कानुंगो, मधुसूदन : (१ एप्रिल १९२७ – २६ जुलै २०११) मधुसूदन कानुंगो यांचा जन्म ओडिशातील बेहरामपुर येथे झाला. उत्कल विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी लखनौ विद्यापीठातून प्राणिविज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कटक येथील रेवनशॉ महाविद्यालयात प्राणिविज्ञानाचे अध्यापन करण्यापूर्वी काही काळ त्यांनी लखनौ विद्यापीठामध्ये संशोधन केले होते. प्रख्यात वैज्ञानिक क्लिफोर्ड लॅड प्रोसर यांच्या मार्गदर्शनाखाली इलिनोय विद्यापीठाची उरबाना-शॅम्पेन येथून शरीरक्रियाविज्ञानातील पीएच्.डी. त्यांनी मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय तापमान बदलाचे गोल्ड फिशच्या ऑक्सिजन वापरावर जैवरासायनिक बदल हा होता. या कामाचा आणखी एक भाग म्हणजे गोल्डफिशच्या यकृत पेशी तंतुकणिकेतील ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन हा होता.

मधुसूदन कानुंगो यांनी रेण्वीय जैवविज्ञान व जैवरसायनशास्त्रात अध्यापन केलेले आहे. ते जनुक व्यक्तता, वय व वार्धक्य यानुसार कशी बदलते याच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहेत. वार्धक्यातील जनुक व्यक्तता सिद्धांत (Gene expression theory of Aging.) या नावाने तो ओळखला जातो. त्यांच्या विज्ञानातील सहभागाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले. बनारस हिंदू विद्यापीठात प्रणिविज्ञानातील इमिरिटस प्राध्यापक व अखेरपर्यंत नागालॅन्ड विद्यापीठाचे कुलपती पद त्यांनी भूषवले होते.

त्यांनी आपल्या व्यवसायाचा प्रारंभ प्राणिविज्ञानाचा प्राध्यापक म्हणून कटक येथील रेव्हॅनशॉ महाविद्यालयात केली. त्यानंतर उत्कल विद्यापीठात रीडर या नात्याने वर्षभर अध्यापनाचे काम केले. पुढील सात वर्षे बनारस हिंदू विद्यापीठात रीडर व पुढे प्राध्यापक. नंतर त्यांनी प्राणिविज्ञान शाखेचे विभागप्रमुख, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता अशी पदे भूषवली. १९८९ मध्ये भुवनेश्वरमधील इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सचे ते संस्थापक संचालक होते. ओडिशा शासनाने स्थापन केलेली ही संस्था सरकारने डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणून पुनर्स्थापित केली. (Institute of Life Sciences (ILS)Bhubaneshwar). सध्या ही संस्था डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलोजी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

मधुसूदन कानुंगो आयुष्याच्या शेवटपर्यंत जनुक व्यक्तता (expression of genes) आणि चेतापारेषण प्रथिने व त्यांचा चेतासंस्थेतील पुनर्वापर (recycling) यावर संशोधन करीत होते. वृद्ध व्यक्तींच्या मेंदूमध्ये चेतापारेषण क्रियेमध्ये होणारे बदल हा त्यांचा आवडता विषय होता. जनुक व त्यापासून व्यक्त होणारे प्रथिन, त्यावर होणारा वयाचा परिणाम आणि वयोमानानुसार येणारा ताण यांचे संशोधन ते करीत.

असोसिएशन ऑफ जेरेन्टोलोजी ऑफ इंडिया या संस्थेची त्यांनी स्थापना केली त्याचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी सात वर्षे काम पाहिले. या संस्थेचे मुख्य कार्यालय बनारस हिंदू विद्यापीठामध्ये होते. या संस्थेचे ते आश्रयदाते होते. वार्धक्यविज्ञान संस्थेचे तीन मुख्य उद्देश आहेत; जैविक, सामाजिक व मनोवैज्ञानिक आणि वैद्यकीय. वृद्ध व्यक्तींवरील संशोधन आणि नियोजन ही संस्था नियमितपणे करत असते. त्यांच्या प्रयत्नामुळे यूजीसी, सीएसआयआर, आयसीएमआर, डीएसटी आणि डीबीटी अशा संस्थानी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नासाठी वेगळा निधी राखून ठेवण्यास प्रारंभ केला. त्यांच्या संस्थेस नफील्ड फाउंडेशन (यूके) आणि पीएल 480 (यूएस) या संस्थेकडून अनुदान मिळाले. त्यामुळे इतर विद्यापीठातील संशोधक या क्षेत्रात संशोधन करू लागले.

मधुसूदन कानुंगो यांनी सायन्स रिपोर्टरसायन्स टुडे यांसारख्या नियतकालिकातून सामान्य व्यक्तीपर्यंत वार्धक्यविज्ञान पोहोचविले. वार्धक्य जीवविज्ञान (Biology of Aging) या विषयातील १३९ शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. तसेच त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले Biochemistry of Ageing- Academic Press या पुस्तकाचे रशियन भाषेत भाषांतर झाले आहे. त्यांचे Genes and Ageing हे पुस्तक सुप्रसिद्ध आहे.

त्यांना त्यांच्या जीवाविज्ञानातील संशोधनाबद्दल भटनागर पुरस्कार मिळालेला होता. भारतीय शासनाने कानुंगो यांचा पद्मश्री या नागरी पुरस्काराने गौरव केला होता.

त्यांचे वाराणसी येथे वार्धक्याने निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी