गिरीपुष्प या वनस्पतीचा समावेश फॅबेल (Fabales) गणातील फॅबेसी (लेग्युमिनोसी) कुलात होतो. हिचे शास्त्रीय नाव ग्‍लिरीसीडिया सेपियम (Gliricidia sepium) असे आहे. जगभरात गिरीपुष्प वनस्पतीला ग्लिरीसीडिया, माता-रॅतोन, मदर ऑफ कोको, क्विक स्टिक, ट्री ऑफ आयर्न, फिदर डस्टर, गमाल अशा विविध नावांनी ओळखले जाते.

गिरीपुष्प हा पानझडी वृक्ष मूळचा मध्य अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय देशातील आहे. वसाहतवाद्यांनी त्याचा प्रसार कॉफी व कोकोच्या शेतीला सावली देण्यासाठी कॅरिबियन बेटे, फिलिपीन्स, भारत, श्रीलंका आणि पश्चिम आफ्रिका या देशात केला. श्रीलंकेत या वृक्षाचे आगमन १८९९ मध्ये त्रिनिदाद येथून झाले. मुंबईत १९१६ साली प्रथम लावण्यात आलेल्या या वृक्षाचे रोप श्रीलंकेतील पॅराडेनिया उद्यानातून आणलेल्या बीपासून मिलार्ड या शास्त्रज्ञांनी तयार केले होते.

गिरीपुष्प वृक्षाची उंची १०—१२ मीटर असते. याची साल गुळगुळीत हिरवट करडया रंगाची असून सोटमुळे जमिनीत खोलवर पसरत असल्याने ती माती घट्ट धरून ठेवतात. या वनस्पतीच्या बुंध्यावर व फांद्यांवर पांढऱ्या ठिपक्याच्या स्वरूपात श्वसनरंध्रे (lenticels) असतात. याच्या फांद्या तिरप्या असून जमिनीकडे झुकलेल्या असतात. पाने विषमपर्णिका संयुक्त प्रकारची असून २५—३० सेमी. लांब असतात. पर्णिकांची संख्या ९, ११, १३ ते १९ पर्यंत असू शकते. त्यांचा आकार चमच्यासारखा लांबट असून त्यावर मेणसर चमक आढळते. पर्णिकेची वरची बाजू गडद आणि खालची बाजू फिकट असते. हिवाळ्यामध्ये गिरीपुष्प निष्पर्ण होतो आणि पानांच्या बगलेमध्ये वीतभर लांबीचे असीमाक्ष प्रकारचे फुलांचे तुरे येतात. संपूर्ण झाड गुलाबी-जांभळट फुलांनी भरून आकर्षक दिसते. फुले साधारणपणे २ सेमी. लांब असून ती अनियमित, द्विलिंगी, अधोजाय असतात. निदलपुंज ५ संयुक्त, स्थायी, निदलांनी बनलेले असून ते नलिकाकार असते. दलपुंज हे ५ मुक्त असमान दलापासून बनलेले असते. यापैकी एक दल मोठे असते, त्यास पताका (स्टॅंडर्ड) असे म्हणतात. दोन बाजूस दोन लहान दल असतात; त्यांना पंख (विंग) असे म्हणतात. पताकेच्या समोर दोन सर्वांत लहान दले असून ती एका बाजूला जुळलेली असल्याने त्यांचा आकार नावेसारखा असतो. यास दलांजली (कील) असे म्हणतात. या सर्व दलांमुळे फुलास फुलपाखरासारखा आकार येतो म्हणून त्यास पतंगमरूप (Papilionaceous) असे नाव दिले आहे. पुमूंग हे १० पुं-केसरांचे बनलेले असून ते दलांजलीने आच्छादित आणि द्विवृंतकी म्हणजेच ९+१ अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे असते. जायांग हे एका स्त्री-केसराचे एक कप्पी असते. या कप्प्यामध्ये अनेक बीजांदे असतात. जायांगामध्ये तटलग्न अपरान्यास आढळतो. फुलांचा बहर फेब्रुवारी-मार्च पर्यंत सुरू राहतो. दरम्यान पोपटी पालवी आणि हिरव्या चपट्या शेंगाही यायला सुरुवात होते. बी आणि शेंगा आकर्षक, गडद काळसर-लाल-तपकिरी रंगाच्या असतात. शेंग १२—१५ सेमी. लांबट, चपटी आणि टोकदार असते. प्रत्येक शेंगेत ८—१० चपट्या बिया असतात. या वनस्पतीची अभिवृद्धी बियांद्वारे किंवा छाट कलमाद्वारे होते.

गिरीपुष्प वनस्पतीच्या बिया आणि साल यांत उंदिरनाशक विषारी द्रव्य असल्यामुळे त्याचे ग्लिरीसीडिया हे नाव योग्य ठरते. पानांमधील ग्लिरीसीडिन, बियांतील कॅनव्हानाइन आणि फुलांमधील ४३% व पानांतील १८% कौमारीन ही द्रव्ये प्राण्यांसाठी विषारी असतात. याच्या वाळलेल्या पानांची आणि फांदयांची धुरी केल्याने डास पिटाळले जातात. यात आढळून येणाऱ्या एकोस्ट्रिनोइक आम्ल (Eicostrienoic acid) या विशिष्ट घटकद्रव्यामुळे डासांचा उपद्रव कमी होतो. पानांचा लगदा करून त्याने गुरांना अंघोळ घातल्याने त्यांच्या शरीरावरील परपोषींचा (गोचीड, गोमाश्या, चामवा, उवा इत्यादी) त्रास नियंत्रणात ठेवता येतो. पानांची भुकटी पाण्यात मिसळून भाजलेल्या जखमेवर लावल्यास दाह कमी होतो. यांच्या पानांचा अर्क एक्झिमा व अन्य त्वचा रोगांवर गुणकारी आहे. मध्य अमेरिकेत तसेच कोलंबिया, मेक्सिको, वेस्ट इंडिज या देशांमध्ये या झाडाची पाने, साल आणि बिया कुटून भातात किंवा मक्याच्या पिठात मिसळून उंदीर आणि घुशी मारण्यासाठी वापरतात. मध्य अमेरिकेत पूर्वीपासून याची पाने व सालींची पूड मक्यासोबत घालून उंदीर मारण्यासाठी वापरतात. याच्या बियांतील कॅनव्हानाइन तसेच पानामधील ग्लिरीसीडिन या रसायनामुळे उंदीर व इतर कीटक दूर राहतात किंवा मरतात. यामुळे या वनस्पतीला ‘उंदीरमारी’ असेही म्हणतात.

गिरीपुष्प वनस्पतीच्या मुळांवर रायझोबियम जिवाणू सहजीवी (Symbiotic association) पद्धतीने सहज रीतीने गाठी विकसित करीत असल्याने नत्र स्थिरीकरण प्रभावीपणे केले जाते. समशीतोष्ण व उष्णकटिबंधीय प्रदेशात शेताभोवताली जैविक कुंपणासाठी, वारा-रोधक म्हणून याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाने नत्रयुक्त पोषक द्रव्यांनी युक्त असल्याने पालापाचोळा हरित खताकरीता उपयोगात आणतात. मेक्सिकोतील काही ठिकाणी याच्या फुलांचा अन्न म्हणून वापर करतात. मधुमक्षिकापालनासाठी फुलांपासून मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध होते. लाकूड सावकाश जळते आणि त्याचा धूर कमी होतो. गळून पडलेली पाने आणि फुले यांचा उत्तम नत्रयुक्त खत म्हणून वापर होतो. नुसत्या फुलात ३.३६% नायट्रोजन असतो.

संदर्भ :

  • Glover, N., (ed.) Gliricidia production and use. Nitrogen Fixing Tree Association, Hawaii, USA. 44 pp, 1989.

समीक्षक : शरद चाफेकर