांमुळे, तसेच आपल्या क्षमतांचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांची निदर्शने पोलिसांची मदत न घेता थांबविले. कुलगुरू असतानाच त्यांनी युनायटेड किंगडममध्ये पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. भारतातही मुक्त विद्यापीठाची गरज आणि शक्यता त्यांच्या लक्षात आली. दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेण्याच्या संधी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी सरकारला पटवून दिले. त्यानंतर १९८२ मध्ये हैदराबाद येथे आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात ते यशस्वी झाले.
भारत सरकारने मार्च १९८५ मध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा आराखडा विकसित करण्यासाठी मुख्य सल्लागार म्हणून रेड्डी यांची नेमणूक केली. त्यांनी के. सी. पंत मानव संसाधन विकास मंत्री यांना जुलै ते सप्टेंबर महिन्यात अहवाल सादर केला. त्यानुसार २० ऑगस्ट १९८५ रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ स्थापनेबाबतचे बील सभेमध्ये मान्य करण्यात आले. सप्टेंबर १९८५ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापन होऊन रेड्डी यांनाच प्रथम कुलगुरू म्हणून नेमणूक देण्यात आली. त्यांचे राजकीय आणि शासकीय व्यक्तींशी चांगले संबंध होते. नवीन विद्यापीठासमोरील आव्हानांना त्यांनी सामर्थ्याने तोंड दिले. संपूर्ण देशात प्रवास करून अभ्यासकेंद्रांची स्थापना आणि समाजाला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले.
रेड्डी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली. त्यांची आशिया खंडातील मुक्त विद्यापीठाच्या संघटनेचे (असोसिएशन ऑफ एशियन ओपन युनिव्हर्सिटी) सचिव म्हणून निवड झाली. त्याच प्रमाणे ते आंतरराष्ट्रीय दूरशिक्षण परिषदेचे (इंटरनॅशनल कौंसिल फॉर डिस्टंस एज्युकेशन) सदस्य होते. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग याच्या विकासासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याकडे मुक्त विद्यापीठातील अध्यापन साहित्य कौशल्य आणि अनुभवांच्या देवाण-घेवाणीसाठी प्रेरक म्हणून जबाबदारी देण्यात आली.
भारत सरकारने १९९१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) अध्यक्ष म्हणून रेड्डी यांची नियुक्ती केली. अध्यक्ष म्हणून त्यांनी युजीसी कार्यात झोकून दिले. या वेळी त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध कल्पना राबविल्या. युजीसीचे विकेंद्रीकरण करून विभागीय केंद्रांची स्थापन केली. उच्च शिक्षणातील गुणवत्ता आश्वासित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅशनल असेस्मेन्ट अँड ॲक्रेडिटेशन कौंसिल) स्थापना केली.
दूरशिक्षणातील भरीव कार्याबद्दल १९९४ मध्ये श्री राजा लक्ष्मी फाउंडेशन पुरस्कार; जून १९९५ मध्ये बर्म्हीमगम, लंडन येथे त्यांना आंतरराष्ट्रीय दूरशिक्षण परिषदेमध्ये संपूर्ण दूरशिक्षण समुदायातर्फे ‘भारतातील दूरशिक्षणाचे पिता’ म्हणून गौरविण्यात येऊन अवॉर्ड ऑफ एक्सलन्स हा पुरस्कार देण्यात आला.
रेड्डी यांच्या स्मरणात आंध्र प्रदेश सरकारने उस्मानिया विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राला ‘जी. राम रेड्डी दूरशिक्षण केंद्र’ असे नाव दिले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी त्यांच्या नावाने स्मृती व्याख्यानाची योजना राबविण्यात येते.
रेड्डी यांनी पुढील महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे : रिजनॅलिझ्म इन इंडिया, १९७९; गव्हर्नमेंट अँड पप्लिक इंटरप्राइझ, १९८३; पब्लिक पॉलिसी अँड द रुरल पुअर इन इंडिया, १९८५; सेंटर स्टेट फायनॅन्शिअल रिलेशन, १९८८; हायर एज्युकेशन इन इंडिया, १९९५; इंडियन फिस्कल फेडरॅलिझ्म, २०१९; ओपन अँड फ्लेक्झिबल लर्निंग इत्यादी.
रेड्डी यांचे लंडन येथे निधन झाले.
समीक्षक : ह. ना. जगताप