टुरिंग, ॲलन : (२३ जून १९१२ ७ जून १९५४) लंडनमध्ये ॲलन टुरिंग यांचा जन्म झाला. लंडनमधील एका खाजगी शाळेत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर केंब्रिज विद्यापीठातील किंग्ज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी संभाव्यता (Probability) या गणितीय क्षेत्रात संशोधन करून एक लेख लिहिला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन किंग्ज कॉलेजने त्यांना आपला फेलो केले. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात गेले. तेथे प्राध्यापक ॲलोंझो चर्च यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. मिळविली. त्यांनी प्राध्यापक चर्च यांच्यासोबत केलेले संशोधन देखील चांगलेच गाजले. नंतर ते अमेरिकेतून केंब्रिजला परत आले आणि किंग्ज कॉलेजमध्ये संशोधन करू लागले.

दुसरे महायुद्ध सुरू झाले. लवकरच त्या युद्धाने आक्राळविक्राळ रूप धारण केले. हिटलरने यूरोपातील अनेक देश आपल्या ताब्यात घेतले होते. जर्मन सैन्य लंडनवर बाँब वर्षाव करीत होते. त्यावर आळा घालणे आवश्यक होते. हिटलरच्या युद्ध नीतीला जशास तसे उत्तर देण्याची योजना ब्लेचली पार्क येथील गुप्त कार्यालयात आखली जात होती. या कामात मदत करण्यासाठी १९३९ मध्ये टुरिंग यांना ब्लेचली पार्कला पाचारण करण्यात आले. १९३९ पासून युद्ध संपेपर्यंत टुरिंग हे ब्लेचली पार्कच्या युद्धकालीन गुप्त कार्यालयात काम करीत होते. हिटलरच्या आदेशाचा अर्थ लावण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. हिटलर एका ठिकाणी राहून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या  सेनाधिकाऱ्यांना त्यांनाच समजेल अशा सांकेतिक भाषेत आज्ञा आदेश देत असत. हे आदेश रेडिओ लहरींच्या मदतीने त्यांच्यापर्यंत पोहोचविले जात असत. ब्लेचली येथील कार्यालयाने रेडिओ संदेशाची नोंद ठेवण्यासाठी माणसे नेमली होती. ते सगळे जण आपापल्या नोंदी कार्यालयात आणून देत असत. त्यांचे विश्लेषण करून त्यातून अर्थ काढण्याचे महत्त्वाचे काम टुरिंग यांनी केले. त्यासाठी त्यांनी एक यंत्र बनविले. त्या यंत्राला बॉम्बे (Bombe) असे संबोधले जात असे. त्या यंत्राची एक प्रतिकृती ब्लेचली पार्कमध्ये आजही ठेवली आहे.

युद्ध समाप्त झाल्यावर टुरिंग लंडनच्या राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत रूजू झाले. तेथे जवळजवळ तीन वर्षे त्यांनी संगणक विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्या कामात त्यांना थोडेफार यश देखील मिळाले. परंतु त्यांच्या कामाने आकार घेतला तो मॅंचेस्टरमध्ये. ते मॅंचेस्टर येथील संगणक यंत्र प्रयोगशाळेत (Computing Machine Laboratory) उपसंचालक म्हणून रूजू झाले. तेथे त्यांनी संगणकासाठी इनपुट आऊटपुट प्रणाली विकसित केली. त्याचबरोबर नव्या संगणकासाठी त्यांनी कार्यक्रम (Programing) विकसित केले. त्यांच्या या प्रयत्नातून फेरांटी मार्क I (Ferranti Mark I) हा संगणक तयार झाला. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी लंडनच्या रॉयल सोसायटीने त्याच वर्षी त्यांना सभासदत्व बहाल केले. त्यानंतर टुरिंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या क्षेत्रातही मोलाचे कार्य केले.

ते त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. केंब्रिज विद्यापीठातील ज्या किंग्ज कॉलेजमध्ये ते शिकले त्या कॉलेजच्या एका विभागाला ॲलन टुरिंग रूम्स (Alan Turing Rooms) असे नाव दिले आहे.

संदर्भ :

  • Encyclopaedia Britannica

समीक्षक : सुधीर पानसे