पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र हा समग्र अर्थशास्त्रातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार उत्पादनातील वाढ ही आर्थिक विकास घडवून आणते. त्यामुळे आर्थिक विकास वेगाने घडवून आणायचा असेल, तर भांडवल गुंतवणूक आणि वस्तू व सेवांच्या उत्पादनावरील नियंत्रणे कमी व्हायला हवीत. आधुनिक पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्राचे श्रेय रॉबर्ट मुंडेल व ऑर्थर लॅफर या दोन अर्थशास्त्रज्ञांना जाते. १९७१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुंडेल यांच्या प्रबंधीकेमध्ये शेवटच्या परिच्छेदात पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्राची निर्मिती झालेली दिसते. मुंडले यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या कार्यकाळात पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र मांडले. या अर्थशास्त्राच्या विचारामध्ये लॅफर यांचादेखील तितकाच मोलाचा वाटा होता. तत्पूर्वी पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र ही संकल्पना सर्वप्रथम १९७५ मध्ये पत्रकार ज्युड वॅनिस्को यांनी वापरली; परंतु रॉबर्ट अटकिनसन यांच्या मतानुसार पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र या संकल्पनेचा वापर प्रथम अमेरिकेन केला. तसेच राष्ट्राध्यक्ष निकसन यांचे आर्थिक सल्लागार हर्बर्ट स्टेन यांच्या मते, १९७६ मध्ये पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र ही संकल्पना १९७० च्या दशकात केन्सप्रमाणित आर्थिक धोरणाला प्रतिसाद म्हणून विकसित झाली असली, तरी या संकल्पनेची बीजे या अगोदरदेखील आपणांस पाहायला मिळतात.

पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्रानुसार कमी दरातील वाढत्या वस्तू व सेवांच्या पुरवठ्यामुळे ग्राहकांना लाभ होतो. त्याच बरोबर व्यवसायातील वाढत्या गुंतवणुकीमुळे व विस्तारामुळे रोजगाराची मागणी वाढून अधिक रोजगार निर्माण होतात. या चांगल्या बाबी घडून येण्यासाठी पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्राने मुख्यत: दोन शिफारशी केल्या आहेत. एक, कराचे सिमांत दर कमी करणे आणि दोन, कमी सरकारी नियंत्रण. कराचा दर कमी ठेवल्यास लोकांकडील खर्चयोग्य उत्पन्न वाढेल. परिणामी, ते जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी आणखी अधिक श्रम करतील.

पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्राच्या राजकोषीय धोरणात व्यवसायावरदेखील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यानुसार करातील घट तसेच विनिमयन करण्यासंबंधी अर्थशास्त्र प्रतिपादन करते. यामुळे कंपन्यांना लाभ मिळून ते अधिक लोकांना कामावर घेतात. याचा परिणाम म्हणून अधिक रोजगार निर्माण होऊन वस्तू व सेवांना असणारी मागणीदेखील वाढते आणि आर्थिक विकासाला आणखी वेग प्राप्त होतो.

फ्रांस्वा केने या अर्थशास्त्रज्ञांनी तसेच प्रकृतिवादी संप्रदायांनी १७७० च्या सुमारास बाजार अर्थव्यवस्थेतील संपत्ती हक्काचे महत्त्व प्रतिपादन केले होते. तसेच अत्याधिक करामुळे उत्पादन घटते, असेदेखील स्पष्ट केले होते. कराचे उच्च दर वृद्धीला मारक ठरतात, असे त्यांचे मत होते. १७७६ मध्ये प्रकाशित झालेल्या वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथात प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ म्हणतात की, करामुळे काम करण्याची प्रेरणा कमी होते आणि उत्पादन संस्थांची रोजगार देण्याची क्षमता घटते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जे. बी. से यांनी केलेल्या युक्तीवादानुसार उच्च कर दरामुळे व्यक्तीची स्थिती खालावते, तेसुद्धा राज्यांना याचा लाभ न होता. त्यांनी उच्च कराच्या दराला आर्थिक आत्महत्या असे म्हटले आहे. यावरून त्यांच्या उच्च कराच्या दराला असणारा प्रखर विरोध स्पष्ट होतो. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांनीदेखील त्यांच्या दास कॅपिटल या प्रसिद्ध ग्रंथात अत्याधिक कर हे बदलत्या यूरोपमधील तत्त्व असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेत पुरवठा बाजू अर्थशास्त्राला रीगनॉमिक्स म्हणून ओळखले जाते; कारण राष्ट्राध्यक्ष रीगन यांचे वित्तिय धोरण हे प्रामुख्याने पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्रावरच आधारलेले होते. १९८० च्या दशकात रीगन यांनी पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्राचा उपयोग तेजीयुक्त मंदीचा सामना करण्यासाठी केला. यामध्ये एकाच वेळी अर्थव्यवस्थेत मंदी आणि उच्च चलनवाढ उद्‌भवते. रीगन यांनी प्राप्तीचा सीमांत दर पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्रातील शिफारशीनुसार ७० टक्क्यांवरून २८ टक्के इतका कमी केला. त्याच प्रमाणे त्यांनी कंपन्यांवरील कराचा दर ४६ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत कमी केला. या उपायांमुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळून अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येण्यास मदत झाली. त्याच प्रमाणे सरकारचे उत्पन्नदेखील वाढते.

पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्राचा मुख्य गाभा हा लॅफर वक्र आहे. डोनल्ड रम्सफील्ड आणि डिक चेनी यांमध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्षांच्या कर दरांच्या वाढीच्या प्रस्तावाचा विषय निघाला, तेव्हा लॅफर यांनी १९७४ मध्ये नॅपकिनवर एक वक्र काढून कर दर व करापासूनची प्राप्ती यांतील ट्रेड ऑफचे विवेचन केले. या ट्रेड ऑफचेच वॅनिस्की यांनी लॅफर वक्र असे वर्णन केले.

करांचे दर कमी ठेवण्याचे अनेक लाभ मिळू शकतात. कर दर कमी असल्यास व्यक्ती जास्त श्रम करण्यास प्रेरित होते. कमी कर दरामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. त्याच प्रमाणे रोजगारदेखील वाढण्यास मदत होते. या सर्व फायद्यांबरोबरच कराचे दर कमी केल्यास कर चुकविण्याचे प्रमाण कमी होऊन कर देण्याचे प्रमाण वाढते आणि कर महसूल वाढण्यास मदत होते.

अमेरिकन अर्थव्यवस्थेने १९८० पासून गेल्या ३० वर्षांत पुरवठा बाजूच्या विचारांनी दीर्घ तेजीचा काळ अनुभवला. जागतिक अर्थव्यवस्थेनेदेखील उल्लेखनीय बदल अनुभवले. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चनुसार गेल्या २५ वर्षांत त्यापूर्वीच्या २०० वर्षांतील संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती निर्माण झाली. या सर्व विवेचनावरून लक्षात येणारी बाब म्हणजे मागणी प्रमाणेच पुरवठादेखील महत्त्वाचा आहे. म्हणूनच केवळ मागणीचा विचार करून आर्थिक धोरणे ठरविण्यापेक्षा पुरवठ्याचा विचारदेखील तितकाच महत्त्वाचा मानून धोरण ठरविले गले पाहिजे.

पुरवठा बाजूचे अर्थशास्त्रदेखील टीकेपासून दूर राहिलेले नाही. टीकाकारांच्या मते, कर कमी केले तरी लोक अधिक श्रम करण्यास तसेच जास्त बचत करण्यास प्रवृत्त होतीलच याची खात्री नाही. ज्या लोकांचे उद्दिष्टच ठराविक उत्पन्न मिळविण्याचे असेल आणि हे उत्पन्न त्यांना कमी वेळ श्रम करून मिळत असल्यास ते अधिक श्रम करणार नाहीत. त्याच प्रमाणे ज्या लोकांचे ध्येय हे विशिष्ट रकमेची बचत करण्याचे असेल आणि कर दर कपातीमुळे जर विशिष्ट रकमेची बचत करता येत असेल, तर हे लोक अधिक बचत करण्यापासून परावृत्त होतील, अशीही टीका कर कपात आणि बचत यांबाबत करण्यात आली. कर कपातीमुळे मागणी वाढून अर्थव्यवस्थेत चलनवाढ निर्माण होईल; कारण कर कपात झाल्याने लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढेल आणि उपयोगी वस्तूंची मागणी वाढून काही काळ महागाई वाढेल, असेदेखील टिकाकारांना वाटते. कर कपातीचा अल्प परिणाम हा पुरवठ्यावर होतो; मात्र मागणी आणि चलनवाढीवर कर कपातीचा मोठा परिणाम होते, अशी टीका पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्रावर करण्यात आली. ज्यामुळे पुरवठा वस्तूच्या अर्थशास्त्रातील उपयोगीतेबाबत मर्यादाच पडतात. पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्राची आणखी एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे कर कपातीमुळे अंदाजपत्रकीय तूट वाढते; कारण कर घटविल्याने सरकारचा महसूल कमी होईल आणि तूट वाढू शकेल. करांचे दर कमी केल्याने समाजातील श्रीमंत वर्गाचे उत्पन्न वाढून आर्थिक विषमता वाढीस लागेल, अशीदेखील या अर्थशास्त्रावर टीका झाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या लॅफर वक्रावर पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्राचा डोलारा उभा आहे, त्या लॅफर वक्राचा नेमका आकार वा निश्चित बिंदू व्यवहारात नेमका सांगता येत नाही. त्यामुळे करकपातीचा निश्चित परिणाम कर उत्पन्न आणि विकासावर काय होईल, हेही सांगता येत नाही. असे असले, तरी पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र हे भारतासारख्या विकसनशील देशांना तेजीयुक्त मंदीच्या परिस्थितीत, ज्यामध्ये एकीकडे मंदीची अवस्था असते आणि दुसरीकडे चलन वाढीची समस्या अर्थव्यवस्थेला भेडसावत असते, अशा वेळी वस्तू उत्पादनावरील अडथळे दूर करून उत्पादन वाढविणे योग्य ठरते. ज्यामुळे मंदी कमी होऊन चलनवाढीच्या समस्येवरदेखील नियंत्रण मिळविता येऊन बेरोजगारीच्या प्रश्नाची उकल करता येते.

पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्राची मुख्य शिफारस ही करांचे दर कमी करणे अशी आहे. ही शिफारस भारतासारख्या विकसनशील देशांना उपयोगी ठरू शकते; कारण करांचे दर कमी असल्यास करचुकवेगिरीला आळा बसेल, करांचा पाया रुंदावेल आणि जनतेची खर्च करण्याची क्षमता वाढून अर्थव्यवस्थेत मागणीदेखील वाढेल. परिणामी, अर्थव्यवस्थेचे चाक मंदीच्या गाळात रुतणार नाही. जगातील प्रमुख राष्ट्रांचे आर्थिक धोरण पाहिल्यास पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्राची आजची स्थिती यावर विशेष भर देणारी आहे, असे दिसून येत नाही; परंतु धोरण ठरविताना मागणी प्रमाणेच पुरवठादेखील तितकाच महत्त्वाचा आहे. यातच पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्रांची उपयोगिता दिसून येते. थोडक्यात, पुरवठा बाजूचे अर्थशास्त्राच्या मर्यादा लक्षात घेऊन अमलात आणल्यास देशाला त्याचा फायदाच होईल.

संदर्भ :

  • Dornbusch, Rudiger; Fischer, Stanley; Startz Richard, Macro Economics, New Delhi, 2002.
  • Samuelson, Paul A.; Nordhaus, William D., Economics, New Delhi, 2002.

समीक्षक : राजस परचुरे