राइट, अल्मरॉथ एडवर्ड : (१० ऑगस्ट १८६१ – ३० एप्रिल १९४७) अल्मरॉथ एडवर्ड राइट यांचा जन्म मिडलटोन त्यास या उत्तर यॉर्कशायर परगण्यातील गावात झाला. त्यांनी डब्लीन येथील ट्रिनिटी कॉलेजमधून आधुनिक साहित्य या विषयात सुवर्णपदकासह पदवी मिळवली. हे शिक्षण चालू असतांनाच त्यांनी ट्रिनिटी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केली. नंतर ते नेटले येथील ब्रिटिश सैनिकी महाविद्यालयात रोगनिदानशास्त्रात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे असतांना त्यांनी लस आणि रोगप्रतिकारक क्षमता या विषयात काम केले.

लंडनच्या वैद्यकीय महाविद्यालयातील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये संशोधन विभाग सुरू केला. या ठिकाणी त्यांनी टायफॉइड विरोधी लस तयार करण्याची पद्धती विकसित केली. त्यांनी पार्क-डेव्हिस कंपनीच्या भागीदारीत टायफॉइड लशीची औद्योगिक पातळीवर निर्मिती सुरू केली आणि तिची ३००० भारतीय सैनिकांवर आणि दक्षिण आफ्रिकेतील बोर युद्धातदेखील सैनिकांवर चाचणी केली. पहिल्या महायुद्धाच्या कालावधीत राइट यांची सल्लागार डॉक्टर म्हणून नियुक्ती करून कर्नल ही रॅंक देऊन त्यांना फ्रांसला प्रयोगशाळा उभारण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी बुलोन शुनमेर या बंदरावरील एका हॉस्पिटलमध्ये ही संशोधन प्रयोगशाळा थाटली होती. पहिल्या महायुद्धात लॉर्ड किचनर यांच्या संमतीने त्यांनी सैन्य अधिकार्‍यांना संगितले होते की उत्तर फ्रांसमधील सैनिकांना वाचवण्यासाठी एक कोटी लशींची मात्रा तयार ठेवावी. येथे सैनिकांचे लसीकरण केल्यामुळे ब्रिटिश सैनिकांच्या मृत्युची  संख्या घटली होती. त्यांच्या टायफॉइड लसीच्या प्रयोगशाळेत ओबडधोबड स्वरूपाची घरगुती उपकरणे वापरुन त्यांनी  प्राथमिक स्वरूपाच्या चाचण्या स्वतःच घेतल्या. बोटावर टोचून त्यातून केशनलिकेच्या सहाय्याने रक्ताचे नमुने  घेऊन  त्याच्या तपासण्या केल्या. चाचण्यातील सारखेपणा राखण्यासाठी त्यांनी सारख्या आकाराच्या केशनलिका तयार करून घेतल्या होत्या.

ते सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये परत आले आणि निवृत्तीपर्यंत तेथेच होते. आलेक्झांडर फ्लेमिंगसारख्या जीवाणुशास्त्रज्ञाने राइट यांनी घालून दिलेल्या पद्धतींचा वापर करूनच पुढे सेंट मेरी हॉस्पिटलमध्येच लायसोझाईम आणि पेनिसिलीनचा शोध लावला. लिओनार्ड कोलब्रुक यांनी राइट यांचा सहकारी म्हणून काम केले. राइट यांनी एन्टेरीक ट्यूबर्क्युलॉसिस आणि न्यूमोनियासाठीदेखील लस तयार केली होती. प्रतिपिंडाच्या स्वरूपातील आणि पेशीपातळीवरील रोगप्रतिकारक क्षमता कशी काम करते याच्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांनी असे दाखवून दिले की पेशीद्रवात ऑप्सोनिन या पदार्थाद्वारे रोगकारक जंतूंचे भक्षण होते. पांढर्‍या रक्तपेशी या रोगजंतूंच्या भक्षणाचे कार्य ऑप्सोनिन या रक्तातील विकिरामुळे करतात हा महत्त्वपूर्ण शोध त्यांनी लावला.

प्रतिजैविके ही भविष्यात जिवाणूंना मारण्यास असमर्थ ठरतील आणि त्यामुळे रोगजंतुंचा धोका अधिकच वाढेल असे भाकीत राइट यांनी केले होते. गुणकारी औषधांपेक्षा प्रतिबंधात्मक औषधे ही अधिक परिणामकारक असतील असे विचार त्यांनी  व्यक्त केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ ७० वर्षानंतर सायंटिफिक अमेरिकनसारख्या संशोधन पत्रिकेला त्यांची तीच कल्पना ठामपणे पुन्हा सांगितली. त्या काळात त्यांनी असा युक्तिवाद केला होता की सूक्ष्मजंतु हे रोगाचे वाहक असतात, रोगकारक नसतात. या विधानावरून त्याच्या विरोधकांनी त्या वेळी त्यांची खिल्ली देखील उडवली होती.

अल्मरॉथ एडवर्ड राइट यांना आयुष्यात २९ वेगवेगळे सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यात, नाइटहुड सन्मान, रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, डब्लीन विद्यापीठाची डी.एससी. पदवी, ५ मानद डॉक्टरेट पदव्या, ५ मानद ऑर्डर्स, फोथेर्गिल सुवर्णपदक, बुकॅनन मेडल, रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनतर्फे युद्धकाळातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गौरव, १४ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामनिर्देशन, लंडनच्या सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नावाने एक खास परितोषिक हे आहेत..

फर्नहॅम कॉमन, युनायटेड किंगडम या ठिकाणी त्यांना देवाज्ञा झाली.

संदर्भ :  

समीक्षक : अनघा ताठे