भौमितिक रूपचिन्हांनी चित्रित केलेल्या मृत्पात्रांवरील चित्रणाची शैली म्हणजे भौमितिक चित्र शैली होय. प्राचीन ग्रीसमध्ये साधारण इ.स.पू. नवव्या ते सातव्या शतकात भौमितिक चित्रकला भरभराटीस आली. याचे अथेन्स हे प्रमुख केंद्र होते आणि तेथूनच ती इजीअन भूबेटांवर पसरली. आधीच्या मिनोअनमायसीनीअन कलेच्या तुलनेत या काळात नवीन रूपचिन्हांचा सजावटीसाठी वापर होऊ लागला. ग्रीक संस्कृतीत दैनंदिन गोष्टींसाठी तर मृत्पात्रांचा उपयोग होतच असे, त्याशिवाय कलशांचा दफनविधी संस्कारासाठी, स्मारकपात्र म्हणून तसेच परिसंवादासाठी इत्यादीप्रकारे वापर झालेला आढळतो. भौमितिक काळातील कलशांवर ‘होरोर वाकुई’  (horror vacui – म्हणजे लॅटिनमध्ये ‘रिक्त जागेची भीती’) ह्या चित्रणशैलीचा वापर झालेला दिसतो. ज्यात संपूर्ण पृष्ठभाग आकृत्यांनी आणि नक्षीदार नमुन्यांनी भरलेली दिसतो. या चित्रणामध्ये मृत्पात्रांवर वर्तुळांची पट्टी, स्वस्तिकांची पट्टी, प्राण्यांची पट्टी अशा एकाच आकाराचे पुनर्चित्रण करून आडव्या पट्ट्या भरलेल्या दिसतात.

पायक्सिस, झाकणासहित लहान पेटी, पक्वमृदा

आरंभिक भौमितिक शैलीतील (इ.स.पू. ९०० ते ८५०) मृत्पात्रांवर प्रामुख्याने रूपचिन्हे अमूर्त स्वरूपात दिसून येतात. ह्या मृत्पात्रांवर चित्रणानंतर काळी चकाकी दिलेली आढळते. या विशिष्ट शैलीला ‘काळी डीपिलोन शैली’ (Black Dipylon Style) असे ओळखतात. या काळातील मृत्पात्रे उंच आकाराची होती, तरी त्यावरील सजावट ही फक्त मृत्पात्रांच्या मानेपासून मधल्या भागापर्यंतच केलेली असे. या जागेवर मृत्पात्राच्या दोन्ही बाजूंना ठळक उभ्या रेषांचे टोपलीसारखे दिसणारे नक्षीकाम केलेले दिसते. कलशाच्या उर्वरित पार्श्वभागावर मातीच्या राळेचा पातळ थर दिलेला असे, ज्याचा रंग भाजल्यानंतर धातूसारखा गडद व चमकदार झाल्याचे दिसते. या काळात भौमितिक चित्रणातील वैशिष्ट्यपूर्ण घटक असलेले नागमोडी वळणांचे नक्षीकाम प्रथमच वापरलेले दिसते. इतर आकारांमध्ये सर्पिलाकार वळणे, त्रिकोण, स्वस्तिक असे विविध प्राथमिक भौमितिक आकार, ठोकळेवजा आकार, विस्तारित आकारांचे चित्रण केलेले दिसते. मृत्पात्रांचा खालचा भाग सहसा काळ्या रंगात रंगविलेला दिसतो व कलशावरील इतर उर्वरित भाग सजावटीपासून आडव्या रेषांनी वेगळा केलेला आढळतो. ह्या काळात विशिष्ट मृत्पात्रांची निर्मिती जास्त प्रमाणात झालेली आढळते. उदाहरणार्थ, अँफोराचा वापर प्रामुख्याने मृतात्म्यांची रक्षा ठेवण्यासाठी केलेला दिसतो. पुरुषांसाठी वापरण्यात आलेले अँफोरा धरण्यासाठीच्या मुठी मानेवर तर स्त्रियांसाठी वापरण्यात आलेल्या अँफोरा धरण्यासाठीच्या मुठी अँफोराच्या पोटावर केलेल्या आढळतात.

मध्य भौमितिक काळात (इ.स.पू. ८५० ते ७६०) मृत्पात्रांवर वरपासून खालपर्यंत चित्रित केलेल्या जाळीच्या  पट्ट्यांमुळे सजावटीच्या क्षेत्राची विभागणी झाल्याचे दिसते. याही काळात नागमोडी वळणांचा वापर मुबलक प्रमाणात दिसतो. नागमोडी वळणांचे नक्षीकाम कलशाच्या सर्वांत महत्त्वाच्या व दर्शनी भागावर म्हणजे दोन्ही मुठींच्या मधील पार्श्वभागावर केलेले दिसते. साधारण इ.स.पू. आठव्या शतकापासून शक्यतो संपूर्ण कलशावर ठळक रेषा व तपकिरी आणि काळ्या आकारांतील अलंकृत मानवी आकृती, घोडे, हरीण, हंस, बकरी इत्यादी पक्षी आणि प्राण्यांच्या आकारांचे चित्रण एकसारख्या पट्टीत केलेले आढळते.

डीपिलोन क्रॅटर,अथेन्स

उत्तर भौमितिक काळात (इ. स. पू. ७६० ते ७००) कलशांच्या मानेवर, खालच्या भागावर व दोन्ही मुठींच्या मधील भागात भौमितिक आकारातील प्राणी व मानवाकृतीचे चित्रण केलेले दिसून येते. या काळातील होमरच्या इलियड सारख्या कथांच्या उगमामुळे चित्रांत पौराणिक कथांचा समावेश होऊ लागला. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात भौमितिक आकार अधिक मुक्तपणे वापरलेले दिसतात. प्राणी, पक्षी, फुटलेल्या जहाजांचे भाग, शिकारीची दृश्ये, पौराणिक कथेतील अथवा होमरच्या काव्यातील संकल्पनांमुळे भौमितिक चित्रशैलीचे रूपांतरण होऊन चित्रकार अधिक नैसर्गिकरित्या अभिव्यक्त होऊ लागल्याचे आढळते.

पहिल्या मानवाकृतीचे चित्रण साधारण इ.स.पू. ७७० मध्ये कलशांच्या मुठीवर केलेले आढळते. मानवाकृतीचे चित्रण करताना आकृती एकावर एक न दाखवता प्रत्येक आकृती वेगळी रांगेत दाखवल्याने सहज ओळखता येते. पुरुषाकृती दाखवताना त्रिकोणी धड, गोलाकार डोके त्याच्या मध्यभागी नाकासाठी रंगाचा थेंब, लांब दंडगोलाकार मांड्या व पोटऱ्या तर स्त्रीआकृतीही अशाचप्रकारे, परंतु लांब केस दाखवताना रेषांच्या स्वरूपात व स्तन काखेखाली रेषांनीच दाखवलेले आढळतात.

भौमितिक चित्रशैलीतील उत्तम उदाहरणांमध्ये ‘डीपिलोन अँफोरा – दोन मुठी असलेले मद्यकुंभ’ (Dipylon Amphora) व ‘डीपिलोन क्रॅटर – मिश्रणपात्र’ (Dipylon Krater) यांचा समावेश होतो. डीपिलोन येथील दफनभूमीतील एका पुरुषाच्या थडग्यात स्मारकपात्र म्हणून ठेवलेले हे मिश्रणपात्र ४३ इंच उंचीचे आहे. या स्मारकपात्रावर मृत व्यक्तीच्या देहाची, दफनभूमीपर्यंतच्या मिरवणुकीची आणि अंत्ययात्रेपूर्वीची दृश्ये चित्रित केलेली आढळतात. या प्रोथेसिस (prothesis) दृश्यांमध्ये शवपेटीवरील मृतदेह आणि शोक करणारे वरील भागात चित्रित केलेले असून शोकमग्न लोक त्यांचे केस हातांनी खेचताना दाखविलेले आहेत. मृतदेह व त्यावर टाकायचे कफन चित्रकाराने वेगवेगळे चितारलेले दिसते. जेणेकरून चित्र बघणाऱ्यास दृश्य स्पष्ट समजावे. क्रॅटरच्या खालच्या भागात अंत्यविधीच्या मिरवणुकीत सामील झालेले रथ व विशिष्ट ढाली हातात घेतलेले सैन्य दाखवलेले दिसते. चित्रणातील मानवाकृती आणि प्राणी भौमितिक आकारांमध्ये चमकदार गडद रंगात आहेत. तर कलशावरील उर्वरित भागात आडव्या ओळींमध्ये नागमोडी वळणे, वक्र रेषा, वर्तुळे, स्वस्तिक ही रूपचिन्हे वापरून सजावट केलेली दिसते. मद्यकुंभ आणि मिश्रणपात्र दोन्हींवरील स्त्री व पुरुष आकृतींमधला फरक दाखविताना छाती किंवा टोक दर्शविण्यासाठी त्यांच्या छातीवर किंवा कमरेवर त्रिकोणाचा वापर केलेला आढळतो.

डीपिलोन अँफोरा

डीपिलोनच्या अपरिचित चित्रकाराने रंगविलेला अँफोरा (इ.स.पू. ७६०-७५०) एका खानदानी स्त्रीच्या थडग्यावर खूण म्हणून वापरण्यात आलेला होता. थडग्यांसाठी वापरण्यात आलेल्या या अँफोराची उंची साधारण ६३ इंच इतकी होती. तीन वेगवेगळ्या भागात बनवून नंतर एकसंध जोडलेला हा मद्यकुंभ कुंभाराच्या चाकावर बनविलेला आहे. त्याच्या तळाशी मृत व्यक्तीला अर्पण करायचा मद्याचा नैवेद्य ओतण्यासाठी छिद्र ठेवलेले आढळते. कलश सहज रित्या उचलता यावा म्हणून त्याच्या अंडाकृती भागावर दोन्ही बाजूस मुठी लावलेल्या आहेत. कलशाच्या बाहेर आलेल्या भागावर उत्तर भौमितिक काळातील वैशिष्ट्य असलेले आडव्या पट्ट्यांमध्ये दुहेरी व तिहेरी नागमोडी वळणांचे रंगीत नक्षीकाम दिसते. उंच गोलाकार मानेच्या पायथ्याशी भौमितिक शैलीतील हरीण व बोकडांची चित्रपट्टी  काढलेली आढळते. दोन मुठीच्या मधल्या भागात मृतदेहाच्या मिरवणुकीच्या दृश्यामध्ये तिरडीवर झोपवलेला वस्त्र परिधान केलेला स्त्रीचा मृतदेह, मृतदेहाच्या वरती आच्छादलेले कफन चौकडीच्या नक्षीमध्ये दाखविलेले आहे. मृतदेहाच्या पुढेमागेशोकमग्न स्त्री व पुरुषांच्या आकृती दाखवलेल्या असून त्यांचे सर्वांचे हात त्यांच्या डोक्यावर ठेवलेले आहेत. सर्व मानवाकृतींची डोकी गोल आकारांत, धड त्रिकोणाकृती, पायाच्या मांड्या व पाय निमुळते लंबाकृतीमध्ये दाखवलेले दिसतात.

भौमितिक काळात ग्रीसमध्ये स्थानिक कलाशाळा सुरू होऊन अथेन्स हे मृत्पात्रांच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र झाले. कॉरिंथ, बोएशिया, अर्गोस, क्रीट आणि सिक्लाडीझ येथील कुंभार व चित्रकारांनी अथेन्सची ॲटिक शैली आत्मसात करून त्या पुढील काळात साधारण इ.स.पू. आठव्या शतकापासून स्वत:ची नवीन शैली निर्माण केलेली दिसते.

संदर्भ :

  • Boardman, John, Early Greek Vase Painting : 11th-6th Centuries BC : A Handbook, London,
  • The Metropolitan Museum of Art, Department of Greek and Roman Art, “Geometric Art in Ancient Greece”, InHeilbrunn Timeline of Art History, New York, 2000.
  • The Metropolitan Museum of Art, Von Bothmer, Dietrich, Greek Vase Painting, New York, 1987.
  • Herford, Mary Antonie Beatrice, A Handbook of Greek Vase Painting, New York, 1995.  
  • http://www.metmuseum.org/toah/hd/grge/hd_grge.htm (October 2004)