केअरना, युस्टीनस : (१८ सप्टेंबर १७८६ – २१ फेब्रुवारी १८६२) जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहराजवळ असलेल्या लुडवीजबर्ग या गावी युस्टीनस केअरना यांचा जन्म झाला. त्यांचे शालेयशिक्षण आपल्या गावीच झाले आणि नंतर त्यांना ट्युबिंजेन विद्यापीठात वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला. त्यांनी जर्मन साहित्यात प्रेमकवी म्हणून स्थान मिळविले. अन्नातून जी बोट्युलझम विषबाधा होते तिचे अचूक आणि संपूर्ण विवरण सर्वात प्रथम केल्याचे श्रेय युस्टीनस केअरना यांच्याकडे जाते. क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचे जिवाणू हे विष तयार करतात ही माहिती त्यांना नव्हती. ह्या जीवाणूंची वाढ ऑक्सिजन विरहित वातावरणात होत असते. त्यामुळे डबाबंद अन्नात यांची वाढ होण्याची शक्यता सर्वात  ज्यास्तअसते. तसेच प्राण्यांच्या शरीरातील मांस काढून त्याचे कबाब बनवितात त्यातही बोट्युलिनमचे हे जीवाणू वाढू शकतात. युस्टीनस केअरना यांनी ह्या विषबाधेचा नुसताच शोध लावला नाही तर अन्नातील या विषाचा काही औषधी उपयोग होऊ शकेल का असा विचार करून त्या दृष्टीने त्यांनी प्रयोग ही केले होते.

नेपोलियनच्या युद्धांमुळे युरोपात (विशेषतः  जर्मनी आणि फ्रान्स क्षेत्रात) अन्न विषबाधेच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली दिसत होती. सर्वत्र युद्धजन्य वातावरण आणि परिस्थिती असल्यामुळे गरिबी प्रचंड वाढली होती. स्टुटगार्ट राज्यात देखील जनतेला या अन्नविषबाधेची मोठ्या प्रमाणावर झळ लागली होती. ग्रामीण क्षेत्रातील अन्न पदार्थांच्या उत्पादनावरचे निर्बंध अगदीच शिथील झाले होते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित साध्या साध्या बाबींकडे ही संपूर्ण दुर्लक्ष होत होते आणि कुणाचा पायपोस कुणाला नसल्यामुळे अनागोंदी निर्माण झाली होती. स्टुटगार्ट सरकारने एका जाहीर सूचनेद्वारे ‘स्मोक्ड कबाबांवर’ बंदी घालण्याचे आवाहन लोकांना केले होते. ही विषबाधाकबाबांमध्ये रासायनिक  प्रक्रियेने तयार होणाऱ्या हायड्रोसायनिक आम्लामुळे होते असे अनुमानदेखील त्यावेळी कुणीतरी काढले होते. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची विनंती ट्युबिंजेन विद्यापीठाला सरकारतर्फे करण्यात आली. त्या विद्यापीठातील तज्ञांनी हायड्रोसायनिक आम्लामुळे ही विषबाधा होत असेल ही  शक्यता फेटाळून लावली. युस्टीनस केअरना आणि स्टाईनबुग ह्या दोघांनीं ह्या विषयावर जो सखोल अभ्यास केला तो ग्राह्य धरला गेला. स्टाईनबुग यांनी ह्या विषबाधेने एकच अन्नपदार्थ खाऊन ज्या सात लोकांना विषबाधा झालीहोती त्यांचा अभ्यास केला होता. त्यातील तीन जण मृत्यू पावले होते आणि त्यांच्या शव विच्छेदनाचे विश्लेषण स्वतः करून त्यांनी तो अहवाल विद्यापीठाला सादर केला. केअरना यांनीही अशीच विषबाधा झालेल्या ७६ जणांचा अभ्यास करून आपला अहवाल दिला होता. हा प्रश्न हाताळणाऱ्या ओटॅनरीथ यांनी ह्या दोन अहवालावरून विद्यापीठातर्फे या कबाब विषबाधेमुळे होणारी लक्षणे प्रसिद्ध केली. त्यात पचनसंस्थेतील गडबड, दोन प्रतिमा दिसणे, नेत्रबाहुलीचे अवाजवी प्रसरण यांचा समावेश होता. कबाब करणाऱ्या स्त्रिया मांसाचे तुकडे दीर्घ काळ उकळत्या पाण्यात ठेवीत नाहीत, हे या विषबाधेचे प्रमुख कारण आहे असेही त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले होते. युस्टीनस केअरना यांचा निबंध संख्याशास्त्राच्या हिशेबाने अधिक विश्वसनीय होता म्हणून त्यांनी हा शोधनिबंध New observations on the lethal poisoning occurring so frequently in Wurttemberg through the consumption of smoked sausages या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला.  हे विष कोणत्यातरी प्रकारचे मेदाम्ल असले पाहिजे असे त्यांना वाटत होते. पुढील अभ्यासासाठी त्यांना स्टुटगार्ट सरकारने १०० रौप्य मुद्रांची देणगी दिली होती. त्याचा वापर करून एका  स्थानिक औषधविक्रेत्याच्या प्रयोगशाळेत त्यांनी प्राण्यांवर या विषबाधेचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्या प्राण्यांमध्ये त्यांचा स्वतः देखील समावेश होता. या अभ्यासात त्यांनी १५५ अन्न विषबाधा झालेल्या लोकांचे ही विश्लेषण केले होते आणि ज्या लोकांचा त्यात मृत्यू झाला त्यांच्या शवविच्छेदनाचे रासायनिक विश्लेषण अहवाल देखील जोडले होते. जर्मन भाषेत त्यांनी The fat poison or the fatty acid and its effects on the animal organism, a contribution to the examination of the substance which acts toxically in bad sausages या शीर्षकाखाली आणखी एकदीर्घ शोधनिबंध प्रसिद्ध केला. या निबंधात त्यांच्या प्राण्यांवरच्या प्रयोगावरच्या निष्कर्षांचा देखील अंतर्भाव होता. खराब झालेल्या कबाबांचा काढा करून त्यांनी तो विविध पक्षी, मांजरे, ससे, बेडूक, माशा, टोळ आणि गोगलगायींना प्यायला दिला होता. हे विष ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या चेतासंस्थेच्या संदेशप्रसारणात व्यत्यय आणतात. लोखंडावर गंज चढून त्यामुळे त्याच्या विद्युत वहनात जसे अडथळे येतात तशाच प्रकारचे हे अडथळे असतात असा त्यांचा ह्या विष परिणामासंबंधी काढलेला निष्कर्ष होता. याच शोधनिबंधात त्यांनी या विषाचा वापर उपचारांसाठीकरता येऊ शकेल अशी कल्पना मांडली. हे विष शुद्ध स्वरूपात मिळवून ते जर अतिशय कमी मात्रेत वापरले तर रेबीजसारख्या रोगात किंवा मानसिक आजारात होते तसे चेता संस्थेचे अतिरेकी उद्दीपन कमी करता येऊ शकेल असे त्यांना वाटत होते. फुप्फुसाचा क्षय रोग, पिवळा ताप, विद्युतधक्क्याने येणारे आजार, भाजल्यानंतर येणारे शारीरिक आणि मानसिक आजार ,प्लेग, अल्सर या सारख्या रोगांवर देखील या विषाचा वापर उतारा म्हणून करता येईल असे त्यांना वाटत होते. विषाने विषाचा काटा काढायचा अशी आपल्याकडे जी म्हण आहे ती युस्टीनस केअरना यांनी आपल्या अभ्यासातून हिरीरीने वैज्ञानिक समुदायापुढे मांडली होती. चेताजीवशास्त्र या विषयावर आज खूपच प्रगती होत आहे आणि  केअरना यांची कल्पना वास्तवात येत आहे असे दिसत आहे. बोट्युलिनम विषाचा विविध रोगांवर कसा उपचार म्हणून उपयोग होत आहेत या विषयाशी निगडित अनेक शोधनिबंध प्रसिद्ध होत आहेत.

संदर्भ :

  • Neurobiology: Historical aspects of botulinum toxin: Justinus Kerner (1786–1862) and the “sausage poison” November 1, 1999, 53:8 1850; 1526-632X.
  • Historical notes on botulism, Clostridium botulinum, botulinum toxin, and the idea of the therapeutic use of the toxin. Erbguth F. JMov Disord. 2004 Mar;19 Suppl 8:S2-6.
  • Frank J. Erbgut: The pretherapeutic history of botulinum toxin, Cambridge University Press, 978-0-521-69442-1 – Manual of Botulinum Toxin Therapy, Edited by Daniel Truong, Dirk Dressler and Mark Hallett.

समीक्षक : रंजन गर्गे