पॉलिंग, लायनस कार्ल : (२८ फेब्रुवारी १९०१ – १९ ऑगस्ट १९९४) लायनस पॉलिंग यांचा जन्म अमेरिकेतील पोर्टलँड, या ओरेगन राज्याच्या राजधानीत झाला. पोर्टलँडबाहेर ओस्वेगोच्या आसपासच्या शाळांत लायनस यांचे शालेय शिक्षण झाले. लायनसचा मित्र लॉइड जेफ्फ्रीस याने स्वतःच्या घरात प्रयोगसाहित्य आणून एक छोटी प्रयोगशाळा उभारली होती. तेथे तो रसायनशास्त्राचे प्रयोग करीत असे. ते लायनस यांना अद्भुत वाटे. लायनस आणि लॉइड सायमन या मित्रांनी एका पोलाद कारखान्यातून निरुपयोगी वस्तू वापरून दुधातील स्निग्ध पदार्थ तपासून देण्याची सेवा डेअरी मालकांना देऊ केली. परंतु त्यांच्यावर डेअरी मालकाचा विश्वास बसला नाही.

वयाच्या पंधराव्या वर्षी पॉलिंग यांनी इतिहासाचा अभ्यासक्रम पूर्ण न केल्याने ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीने त्यांना प्रवेश नाकारला. पॉलिंग यांनी शाळा सोडली. दोन नोबेल पुरस्कार मिळाल्यावर पंचेचाळीस वर्षांनी शाळेने त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे जाहीर केले. परंतु पॉलिंग यांनी कॉलेज शिक्षणासाठीचे पैसे स्वतः कमावले. त्यासाठी दुकानांत, कारखान्यांत अर्धवेळ कामे केली. महाविद्यालयात प्रवेश घेतला. आईला आर्थिक मदत हवी होती तेव्हा तिलामूकमधील जहाज बांधणीच्या कारखान्यात पूर्ण वेळ मजूरी केली. रात्रपाळीत रस्त्यावर डांबर टाकण्याचे काम केले, पण कॉलेज शिक्षण चालू ठेवले. लवकरच महाविद्यालयाने संख्यात्मक विश्लेषण विषय कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी दिली. मग दमवून टाकणारी श्रमाची कामे सोडून, अध्यापनातून फीपुरते पैसे गोळा केले.

पॉलिंग यांनी ओरेगन ॲग्रिकल्चरल कॉलेजमधून रसायन अभियंता ही पदवी मिळवली. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) पासाडीना, कॅलिफोर्निया येथून पॉलिंग यांनी रॉस्को डिकिन्सन आणि रिचर्ड टॉल्मन यांच्या मार्गदर्शना खाली क्ष-किरण विवर्तन पद्धतीने स्फटिक-रचनेचा अभ्यास सुरू केला. त्यांनी कॅल्टेकमधील वास्तव्यात खनिज स्फटिक रचनेवर सात शोधनिबंध प्रकाशित केले. मग त्यांना गणितीय भौतिकी आणि भौतिक-रसायन यातील संशोधनाबद्दल विशेष प्राविण्यासह पीएच्.डी. मिळाली.

पुढे पॉलिंग यांना उद्योगपती गगन्हीम अभिछात्र वृत्तीवर यूरोप दौरा करण्याची संधी मिळाली. झुरीचमध्ये प्रख्यात ऑस्ट्रियन संशोधक अर्विन श्रोडिंगर यांचे मार्गदर्शन घेता आले. श्रोडिंगर क्वांटम मेकॅनिक्स आणि भौतिकीच्या अन्य शाखांतील अग्रगण्य शास्त्रज्ञ होते. क्वांटम मेकॅनिक्स रसायनशास्त्राशी जोडून अणूरचना समजायला त्याची मदत होऊ शकेल का, याचा पॉलिंग विचार करू लागले. सखोल अभ्यासानंतर ते क्वांटम केमिस्ट्री ज्ञानशाखेचे एक संस्थापक गणले जाऊ लागले.

प्रतिजन आणि प्रतिद्रव्य यांच्या रेणूंचे आकार एकमेकाना पूरक, एकमेकांत अडकून बसणारे असतील असा अंदाज पॉलिंग यांनी केला. जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटीमध्ये एका शोधनिबंधात त्यांनी प्रतिजने (antigens) त्यांच्या रेणू आकार विशेषानुसार बेतलेली प्रतिद्रव्ये निर्माण करण्यास (antibody) शरीरास उद्युक्त करतात असे मत मांडले. त्यांच्या शोधनिबंधाचे शीर्षक होते, ‘Theory of the structure and process of formation of antibodies’.

रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमध्ये पॉलिंग यांना आल्फ्रेड मर्स्की हे पेशीशास्त्रज्ञ भेटले. हिमोसायानीन, हिमोग्लोबीन अशा श्वसन वायूवाहक प्रथिनांचा त्यांनी अभ्यास केला. पॉलिंग यांनी स्वतंत्रपणे जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटीत एक शोधनिबंध प्रकाशित केला. तर मर्स्की यांनी एकट्याने  मूळ स्वरूपातील, साकळलेली आणि विकृत न झालेली प्रथिने यासंबंधी शोधनिबंध प्रकाशित केला. तसेच दोघांनी मिळून केलेल्या संशोधनावर आधारित शोधनिबंध प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाला. त्याचे शीर्षक होते, ‘on the denaturation of proteins.’

पॉलिंग यांना पदोन्नती मिळून त्यांची नेमणूक रसायनशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष म्हणून झाली. तसेच संचालक, ग्रेटस अँड क्रेलीन लॅबॉरेटरीज ऑफ केमिस्ट्री हे पदही त्यांना देऊ करण्यात आले. या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. मध्यंतरी एक वर्ष ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे जॉर्ज इस्टमन प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले.

त्यांनी सिकल सेल अ‍ॅनेमिया (दात्रपेशी पांडुरोग, sickle-cell anaemia) वर केलेले काम एका सभेत सादर केले. इटानो, एस.जे. सिंगर आणि इबर्ट वेल्स यांच्याबरोबर रेण्वीय पातळीवर प्रथमच एका रोगावर केलेले हे संशोधन पॉलिंग  यांनी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, वॉशिंग्टन यांच्या सभेत मांडले.

वैद्यकाचा रेण्वीय पातळीवर तोपर्यंत कोणी विचार केला नसावा. पुढील काही वर्षे त्यांनी मेंदूतील विकर नीट काम करू शकत नसल्याने काही मानसिक रोग होत असतील का यासंबंधी काम केले. छिन्नमनस्कता (schizophrenia) हा मानसिक रोग जनुकीय घटकांतील बिघाडांमुळे होत असावा. अनुवंशिक रितीने हे बदल पुढील पिढीत येत असावे असा कयास त्यांनी व्यक्त केला. प्रथिन रचनेचे तपशील: दंडाकार अल्फा-हेलिक्स, पसरट बीटा शीट्स. पॉलिंग आणि कोरी यांनी आपले प्रयोग आणि निरीक्षणे यातून पुरवले.

डीएनए रेणूची बहुवारिक, द्विसर्पिल रचना प्रस्तावित करणारे नोबेल पारितोषिक विजेते फ्रान्सिस क्रिक यांनी पॉलिंग रेण्वीय जीवशास्त्राचे जनक आहेत असे नमूद केले. त्यात सुमारे साडेआठशे शोधनिबंध असून अन्य विषय गणल्यास बाराशे निबंध आहेत.

त्यांच्या प्रकाशनांत अनेक पुस्तकांचा समावेश आहे. न्यू सायंटिस्ट या प्रख्यात जर्नलने पॉलिंगची जगातील सर्वश्रेष्ठ वीस शास्त्रज्ञांत गणना केली आहे. आतापर्यंत जगात दोन नोबेल पुरस्कार मिळवलेल्या चार व्यक्ती आहेत. रासायनिक बंधांच्या स्वरूपाबद्दल केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पॉलिंग हे १९५४चा रसायनशास्त्र आणि १९६२ चा शांततेचा असे दोन भिन्न क्षेत्रांतील नोबेल पुरस्कार मिळालेली एकमेव व्यक्ती आहेत.

मॅनहटन प्रकल्प या सांकेतिक नावाने ओळखला जाणारा कार्यक्रम खरेतर अणुबाँब निर्मितीसाठी होता. दुसऱ्या जागतिक महायुद्धात तो लाखो लोकांच्या नाशाला आणि यातनांना कारणीभूत ठरला. यामुळे लायनस पॉलिंग आणि त्यांची पत्नी एवा यांनी अण्वस्त्रनिर्मिती व वापरावर बंदी घालावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले. १९६३च्या कराराद्वारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, केनेडी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष, कृश्चेव यांनी अण्वस्त्रांच्या निर्मिती व वापरावर आंशिक बंदी स्वीकारली. १९६२चा शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा पॉलिंग यांना आपल्या पत्नीलाही तो मिळायला हवा होता असे वाटले. १९५२ साली पॉलिंग यांनी अणुकेंद्राच्या रचनेवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. १९६५ पासून १९९४ मध्ये मृत्यू होईपर्यंत त्यांनी अणुकेंद्राच्या स्फिरन (spheron) क्लस्टर मॉडेल रचनेवर विद्वान अभ्यासकांसाठी लेखमालिका प्रकाशित केली. ती प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS), आणि सायन्ससारख्या प्रतिष्ठित शास्त्रीय नियतकालिकांत छापून आली.

पॉलिंग यांच्या पहिल्या पुस्तकाचे नाव होते: द स्ट्रक्चर ऑफ लाईन स्पेक्ट्रा, ते सॅम्युअल गौडस्मिट या सहलेखकाबरोबर लिहिले होते. रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिंग यांनी जनरल केमिस्ट्री हे पाठ्यपुस्तक डब्ल्यु. एच. फ्रीमन या नव्या प्रकाशन कंपनीसाठी लिहिले.

एका व्याख्यानमालेतील एकोणीस व्याख्यानांतून त्यांनी रासायनिक बंधांविषयी आपले विचार मांडले. त्यावर आधारित द नेचर ऑफ केमिकल बॉन्ड अँड द स्ट्रक्चर ऑफ मॉलेक्युल्स अँड क्रिस्टल्स हा ग्रंथ लिहिला. तो कॉर्नेल युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केला. प्रकाशन होऊन ऐंशी वर्षे उलटली तरी अजूनही या पुस्तकाचा संदर्भ वैज्ञानिक साहित्यात मोठ्या प्रमाणात केला जातो.  हाऊ टू लिव्ह लाँगर अँड बेटर या सामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकात पॉलिंग यांनी सी-जीवनसत्व मोठ्या प्रमाणात सेवन करून आरोग्य जपावे या मताचा प्रचार केला. कॅमेरॉनबरोबर कॅन्सर अँड व्हिटामिन-सी हे याच धर्तीवर लिहिलेले पॉलिंग यांचे आणखी एक पुस्तकही वाचकप्रिय ठरले.

पॉलिंग आणि आर्थर रॉबिन्सन यांनी ऑर्थोमॉलेक्यूलर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड क्लिनिकल मेडिसिन संस्था सुरू केली. सी-जीवनसत्व मोठ्या प्रमाणात घेतल्यास सर्दी आणि कर्करोग बरे होतात का याचा अभ्यास करण्याचे ठरवले. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांच्या भिंतीवर साठलेला मेद (atherosclerosis) कमी होतो का हा आणखी एक विषय अभ्यासला.

नोबेल पुरस्कारांव्यतिरिक्त त्यांना शुद्ध रसायनविज्ञानाचे एसीएस ॲवार्ड, आयर्विंग लँगमुइर ॲवार्ड, यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यपद,  रॉयल सोसायटी ऑफ लंडनतर्फे डेव्ही पदक, मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकाच्या विद्यमाने रोब्लिंग पदक, लेनिन शांतता पदक, नॅशनल मेडल ऑफ सायन्स, लोमोनोसोव सुवर्ण पदक, केमिकल सायन्सेसचे एनएएस ॲवार्ड, प्रिस्टली पदक आणि वानेवार बुश पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांचा प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाने बिग सुर, कॅलिफोर्निया येथे मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा