बॉयर, हर्बर्ट : (१० जुलै १९३६) हर्बर्ट बॉयर यांना लहानपणी अभ्यासात मुळीच रस नव्हता. त्यांचे सारे लक्ष फूटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉलकडे लागलेले असे. त्यांचा फूटबॉल आणि बेसबॉलचा शिक्षक शाळेत त्यांना विज्ञान आणि गणित शिकवीत असे, त्या कोचच्या प्रयत्नाने हर्बर्टला विज्ञानाची गोडी लागली. हर्बर्ट बॉयर जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पदवीधर झाले. त्यांना खरे तर वैद्यकीय अभ्यास करायचा होता पण ते त्या अभ्यासक्रमासाठी निवडले गेले नाहीत म्हणून त्यांनी पिट्सबर्ग विद्यापीठात पीएच्.डी.साठी प्रवेश घेतला. जनुक नियमावली (genetic code) ची संरचना ह्या विषयावर त्यांनी पीएच्.डी.चे संशोधन केले.

पीएच्.डी.चे संशोधन करीत असतानाच गुणसूत्रातील डीएनए एका जिवाणूतून दुसर्‍या जिवाणूत कसे शिरत असावे हे कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देई ना. ह्या विषयावर पुढील संशोधन करण्यासाठी ते एडवर्ड एडेलबर्ग यांच्या विभागात येल विद्यापीठात दाखल झाले. पुढील तीन वर्षे ते जीवाणूमधील प्लास्मिड्स, त्यांचे शुद्धीकरण, तसेच जीवाणूमधील डीएनए कापणारी किंवा ते बदलणारी विकरे यांचा अभ्यास करीत होते. या विकरांमुळे डीएनए कापून जोडता येईल तसेच डीएनएच्या गुणधर्मांचा अभ्यास करता येईल हे त्यांच्या लगेच लक्षात आले. सान फ्रान्सिस्को येथील कॅलीफोर्निया विद्यापीठात त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्रोफेसरचे पद स्वीकारले आणि पेशी डीएनएमधील वैशिष्ट्यपूर्ण बेसेसचा क्रम (base sequence) कसा ओळखत असतील या विषयावर ते डीएनए कापणारी व बदलणारी विकरे (restriction & modification enzymes) वापरून संशोधन करू लागले. हर्बर्ट बॉयर व त्यांचा पीएच्.डी.चा विद्यार्थी बॉब हेलिंग यांनी ईश्चरेशिया कोली मधील एक डीएनए कातरणारे विकर शोधून काढले. याच विकराला नंतर इको आर वन (EcoR I) हे नाव देण्यात आले. या विकराचा फायदा म्हणजे डीएनएच्या शेवटी तयार झालेले परस्परव्यापी (overlapping) पॅलीनड्रॉमिक (palindromic) एकेरी धागे या विकराच्या मदतीने ते परत एकत्र जोडू शकत होते. यानंतर लगेचच स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या स्टॅनले कोहेन यांच्या मदतीने त्यांनी पहिला संयोजित (recombinant) डीएनएचा रेणू बनविला. तो बनविण्यासाठी त्यांनी बॉयर यांचे विकर, कोहेन यांचे प्लास्मिड तर स्टॅनले फाल्कोव यांचे तंत्रज्ञान उपयोगात आणले. बॉयर ह्यांनी नंतरच्या काळात या तंत्रज्ञानात सुधारणा घडवून आणल्या, आणि त्याचा व्यावहारिक वापर सुद्धा केला. या संपूर्ण कालावधीत बॉयर सान फ्रान्सिस्कोच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रोफेसर तर हार्वर्ड हुजेस वैद्यकीय संघटनेत अन्वेषक होते.

हर्बर्ट बॉयर यांनी फक्त संयोजित डीएनए तयार करण्याचे तंत्रज्ञानच शोधले नाही तर भांडवलदार रॉबर्ट स्वन्सन यांच्या मदतीने जैवतंत्रज्ञान वापरणारी पहिली व्यापारी कंपनी जीनेन्टेक प्रस्थापित केली. पंधरा वर्षे ते या कंपनीचे उपाध्यक्ष होते.

पंधरा वर्षांच्या या कालावधीत त्यांनी इन्सुलिनसारखी मानवी प्रथिने मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल हे जगाला दाखवून दिले. या त्यांच्या संशोधनासाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान देण्यात आले. यांपैकी अल्बर्ट लास्कर पुरस्कार, राष्ट्रीय विज्ञान पदक, पर्किन पदक हे होत.

बॉयर यांनी शंभरहून अधिक लेख Gene; Science; Nucleic Acids Research; Biotechnology यांसारख्या प्रख्यात संशोधन पत्रिकांत प्रसिद्ध केले आहे.

बॉयर व त्यांची पत्नी मेरी ग्रेस ह्यांनी येल वैद्यकीय महाविद्यालयाला एक कोटी डॉलर्स एवढ्या रकमेची देणगी दिली म्हणून या संस्थेच्या रेण्वीय वैद्यकीय विभागाला ‘बॉयर विभाग’ असे नाव दिले. सेंट विन्सेंट कॉलेजने त्यांच्या नैसर्गिक विज्ञान व संगणकशास्त्र विद्यालयाचे नाव बदलून हर्बर्ट बॉयर यांच्या सन्मानार्थ बॉयर विद्यालय असे ठेवले आहे.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे