उद्योगसंस्थेच्या पारंपरिक सिद्धांतात उत्पादन व्यय वक्राचा आकार इंग्रजी U अक्षराप्रमाणे आहे. U आकारामुळे उद्योगसंस्थेच्या अतिरिक्त क्षमतेची समस्या दृग्गोचर होते. उद्योगसंस्थेच्या पारंपरिक सिद्धांतानुसार प्रत्येक संयंत्र एकमेकांद्वितीय अशा इष्टतम पातळीवर उत्पादनासाठी संकल्पित केलेले असते. ही इष्टतम पातळी इंग्रजी U आकाराच्या उत्पादन व्यय वक्राच्या न्यूनतम बिंदूपाशी निश्चित होते.

आकृती १ : इष्टतम पातळी (श्रेणी) अक्ष अक्षावर क्ष२ बिंदूपाशी असल्याचे दिसून येते.

उद्योगसंस्थेच्या पारंपरिक सिद्धांतानुसार संयंत्राचे संकल्पन करताना उद्योगसंस्थेने केवळ क्ष२ या बिंदूपाशीच उत्पादन करणे गरजेचे आहे. उत्पादनाची पातळी सुनिश्चित करताना लवचिकतेला वाव नसल्याचे गृहित उद्योगसंस्थेचा पारंपारिक सिद्धांत धरतो. क्ष२ हा उत्पादनाचा इष्टतम बिंदू आहे; कारण या बिंदूपाशी सरासरी एकूण व्यय न्यूनतम आहे. असे असताना जर उद्योगसंस्था क्ष१ या बिंदूपाशी उत्पादन करीत असेल, तर त्या उद्योगसंस्थेच्या संयंत्रामध्ये क्ष१क्ष२ इतकी उत्पादनाची अतिरिक्त (अनियोजित) क्षमता आहे, असे पारंपरिक सिद्धांत मानतो. ही अतिरिक्त क्षमता अवांछित असते; कारण त्यामुळे उद्योगसंस्थेचा एकक व्यय क्ष१ बिंदूपाशी उत्पादन केल्यामुळे वाढतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील उद्योगसंस्थेमध्ये उत्पादनाची अतिरिक्त क्षमता दिसून येत नाही; कारण पूर्ण स्पर्धा असलेल्या बाजारात उद्योगसंस्थेच्या उत्पादनाला असलेल्या मागणीचा वक्र अक्ष अक्षाशी समांतर म्हणजेच पूर्णपणे लवचिक असतो. मागणी वक्र हाच सीमांत प्राप्ती वक्र असतो.

उद्योगसंस्था सरासरी एकूण व्यय वक्राच्या न्यूनतम बिंदूपाशी उत्पादन करते, हे आकृती २ मध्ये दर्शविले आहे.

आकृती २ : पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादनाची उतिरिक्त क्षमता उद्भवत नाही.

 

आकृती ३ : मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात अतिरिक्त क्षमता उद्भवते.

मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात मात्र उत्पादनाची अतिरिक्त क्षमता दिसून येते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात संयंत्राचा लहान आकार असलेल्या (कमी उत्पादन क्षमता असलेल्या) अनेक उद्योगसंस्था असतात आणि त्या सर्व उद्योगसंस्था त्यांच्या ‘आदर्श’ उत्पादनापेक्षा (म्हणजे सरासरी एकूण व्यय वक्राच्या न्यूनतम बिंदूला अनुलक्षून असलेल्या अक्ष अक्षावरील क्ष२ बिंदूपाशी उत्पादन करणे) कमी (आकृतीत क्ष१ बिंदूपाशी) उत्पादन करताना दिसून येतात.

मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारातील मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा असल्यामुळे मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारातील उद्योगसंस्था सक्रीय किंमत स्पर्धेत उतरतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारातील उद्योगसंस्था अर्थव्यवस्थेतील संसाधनांचा पुरेसा वापर करत नसल्यामुळे त्या दीर्घकालीन सरासरी व्यय वक्राच्या न्यूनतम पातळीला उत्पादन करू शकत नाहीत. म्हणून चेंबरलिनच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारातील उद्योगसंस्थांवर केली जाणारी अतिरिक्त क्षमतेच्या स्वरूपाची टीका अप्रस्तुत आहे.

संदर्भ :

  • Bade, Robin; Michaele, Parkin, Foundations of Micro Economics, 2012.
  • Koutsoyiannis, A., Modern Microeconomic, London, 1979.

समीक्षक : ज. फा. पाटील