(अंत:स्थापित आज्ञांकन). संगणक सॉफ्टवेअर. हे प्रामुख्याने अंत:स्थापित प्रणालीमधील मशीन किंवा उपकरण यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता तयार केलेली आज्ञावली आहे. ती वैशिष्ट्यपूर्ण असून विशिष्ट हार्डवेअरवर चालविण्यात येते आणि त्याला वेळेची व स्मृतीची मर्यादा असते. या संबंधित हार्डवेअर हे विविध नियंत्रित उपकरणे, मशीन, संवेदक आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा यांचा प्रत्येक भाग दर्शविते. अंत:स्थापित तंत्रज्ञान, नेटवर्क आणि माहिती तंत्रज्ञानासह इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) प्रणालीची स्थापना करते आणि औषध, उत्पादन, उपकरणे, स्वयंचलित उद्योग, वाहतूक आणि विमानचालनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. याचा वापर कधीकधी फर्मवेअरसह (firmware) परस्पर बदलून केला जातो.

डेस्कटॉप आणि अंत:स्थापित केलेल्या आज्ञावलीमधील मुख्य फरक त्यांच्या उद्देशामध्ये आहे. संगणकीय उपकरणे मोठ्या प्रमाणात सामान्य उद्देश संगणक आणि विशेष उद्देश संगणक या दोन प्रकारांत विभागली जातात. अंत:स्थापित सॉफ्टवेअर हे एक विशेष उद्देश संगणकासाठी तयार केले जाते. सामान्य उद्देश संगणक हे नावाप्रमाणे सर्वसामान्य हार्डवेअर आहे आणि हे एकाधिक उद्देशांसाठी वापरले जाऊ शकतात. उदा.,  लॅपटॉप आंतरजाल ब्राउझ करण्यासाठी, कागदपत्रे लिहिण्यासाठी इत्यादींसाठी वापरू शकतो. तसेच विशिष्ट उद्देश संगणकांचा विशिष्ट उद्देश असतो. उदा., आपण आपल्या ब्ल्युटूथ-हेडफोन्सवर (शिरोश्रवणक) त्यासारखा अनुप्रयोग स्थापित करू शकत नाही, आपल्याला ध्वनी मांडणी बदलण्याची आवश्यकता असल्यास, आपल्या स्मार्टफोनद्वारे आपण ते करणे आवश्यक असते. जो डेटा आपला स्मार्टफोन पाठवतो, तो ब्लूटूथ-हेडफोन सहज उपयोगात आणतो. अंतस्थापित सॉफ्टवेअरची सर्व कार्ये मानवी इंटरफेसद्वारे नियंत्रित केली जात नाहीत, त्याऐवजी मशीन-इंटरफेसद्वारे केली जातात.

उत्पादक कार, टेलिफोन, मॉडेम, रोबोट्स, उपकरणे, खेळणी, सुरक्षा व्यवस्था, पेसमेकर, दूरदर्शन – सेट-टॉप बॉक्स आणि डिजिटल घड्याळे यांमध्ये अंत:स्थापित सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. अंत:स्थापित सॉफ्टवेअर अगदी सोपे असू शकते, जसे की घरातील वीज नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते आणि फक्त काही किलोबाइट (kb) स्मृतीसह 8-बीट (bit) सूक्ष्मनियंत्रकावर चालू शकते किंवा हे इलेक्ट्रॉनिक घटक चालविणार्‍या सॉफ्टवेअरसारखेच जटिल असू शकते. अंत:स्थापित सॉफ्टवेअर विमानचालन प्रणालीमध्ये, लढाऊ विमाने आणि अगदी क्षेपणास्त्र मार्गदर्शक यंत्रणेत वापरल्या जाणार्‍या अत्यंत जटिल फ्लाय-बाय-वायर (fly-by-wire) प्रणालीमध्ये देखील आढळू शकते.

हार्डवेअर एकत्र करण्यासाठी वीजपुरवठा, एसओएम (SoM; सिस्टिम-ऑन-ए-मॉड्यूल)/ एसओसी (SoC; सिस्टिम-ऑन-ए-चिप)-एका बोर्डवर सूक्ष्मप्रक्रियक, परिघीय उपकरणे, स्मृती, आदान-प्रदान उपकरणांचे संयोजन इत्यादी मूलभूत घटकांची आवश्यकता असते. तर सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी परिचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम; OS)-विंडोज सीई (Windows CE), योक्टो लिनक्स (Yocto Linux), न्यूक्लियस आरटीओएस (Nucleus RTOS), संगणकीय भाषा (Programming Languages; सी (C), सी++ (C++), पायथॉन (Python), जावा स्क्र‍िप्ट (JavaScript), इ. मूलभूत घटकांची आवश्यकता असते.

अंतःस्थापित सॉफ्टवेअरची विकास साधने खालीलप्रमाणे :

  • पायचार्म (PyCharm)
  • WebStorm
  • Qt क्रिएटर (QtCreator)
  • MPLAB X
  • व्हिज्युअल स्टुडिओ(Visual Studio)
  • Eclipse
  • नेटबीन्स (NetBeans)
  • MATLAB
  • अर्डिनो(Arduino)
  • ARM Keil

कळीचे शब्द : #सॉफ्टवेअर#software # फर्मवेअर #firmware #बीट #bit

संदर्भ :

समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर