इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी). या अशा भौतिक वस्तू (किंवा अशा वस्तूंचा गट) आहेत, ज्या संवेदक, प्रक्रिया क्षमता, सॉफ्टवेअर आणि इतर तंत्रज्ञानासह संयुक्ति असून इतर उपकरणांसोबत आणि प्रणालीसोबत आंतरजालकाद्वारे किंवा इतर संप्रेषण जालकाद्वारे माहितीचे/डेटाचे आदान-प्रदान करतात. आयओटी परस्पर संबंधित, आंतरजालक जोडलेल्या वस्तूंच्या प्रणालीचा संदर्भ देते, जे मानवी हस्तक्षेपाशिवाय वायरलेस (Wireless) जालकावर (नेटवर्कवर) डेटा गोळा आणि हस्तांतरित करण्यास सक्षम असतात. अंत:स्थापित प्रणाली (Embedded Systems), वायरलेस संवेदक जालक, नियंत्रण प्रणाली, स्वयंचलन (घरे आणि इमारती स्वयंचलनासह) आणि इतर सर्व गोष्टींचे आयओटी सक्षम करण्यात महत्त्वाचे योगदान आहे.

आयओटी २१ व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान बनले आहे. ही साधने सामान्य घरगुती वस्तूंपासून अत्याधुनिक औद्योगिक साधनांपर्यंत आहेत. आपले घरगुती जीवन सुलभ बनविणाऱ्या विविध आयओटी उपकरणांचा समावेश आहे. पण आयओटी उपकरणे घराबाहेरदेखील आढळतात. आयओटी आरोग्य सेवाप्रणालीमध्ये देखील वापरली जाऊ शकतात.

आयओटी इतिहास : आयओटीची सुरुवात १९८०च्या दशकात झाली, जेव्हा कार्नेगी मेलॉन (Carnegie Mellon) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पहिले आंतरजालक संयुक्तिक उपकरण विकसित केले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यांच्या विद्यापीठीय क्षेत्रात कोका-कोला विक्रीयंत्राला जालकाशी जोडणी केली आणि त्यातील उपलब्ध सामग्रीचा अहवाल देण्यास एक मार्ग तयार केला, जेणेकरून यंत्रामध्ये कोकचे किती डबे उपलब्ध आहेत आणि ते थंड असल्यास त्याचा अहवाल देण्यासाठी, त्यांनी यंत्रामध्ये सूक्ष्म-स्विच बसवले होते. यानंतरच आयओटी तंत्रज्ञानाची सुरूवात झाली.

आयओटीची कार्यप्रणाली : आयओटी परिसंस्थामध्ये जालक-सक्षम चलाख साधने असतात. प्रामुख्याने डेटा संकलित करणे, पाठविणे आणि त्यावर कार्य करण्यासाठी अंत:स्थापित प्रणालीचा वापर करतात, जसे की, प्रक्रियक, संवेदक आणि संप्रेषण हार्डवेअर.  यांचा वापर ते डेटा संकलित करणे व पाठविणे यांसाठी करतात. आयओटी साधने आयओटी गेट-वे (IoT Gateway) किंवा इतर साधनांशी जोडून त्यांनी संकलित केलेल्या संवेदक डेटा सामायिक करतात, जिथे डेटा एकतर क्लाउडवर विश्लेषित करण्यासाठी किंवा स्थानिक पातळीवर विश्लेषित करण्यासाठी पाठविला जातो. कधीकधी हे आयओटी साधने इतर संबंधित साधनांशी संवाद साधतात आणि एकमेकांकडून मिळालेल्या माहितीवर कार्य करतात. जरी लोक साधनांशी संवाद साधू शकत असले, तरीही उपकरणे बहुतेक काम मानवी हस्तक्षेपाशिवाय करतात.  उदा., त्याची मांडणी करणे, त्यांना सूचना देणे किंवा डेटामध्ये प्रवेश करणे. डेटा संकलन प्रक्रिया सुलभ आणि अधिक गतिमान करण्यासाठी आयओटी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय; Artificial Intelligence; AI) आणि यंत्र-अध्ययनाचा (मशीन लर्निंगचा) वापर करू शकते.

आयओटीचे महत्त्व : आयओटी लोकांना जगण्यास आणि हुशार काम (smart work) करण्यास मदत करते, तसेच त्यांच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण मिळवते. घरे स्वयंचलित करण्यासाठी चलाख साधने देण्याव्यतिरिक्त, आयओटी व्यवसायासाठी देखील आवश्यक आहे.  आयओटी व्यवसायाला त्यांच्या प्रणाली खरोखर कसे कार्य करतात याचा वास्तविक वेळ (रिअल-टाइम; Real time) दृष्टीक्षेप प्रदान करते, यंत्राच्या कार्यप्रदर्शनापासून पुरवठा साखळी आणि प्रमाणबद्ध प्रक्रियापर्यंत (लॉजिस्टिक ऑपरेशन्सपर्यंत) प्रत्येक गोष्टीत अंतर्दृष्टी प्रदान करते. आयओटी कंपन्यांना प्रक्रिया स्वयंचलितपणे चालविण्यास आणि कामगार खर्च कमी करण्यास सक्षम करते. आयओटीमुळे सेवावितरण सुधारते, ज्यामुळे वस्तूंचे उत्पादन आणि वितरण कमी खर्चिक होते, तसेच ग्राहकांच्या व्यवहारात पारदर्शकता येते.

पहा : अंत:स्थापित सॉफ्टवेअर.

कळीचे शब्द : #Wireless #Embedded Systems #control system.

संदर्भ :

समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर