कुनीन, यूजीन व्हिक्टरॉव्हिच (Koonin,Eugene Viktorovich) : (२६ ऑक्टोबर, १९५६) यूजीन कुनीन यांचा जन्म रशियामध्ये मॉस्को येथे झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. यूजीन प्राथमिक शाळेत असतानाच त्यांना डीएनएच्या द्विसर्पिल रेणूबद्दल आणि जनुकीय सांकेतिक भाषेबद्दल माहिती सांगण्यात आली होती. ती त्यांना रोचक वाटली होती.

त्यांनी मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीतून एम.एस्सी. पदवी मिळवली. याच विद्यापीठातून कुनीन यांनी पीएच्.डी. प्रदान केली. कुनीन यांनी सुरुवातीला रेण्वीय जीवशास्त्र विभागात जाण्याचे ठरवले होते. परंतु विद्यापीठातील विषाणूशास्त्र विभाग पाहिल्यानंतर त्यांनी विषाणूशास्त्रात प्रवेश घेतला. त्यांच्या पीएच्.डी. प्रबंधाचा विषय होता ‘मेंदू-स्नायू क्षोभकारक विषाणूंतील बहुविकरांची संरचना’ (Multi enzyme organization of encephalo myocarditis virus replication complexes). त्यांचे पीएच्.डी.चे मार्गदर्शक वदीम आय. ॲगोल होते.

कुनीन यांनी आठ वर्षे संगणकीय जीवशास्त्र संशोधक म्हणून इन्स्टिट्यूटस ऑफ पोलिओ मायलायटिस अँड मायक्रोबायॉलॉजीमध्ये काम केले. विषाणूंची जीवरासायनिक घटना, जीवाणूंची अनुवांशिकता या ज्ञानशाखांत त्यांचे काम चाले. रेणूपातळीवर उत्क्रांतीचे आकलन होण्याच्या दिशेने त्यांचे काम होत होते.

कुनीन जर्मनीत बर्लिनला गेले तेथे जेम्स कॅरिंग्टन या वनस्पती विषाणूशास्त्रज्ञाशी त्यांची भेट झाली. या भेटीत कुनीन यांनी कॅरिंग्टन काम करत होते त्या प्रथिनाबद्दल एक मुद्दा मांडला. त्यातून कॅरिंग्टन यांना कुनीन यांच्या अभ्यासाची खोली जाणवली. कॅरिंग्टन यांनी कुनीन आणि कुनीन यांचे सहकारी, व्हॅलेरियन डोल्जा, यांना टेक्सास येथील ए अँड एम विद्यापीठात येण्याचे आमंत्रण दिले. कॅरिंग्टनना प्रथिन आणि विषाणूंची उत्क्रांती यावर रस असल्याने कुनीन यांनी त्यावर लक्ष केंद्रित करावे असा प्रस्ताव त्यांनी ठेवला.

सोविएत युनियनचे विखंडन होण्यापूर्वी दीड महिना कुनीन आणि त्यांचे कुटुंबीय सोविएत युनियन ऑफ रशिया सोडून बेथेस्डा, मेरिलँड येथे राहण्यास आले. तेथेच त्यांची नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मशन (एनसीबीआय NCBI) या संस्थेत नेमणूक झाली. अल्पावधीतच उत्क्रांतीशास्त्रज्ञ आणि संगणकीय जीवशास्त्रज्ञ म्हणून कुनीन प्रख्यात झाले. ते या संस्थेत मुख्य अन्वेषक म्हणून काम बघत आहेत. यावेळी सहायक प्राध्यापक म्हणून कुनीन, जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बोस्टन युनिव्हर्सिटी आणि इस्रायल मधील हैफा विद्यापीठ यात कार्यरत होते. त्यांच्या खास अभ्यासाचे विषय म्हणजे – जनुकसंचांचा (genome) तुलनात्मक अभ्यास आणि उत्क्रांती. एकपेशीय जीवाणू समस्थानी जनुक हस्तांतरण हे होत. प्लाज्स्मिडच्या स्वरूपात समस्थानी जनुकांची देवाण-घेवाण झाल्याने सजीवाची रचना आणि कार्य यामध्ये बदल होतो. यातून उत्क्रांतीचा वेग वाढतो.

कुनीन यांना दृश्यकेंद्रकी सजीवांच्या जनुकसंचातील प्राचीन अव्यक्त खंडांचा मागोवा घेणे आवडते. प्राचीन काळापासून जगत आलेल्या अनेक जीव प्रकारांच्या जनुकसंचांची काटेकोर तुलना केल्यास, त्यांचा एकमेकांशी संबंध उलगडू शकतो. असे संबंध किंवा त्यांचा अभाव, उत्क्रांती समजण्यास मदत करतो. या अभ्यासातून जीववृक्षाच्या कोणत्या शाखेवर, उपशाखेवर एखाद्या प्रकारच्या जीवाला स्थान द्यावे हे ठरवता येते. सजीवात जनुकांची भर पडते की घट होते. अस्तित्वात असलेल्या जनुकाचे काम बदलते का, असल्यास कसे बदलते अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ते आणि सहकारी प्रयत्न करत आहेत.

त्यांची सहकारी किरा माकारोव्हाबरोबरच्या संशोधनात त्यांनी क्रिस्पर-कास ९ नावाचा जनुक खंड शोधला. जीवाणू आणि आदिजीवाणू यांच्या पेशींतील क्रिस्पर-कास ९ ही एक विषाणूमधील जनुकांचे क्रम जीवाणू किंवा आदिजीवाणूंच्या पेशींत समाविष्ट झाली असतील तर शोधून काढते. परकीय जनुकक्रम संपादन व अशा क्रमांचा नाश हे क्रिस्पर-कास ९, संरक्षण प्रणालीचे कार्य आहे. यातून जनुक संपादनाचे साधन विकसित केले गेले आहे.

सात प्रातिनिधिक सजीवांच्या जिनोमचे बरेच तपशील आता ठाऊक झाले आहेत. पेशीं जिनोम आणि विषाणू जिनोम यातील साम्ये लक्षात येत आहेत. जिनोममधील काही विशिष्ट जनुकक्रम विविध जीवांमध्ये हजारो, लाखो वर्षे टिकून राहिले. ते जनुकक्रम विविध जातीत वेगवेगळ्या काळात नव्याने निर्माण झाले की जीवन संघर्षात उपयोगी असल्याने टिकून राहिले असावेत हे सजीवांच्या उत्क्रांती समजण्यासाठी उपयोगी पडत आहे. एके काळी बाह्य किंवा ढोबळ शरीररचनेवरून जीवांचे वर्गीकरण करत. आता जनुकक्रमांच्या तुलनेवरून केलेल्या अभ्यासामुळे अधिक विश्वासार्ह निष्कर्ष मिळत आहेत. कुनीन यांच्या मते आणखी दोन तीन दशकांत जीवसृष्टीच्या मुख्य घटक जीव प्रकारांचा आंतरसंबंध, जनुकक्रमांच्या तुलनात्मक अभ्यासामुळे स्पष्ट होईल. कुनीन यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे हल्ली त्यांचे सर्व काम संगणकावर होते. त्यांना प्रयोगशाळेत, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन काम करावे लागत नाही. कारण प्रयोगशाळेत काम करणारे अनेक संशोधक त्यांना विदा पुरवत असतात. कुनीन तिचे विश्लेषण करतात. विश्लेषण आधारित अशा कुनीन यांच्या अटकळी, मते, आणि निष्कर्ष प्रयोगनिष्ठ संशोधक मागवतात आणि आपली अंतिम अनुमाने काढतात.

अतिमहाकाय विषाणूंचा शोध लागल्यावर कुनीन यांनी पुन्हा एकदा विषाणूंवर संशोधन करण्याकडे मोर्चा वळविला आहे. कुनीन यांच्या संगणकीय निरीक्षणांचा वैज्ञानिक प्रयोगांसाठी व्यावहारिक उपयोग केला जात आहे. कुनीन यांची संगणकीय निरीक्षणे रोगसंबंधित मानवी जनुके आणि त्यांच्यापासून बनणारी प्रथिने शोधण्यास उपयोगी पडत आहेत.

द लॉजिक ऑफ चान्स : द नेचर अँड ओरिजिन ऑफ बायॉलॉजिकल इव्हॉल्युशन आणि इव्हॉल्युशन फंक्शन: कॉम्प्यूटेशनल ॲप्रोचेस इन कम्पॅरेटिव्ह जिनोमिक्स हे दोन ग्रंथ कुनीन यांनी लिहिले आहेत. कुनीन यांचे जिनोम्स, उत्क्रांती, अनुवांशिकी, संगणकीय जीवशास्त्र अशा विषयावर सुमारे सहाशे शोधनिबंध प्रख्यात वैज्ञानिक नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत. ट्रेंड्स इन जेनेटिक्स या वैज्ञानिक नियतकालिकाच्या संपादन सल्लागार मंडळाचे कुनीन सदस्य आहेत. बायॉलॉजी डायरेक्ट या मुक्तपणे उपलब्ध असलेल्या नियतकालिकाचे ते उपमुख्य संपादक आहेत. कुनीन बायोइन्फॉर्मॅटिक्स जर्नलच्या संपादक मंडळाचे दोन वर्षे सदस्य होते.

फॅकल्टी १००० हा जीवशास्त्र आणि वैद्यक विषयातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ संशोधकांचा मोठा विद्वत समुदाय आहे. या फॅकल्टी १००० मध्ये कुनीन बायोइन्फॉर्मॅटिक्स ज्ञानशाखेचे सल्लागार मंडळ सदस्य आहेत. फॅकल्टी १००० ही सेवा संशोधकांना त्यांनी कोणते शोधनिबंध वाचावे याची शिफारस करते. प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांची, शोधनिबंधांची प्रचंड संख्या आणि निवडीसाठी उपलब्ध असणारा अल्प वेळ यामुळे अशा शिफारस सेवा लोकप्रिय होत आहेत.

कुनीन यांची नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून नेमणूक झाली. सिमॅन्टिक्स स्कॉलरने पहिल्या दहा जास्तीत जास्त प्रभावशाली जैववैज्ञानिकांत कुनीन यांची गणना केली. सिमॅन्टिक्स स्कॉलर ही आज्ञावली शोधनिबंध सारांश केवळ एका वाक्यात देते. सुमारे सत्तर लाख विज्ञान अभ्यासक अशा अतिसंक्षिप्त सारांशावरुन पूर्ण शोधनिबंध वाचावा का हे ठरवतात.

संदर्भ :

समीक्षक : मद्वाण्णा मोहन