डेमेरेक, मिलीस्लाव : (११ जानेवारी १८९५ – १२ एप्रिल १९६६) मिलीस्लाव डेमेरेक यांचा जन्म युगोस्लावियामधील कोस्तानिका या ठिकाणी झाला. युगोस्लावियातील क्रिझेवी येथील शेतकी महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. क्रिझेवी प्रयोगशाळेत १९१९ पर्यंत ते प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत होते. अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठात पीएच्.डी. करत असताना अनेक वर्षे ते कॉर्नेल विद्यापीठात वनस्पतींच्या प्रजनन विभागात सहाय्यक होते. अनुवांशिकीशास्त्रात डॉक्टरेट मिळाल्यानंतर त्यांनी निवासी संशोधक म्हणून न्यूयॉर्कच्या कोल्ड स्प्रिंग हार्बर येथील अनुवंशशास्त्र विभागात काम पाहण्यास सुरुवात केली. पुढे ते या संस्थेचे सहाय्यक संचालक आणि नंतर संचालक नेमले गेले. शेजारच्या लॉंग आयलंड जीवशास्त्र संघटनेच्या प्रयोगशाळेचेही ते संचालक होते, नंतर या संस्थेचे नामकरण जीव-संख्याशास्त्राची कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळा असे करण्यात आले.
अमेरिकेत स्थलांतर केल्यानंतर सुरुवातीला कॉर्नेल विद्यापीठाच्या वनस्पती प्रजनन विभागात सहाय्यक म्हणून डेमेरेक यांना काम मिळाले. इमर्सन यांच्या हाताखाली चार वर्षे मक्याचे दाणे, पाने वा रोपांमधील रंगवैविध्यामागील अनुवांशिक कारणे शोधण्याचा प्रयत्न डीमेरेक यांनी केला. न्यूयॉर्कमधील कार्नेजी संस्थेमधील अनुवंशशास्त्र विभागात निवासी संशोधक ते लॉंग आयलंड जीवशास्त्र प्रयोगशाळेचे व कार्नेजी संस्थेत अनुवंशशास्त्र विभागाचे संचालक अशा त्यांच्या साधारण वीस वर्षांच्या प्रवासात त्यांनी या दोन्ही संस्था नावारूपाला आणल्या. डेमेरेक यांच्या सेवानिवृत्तीनंतर ब्रूकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळेत जीवाणू अनुवंशशास्त्र विभागात ज्येष्ठ संशोधक म्हणून व लॉंग आयलंड विद्यापीठाच्या पोस्ट महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून एक वर्ष ते कार्यरत होते. युगोस्लावियाच्या शासनाने डेमेरेक यांच्या संशोधनातील कर्तृत्वाचा ऑर्डर ऑफ सेंट सावा ही उपाधी देऊन गौरव केला. याशिवाय ग्रेट ब्रिटन, चिली, जपान, युगोस्लाविया व अमेरिकेतील अनेक नामवंत वैज्ञानिक संस्थांचे ते मानद सभासद होते. पोस्ट कॉलेज तसेच संख्यात्मक जीवशास्त्राच्या कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेने आपल्या इमारतीला डीमेरेक यांचे नाव देऊन त्यांचा उचित गौरव केला आहे.
सेहेचाळीस वर्षांच्या आपल्या वैज्ञानिक कारकिर्दीची सुरुवात जरी डेमेरेक यांनी मक्याच्या दाण्यांमधील व नवीन रोपांमधील रंगवैविध्य, पानांवरचे पांढरट वा हिरवे पट्टे यांच्या अभ्यासापासून केली असली तरी हे संशोधन करीत असताना जनुकांची रचना व त्यांचे कार्य, जनुकांचे परिवर्तन या विषयातही त्यांना गोडी निर्माण झाली व नंतरचे बरेचसे त्यांचे संशोधन जीवाणू /चिलटांमधील किंवा दुधाळी (Delphinium) सारख्या फुलामधील जनुके व त्यात होणारे परिवर्तन यावर आधारित होते. अस्थिर जनुकांचा उत्परिर्तनाचा वेग समजण्यासाठी त्यांनी केलेला चिलटांचा वापर आजही त्यासाठी आदर्श समजला जातो. चिलटांच्या वेगवेगळ्या ऊतींमध्ये तसेच त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांत या जनुकांचा उत्परिवर्तनाचा वेग बदलतो हे त्यांनी प्रथम सिद्ध केले. क्ष-किरणांचा व अतिनील किरणांचा पेशींवर होणारा परिणाम, त्यामुळे चिलटांमध्ये निर्माण होणार्या उणीवांचाही मार्गारेट हूवर, कॉफमन यांच्यासारख्या वैज्ञानिकांच्या मदतीने त्यांनी अभ्यास केला. या उणीवा शोधण्यासाठी त्यांनी चिलटांमधील लाळोत्पादक ग्रंथींचा वापर केला. दुसर्या जागतिक युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकांना वाचवण्यासाठी प्रतिजैविकाची असलेली गरज त्यांच्या लक्षात आली व त्यानंतर त्यांनी पेनिसिलीअम या बुरशीमध्ये परिवर्तन घडवून आणून पेनिसिलीन या प्रतिजैविकाची निर्मिती अनेक पटींनी वाढवता येते हे सिद्ध केले. उत्परिवर्तनाने ईश्चरेशिया कोलीपासून कोलीफाजना (ईश्चरेशिया कोली या जीवाणूला खाणारा विषाणू) न दाद देणार्या नवीन प्रजाती उदयाला येतात या कामावरील त्यांचा संशोधन लेख उगो फानो यांच्या सहकार्याने प्रसिद्ध झाला. हे उत्परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी अतिनील किरणांचा तसेच रासायनिक उत्प्रेरकांचा (chemical mutagen) वापर केला. या संशोधनामुळे प्रतिजैविकांचा सुरुवातीचा डोस कमी असला तर जीवाणू प्रतिजैविकांचा प्रतिकार करू शकतात तसेच दोन प्रतिजैविके एकत्र वापरली तर जीवणुंना उत्परिवर्तन घडवण्याची संधी मिळत नाही हेही त्यांनी दाखवून दिले. जनुकांमधील बदल मापण्याच्या तंत्राचा उपयोग करून साल्मोनेला जीवाणूमधील ॲमिनो अम्ल तसेच अडीनोसीन आणि गुयानिन हे प्युरीन्स बनवणार्या जनुकांच्या संरचनेचे त्यांनी विश्लेषण केले.
कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेचे संचालक असताना त्यांनी जीव-संख्याशास्त्र (Quantitative Biology) या विषयावर अनेक परिसंवाद घडवून आणले व प्रसिद्ध केले. या ग्रंथांचे संपादन डेमेरेक यांचे आहे. Drosophila Guide; Biology of Drosophila; Advances in Genetics; Drosophila Information Service यासारख्या अनेक पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे.
त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेले अनेक संशोधन लेख हे दाखवून देतात की लॉंग आयलंड विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत असताना हृदयविकाराने अचानक त्यांचा मृत्यु होईपर्यंत ते संशोधनात सक्रिय राहिले.
संदर्भ :
- Hollaender, A., Sansome E. R., Zimmer, E., Demerec, M., April 1945, “Quantitative Irradiation Experiments with Neurosporacrassa. II. Ultraviolet Irradiation”, American Journal of Botany 32(4):226-235
- http://www.nasonline.org/publications/biographical-memoirs/memoir-pdfs/demerec-milislav.pdf
- http://library.cshl.edu/oralhistory/topic/cshl/milislav-demerec/
- http://library.cshl.edu/exhibits/bridges/_pages/page6_CSHL.html
- http://www.estherlederberg.com/Papers.html
समीक्षक : रंजन गर्गे