सम्राट अलेक्झांडर द ग्रेट नंतरच्या इ.स.पू. ३२३ ते इ.स.पू. ३० या काळाला ग्रीकांश काळ (Hellenistic Period) म्हणून ओळखतात. या काळातील इतर ग्रीक कलांबरोबरीलच शिल्पकलाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ग्रीक कलेने अभिजात काळाच्या उत्तरार्धात अलेक्झांडरच्या विस्तारित साम्राज्याबरोबर आपली सीमा ओलांडून जगातील इतर भागांतील कलाभिव्यक्तीवर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला. या काळात निर्माण झालेल्या विविध राज्यांमधील कला ग्रीकमध्ये ग्रीकांश कला (हेलेनिस्टिक आर्ट), इटलीमध्ये ग्रीकोरोमन कला, इजिप्तमध्ये टॉल्मीक कला तर आशिया मायनर, मेसोपोटेमिया व इराणमध्ये सिल्युसिडी कला अशा विविध नावांनी ओळखल्या जातात. ग्रीकांश काळातही अथेन्स हे कायमच कलेचे प्रमुख केंद्र राहिले, तरी त्याचबरोबरीने इ.स.पू. ३३१ मध्ये अलेक्झांडरने इजिप्तमध्ये उभारलेल्या अलेक्झांड्रिया या शहरालाही तेवढेच महत्त्व प्राप्त झाले होते.
ग्रीकांश शिल्पे अधिक वास्तववादी आणि स्वाभाविक स्वरूपाची होती. या काळातील शिल्पामध्ये वास्तववादी शैलीत क्षणिक भावनात्मक स्थिती, दुःख आणि वेदना अभिव्यक्त केलेल्या आढळतात. शिल्पकारांनी धार्मिक आणि नैतिक मूल्यांवर भर दिलेला दिसतो. त्यांच्या शिल्पांमध्ये चारित्र्य, भावना आणि अनुभव यांचे चित्रण दिसते. कामुकता, हिंस्रता यापेक्षा सत्यता व्यक्त करणे याकडे शिल्पकारांचा अंतर्निहित कल होता, असे दिसते. ग्रीकांश शिल्पकारांनी प्रामुख्याने धातू, दगड व पक्वमृदा या माध्यमांतून शिल्पनिर्मिती केल्याचे आढळते. या काळात वास्तविकतेपेक्षा अतिउंच असलेल्या अशा प्रतिमांचीही निर्मिती करण्यात आली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इ.स.पू. तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धातील १०८ फूट उंचीचा लोखंड व कांस्य धातू वापरून उभारण्यात आलेला रोड्झ याचा मोठा पुतळा (Colossus of Rhodes). इ.स.पू. २२६ मधल्या भूकंपामध्ये या पुतळ्याची बरीच नासधूस झाली. तरी त्याचे अनेक भाग जपण्यात आले होते.
बोओटिया येथील तनाग्रा (Tanagra) या शहरातील थडग्यात इ.स. १८७४ ते १८७९ मध्ये झालेल्या उत्खननांमधून इ.स.पू. चौथ्या शतकाच्या शेवटी निर्मिती केलेल्या, पक्वमृदेतील छोट्या आकारातल्या, धार्मिक व सजावटीच्या उद्देशाने बनविलेल्या अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत. या वास्तववादी प्रतिमा साधारण १० ते २५ सें.मी. इतक्या उंचीच्या असून त्यावरील बारकावे उल्लेखनीय आहेत.
ग्रीकांश काळाच्या सुरुवातीस कलाकारांनी अभिजात काळातील शैलीतच कलाकृतींची निर्मिती केली असली, तरी काही कालावधीने त्यात अधिक विकास होऊन नवीन शैली विकसित झालेली दिसते. उदा., इयूटिकाइड्स (Eutychides) या शिल्पकाराने केलेले द ताईची ऑफ अँटिऑक (The Tyche of Antioch) हे शिल्प; तर इतर कलाकारांना भावना आणि गतीमय स्थितीतील दृश्ये दाखविण्यात रस होता. हे पर्गामम येथील शिल्पपटातून दिसून येते.
ग्रीकांश काळातील अटालिड (Attalid) राजवंशातील (इ.स.पू. २४१-१३३) लोकांनी आजच्या तुर्कस्थानात असलेल्या पर्गाममचे रूपांतर एका कलात्मक ग्रीक नगरात केले होते. येथील कलाकारांनी शिल्पकलेत विशेष प्राविण्य मिळविले होते. त्यांच्या जीवनमानाइतक्या समूह अर्थात बहुप्रतिमा असलेल्या विशिष्ट शिल्पशैलीला ‘पर्गामम बरोक’ (इ.स.पू. २०० ते १५०) असेही ओळखले जाते. चेहऱ्यांवर तीव्र आवेग असलेल्या आणि शरीर उधळेपणाने वेड्यावाकड्या स्थितीत दाखवलेल्या अशा समूह शिल्पशैलीला सामान्यतः ‘बरोक’ असे संबोधतात. अत्यंत अर्थपूर्ण हावभाव, नाट्यपूर्ण कृतीने भरलेल्या अवस्था, अतिशयोक्तीपूर्ण मांसपेशी आणि वस्त्रांवरील बारीक व खोल चुण्या अशा वैशिष्ट्यांनी भरलेल्या या शिल्पांमधून आपल्या विषयातील वेदना, दडपशाही तसेच इतर भावना व्यक्त करण्यास शिल्पकारांना यश मिळालेले दिसते.
द डाइंग गॉल हे मूळ शिल्प आज अस्तित्वात नाही; परंतु त्याची सफेद संगमरवरातील रोमन प्रतिकृती रोममधील कॅपिटोलिन (Capitoline) या संग्रहालयात जतन केलेली आहे. मूळ कांस्यशिल्पाचा शिल्पकार जरी माहित नसला, तरी त्याची निर्मिती राजा अटालस पहिला (Attalus I) याने जेव्हा अनातोलियाच्या गलातियन (Galatian) लोकांवर विजय मिळवला, त्या कालावधीत (इ.स.पू. २३०-२२०) झाली असावी. मुळात रंगवलेल्या या करुणामय शिल्पात जखमी गॉलयोद्धा दाखवलेला आहे. खाली पडलेल्या ढालीवर तो मरणोन्मुख अवस्थेत पडलेला असून, त्याच्या बाजूला तलवार, पट्टा व एक वक्र कर्णा पडलेला दाखवलेला आहे. गॉलची ढाल, गळ्याभोवतीचा पिळीचा अलंकार, त्याच्या डोक्यावरील केसांचे पडलेले पीळ, मिशा यांतील बारकावे विशेष उल्लेखनीय आहेत. शिल्पकाराने अभिव्यक्त केलेल्या गॉलच्या शरीरावरील स्पष्ट दिसणाऱ्या जखमांवरून तो मरणयातना भोगत आहे, हे समजून येते.
पर्गामम येथील वेदी वर्तमानापर्यंत टिकलेली मूळ ग्रीकांश कलाकृती असून इतर अनेक सुप्रसिद्ध कलाकृती या मूळ ग्रीकांश कलाकृतींच्या रोमन नकला असल्याचे मानले जाते. युमेनेस दुसरा (Eumenes II) या राजाच्या काळात इ.स.पू. दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेली संगमरवरातील ‘झ्यूसची मोठी पवित्र वेदी’ (Great Altar of Zeus) साधारण ३६ मी. रुंद ३४ मी. खोल असून तिच्यातील पर्गामम बरोक शैली स्पष्ट दिसून येते. म्हणूनच या वेदीला ‘पर्गामम वेदी’ असेही संबोधतात. हे प्रचंड मोठ्या आकारातील स्मारकशिल्प बर्लिनच्या संग्रहालयातील एका अखंड दालनात जतन केलेले असून या वेदीची उभारणी पायऱ्यांच्या सभोवती केलेली आहे. ही वेदी ११३ मीटर (३७० फूट) इतक्या लांब अशा कोरीव चित्रमालिकेने सजविलेली आहे. ही संगमरवरातील कोरीव चित्रपट्टी मुळात रंगवलेली व सुवर्णलेपण केलेली होती. तिच्यावर ग्रीक पुराणांमधील झ्यूस, आर्टेमिस (Artemis) तसेच इतर ऑलिंपियन देवता आणि महाकाय दैत्य यांच्यातील युद्धाच्या उत्थित चित्रणाचे आच्छादन केलेले आढळते. या शिल्पपटातील दृश्ये नेहमी डावीकडून उजवीकडे बघितली जातात. उदा., ‘अथीनाचा अल्कोऑनियस वरील विजय’ (इ.स.पू.सु. १७५) हे शिल्प. एका पुराणकथेनुसार अल्कोऑनियसनची माता गाया (Gaia) ही धरतीवर संचार करू शकत असे. जोपर्यंत त्याने धरतीला स्पर्श केलेला आहे, तोपर्यंत तो अमर्त्य आहे. ही पुराणकथा दाखवताना शिल्पपटांत, पर्गामम नगराची देवता अथीनाने दैत्य अल्कोऑनियस याचा पाडाव करताना त्याचे केस धरून त्याचा पृथ्वीशी होत असलेला संपर्क तोडण्यासाठी झडप घातलेली दाखवलेली असून बाजूला नायकी ही देवता लगेचच उडत जाऊन अथीनाच्या डोक्यावर मुकुट घालण्याच्या तयारीत आहे. तर खालून दैत्यांची माता गाया ही धरतीतून मुलाला वाचविण्यासाठी विनवणी करत अवतरते आहे, असे दृश्य चित्रित केलेले आहे. शिल्पपटात हिंसक हालचाली, व्यथा, गरगर फिरवताना उडणारी वस्त्रे यांच्या चित्रणांतून मृत्यूचे स्पष्ट विवरण होते. एकंदरीत शिल्पातील खोल कोरीव कामामुळे गडद छाया निर्माण होऊन प्रक्षेपी आकृत्यांमुळे नाट्यमय प्रसंग उभे राहतात.
ग्रीक शिल्पकलेत ग्रीकांश काळातील एक महान कलाकृती म्हणून पर्गामम बरोक शैलीतील लोकून द ग्रूप या शिल्पसमूहाचा समावेश होतो. या शिल्पाचा उल्लेख पाश्चात्त्यकलेत ‘मानवाच्या यातना दर्शविणारी आदर्श प्रतिमा’ असा केला जातो. जीवनमानाइतक्या असलेल्या या त्रिमित शिल्पाची उंची साधारण ६ फूट ७ इंच असून ते संगमरवराच्या सात विविध भागांनी आंतरबद्ध पद्धतीने जोडलेले आहे. या शिल्पात ट्रोजन धर्मगुरू लोकून आणि त्याची मुले अँटिफन्टस व थीम्ब्रायस (Antiphantes and Thymbraeus) यांच्यावर सागरी सर्पांनी हल्ला करून त्यांना विळखा घातलेला दाखवलेले आहे. शिल्पात लोकूनची प्रतिमा अतिशय काळजीपूर्वक हाताळलेली दिसते. दोन्ही मुले त्यांच्या वडिलांपेक्षा लहान आकारात दाखवलेली आहेत. या शिल्पाच्या रचनेत गतीमय केंद्रीय शिल्पप्रतिमेचा प्रभाव दिसतो. यामध्ये तीनही मानवाकृतींचा सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी चाललेला प्रयत्न त्यांच्या चेहऱ्यांवरील वेदनायुक्त हावभावातून, त्यांच्या शारीरिक रचना व त्यावरील स्नायूंचे बारकावे यांवरून स्पष्ट होतो. तज्ज्ञांच्या मते या शिल्पाच्या निर्मितीचा निश्चित काळ माहित नसला, तरी साधारण इ.स.पू. ४२-२० या काळात ते घडविले असावे. अस्तित्वात असलेली शिल्पाकृती ॲजेसॅन्डर (Agesander), अथीनोडोरस (Athenodoros) व पॉलिडोरस (Polydorus) या अत्यंत कुशल प्रतिकृती बनवणाऱ्या शिल्पकारांनी केलेली असावी.
ग्रीकांश शिल्पांमध्ये कितीतरी ग्रीक मूलभूत आकार आणि संकल्पना आत्मसात केलेल्या दिसतात. या शिल्पांमध्ये स्त्रीसौंदर्याचे कौतुक केलेले दिसून येते. उदा., अभिजात ग्रीकांश शैलीची अनेक वैशिष्ट्ये व्यक्त करणारे ॲफ्रोडाइटी ऑफ मिलॉस हे शिल्प. प्रेम आणि सौंदर्याची ग्रीक देवता ॲफ्रोडाइटी हिचे हे शिल्प लुव्र संग्रहालयात जतन केलेले असून मिलॉस बेटावर मिळाल्याने व्हीनस द मिलो (Venus de Milo) या नावानेही ओळखले जाते. ॲफ्रोडाइटीची ही पारीन संगमरवरातील अर्धनग्न प्रतिमा चौथऱ्याशिवाय ६ फूट ८ इंच इतकी जीवनमानापेक्षा थोडी मोठी असून तिचे दोन्ही हात तुटलेले आहेत. कमरेपासून खाली गुंडाळलेले वस्त्र खाली घसरताना दाखवलेले आहे. शिल्पाच्या चौथऱ्यावर असलेल्या कोरीव लेखावरून हे अँटिऑकच्या अलेक्झांड्रॉस या शिल्पकाराने (इ.स.पू. १३० ते १००) केले असावे असे मानले जाते.
इ.स.पू. २२० ते १८५ या काळात निर्माण केलेली विंग्ड व्हिक्टरी ऑफ सॅमोथ्रेस ही कलाकृती अजूनपर्यंत अस्तित्वात असलेली लुव्र संग्रहालयात जतन केलेली एक महान कलाकृती आहे. हे शिल्प देवी नायकी आणि सागरी युद्धाच्या सन्मानार्थ अथवा नाविक यशाबद्दलच्या नवसपूर्तीसाठी बनविण्यात आलेले होते. पंख असलेली ही नायकी देवता गलबताच्या नाळेवर संथपणे उतरत असावी, तशी दिसते. तिची जोमदार पण सुंदर हालचाल ग्रीकांश कलेचे वैशिष्ट्य दाखविते. तज्ज्ञांच्या मते ही प्रतिमा पायथोक्राईटस (Pythocritus) या शिल्पकाराने केली असावी. या प्रतिमेचे शीर आणि दोन्ही हात अस्तित्वात नाहीत. तरीही तिची उंची ९६ इंच, तर नौका ६ फूट ७ इंच उंचीची व पाया १ फूट २ इंचाचा आहे. या शिल्पप्रतिमेसाठी पारीन संगमरवर तर नौका व पायासाठी करडा ऱ्होडियन संगमरवर वापरलेला दिसतो. नायकीने परिधान केलेल्या दर्जेदार कापडातील लांब झगा वाऱ्याच्या प्रवाहाने उडताना दाखवलेला असून या चुण्या तिच्या दोन्ही पायांमध्ये आलेल्या दिसतात. या उडणाऱ्या कपड्यांच्या चुण्यांमधील बारकावे विशेष उल्लेखनीय आहेत.
ग्रीकांश कलेतील विषयांमध्ये आणि शैलीमध्ये वैविध्यता आढळते. या काळातील राज्यांच्या विस्तारामुळे झालेला कलेवरील तात्कालिक परिणाम म्हणजे कलाकृतींसाठी निर्माण झालेली विस्तारित विषयांची श्रेणी. या पूर्वीच्या काळात ग्रीक कलेत अपरंपरागत विषय हाताळल्याची फारच थोडी उदाहरणे आहेत. या विस्तारित विषयांमध्ये लहान मुले व वृद्ध अशाही रहिवाशांचे चित्रण आढळते. आधीच्या काळातील कलाकृतींच्या प्रतिकृती संग्रह करणाऱ्या उच्चवर्गीयांसाठी केल्या गेल्या होत्या.
संदर्भ :
- Burn, Lucilla, Hellenistic Art : From Alexander the Great to Augustus, London, 2004.
- Pollitt, J. J., Art in the Hellenistic Age, New York, 1986.
- Smith, R. R. R., Hellenistic Sculpture : A Handbook, London, 1991.
- Stansbury-O’donnell, Mark, A History of Greek Art, 2015.
- Tarn, Sir William, Hellenistic Civilization, London, 1953.
समीक्षक : नितीन हडप