हेन्डरसन, डोनाल्ड एन्स्लि : (७ सप्टेंबर १९२८ – १९ ऑगस्ट २०१६) डोनाल्ड एन्स्लि हेन्डरसन यांचा जन्म अमेरिकेत ओहायो इथे झाला. ओबेर्लीन महाविद्यालयातून त्यांनी कलाशाखेची पदवी मिळवली, रॉचेस्टर विद्यापीठातून वैद्यकीय शास्त्रात पदवी घेऊन ते बाहेर पडले. मारी इमोजीन बसेट या न्यूयॉर्कमधील कूपर्सटाउन येथील रुग्णालयात उमेदवार  व निवासी डॉक्टर म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. याच काळात १८३२ मधील अपस्माराची साथ या विषयावर त्यांनी जो वैज्ञानिक लेख लिहिला त्याला तेव्हा बक्षीसही मिळाले होते.

ॲटलांटा येथील रोग नियंत्रण केंद्रात त्यांची नियुक्ती झाली. या रोग नियंत्रण केंद्रात काम करणारे प्रख्यात रोगपरिस्थिती वैज्ञानिक अलेक्झांडर लंग्मुर हे त्यांचे गुरू. हेन्डरसन विषाणू रोगावर लक्ष ठेवणार्‍या विभागात काम करत होते. दूरवर फैलावणार्‍या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. तेव्हा आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर हेन्डरसन यांनी देवी व गोवर या विषाणूंनी होणार्‍या रोगांना आफ्रिका खंडातून संपूर्ण हद्दपार करण्यासाठी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास मदत योजनेकडे एक प्रस्ताव मांडला. पाच वर्षात हे घडवून आणण्याचा आशावाद त्यात प्रकट करण्यात आला होता. रोग नियंत्रण केंद्राने हा प्रस्ताव मंजूर केला व या कार्यक्रमासाठी संचालक म्हणून हेन्डरसन यांचे नाव घोषित केले. हे कळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने देवीचे जगाच्या पाठीवरून समूळ उच्चाटन करण्यासाठी रोग नियंत्रण केंद्राशी सहकार्य करण्याचे ठरवले. या कामासाठी दहा वर्षांचा कालावधी निश्चित केला आणि या योजनेची जबाबदारी संचालक या नात्याने हेन्डरसन यांच्यावर सोपवली. यावेळी हेन्डरसन इतक्या मोठ्या पदासाठी तसे तरुण व अननुभवी होते. या आधी एकदा असाच देवी निर्मुलनाचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेने केला होता व त्यात निधीची कमतरता व सक्षम नेतृत्वाचा अभाव यामुळे ते सपशेल अपयशी झाले होते, म्हणून आताही आपल्याला या कामात अपयश येईल या भितीने त्यांनी अननुभवी डॉक्टर हेन्डरसन यांची या जागेवर नेमणूक केली. अवघ्या अडतीस वर्षांचे हेन्डरसन तेव्हा वैज्ञानिकांच्या मांदियाळीत फारसे कोणाला परिचित नव्हते, त्यामुळे समजा अपयश आले तरी त्यांच्या नावाला बट्टा लागणार नाही या अंदाजाने इतक्या महत्त्वाच्या पदावर हेन्डरसन यांची नियुक्ती झाली.

देवी ह्या रोगाला विसाव्या शतकात लोक प्रचंड घाबरायचे. वेरीओला या विषाणूमुळे मुख्यतः आफ्रिका व आशिया या खंडात हा साथीचा रोग उद्भवायचा व तिथून थोड्याच वेळात इतर देशात पसरायचा. दरवर्षी जगभरात साधारण दहा ते पंधरा लाख लोकांना देवीची लागण व्हायची व त्यातले साधारण ३०% लोक म्हणजे तीन लाख लोक या साथीत आपले प्राण गमावत असत. १९६० साली या रोगामुळे पाच लाख लोक दगावले होते. समजा बरे झाले तरी देवीमुळे बहिरे किंवा आंधळे होण्याची शक्यता असायची शिवाय अंगभर त्वचेवर उठलेल्या फोडांनी व व्रणांनी रोगी कुरूप दिसायचा ते वेगळेच.

न्यूयॉर्क टाईम्समध्ये शेरिल स्टोलबर्ग म्हणतात की जागतिक आरोग्य संघटनेने देवी निर्मूलनासाठी जगभरात नेमलेल्या १,५०,००० कामगारांच्या अथक प्रयत्नांमुळे ही योजना यशस्वी झाली. हे कामगार देवीचे रोगी हुडकून काढण्यासाठी पिण्याचे पाणी वा वीज उपलब्ध नाही अशा अतिशय दुर्गम भागातही पोहोचत असत. दुनियेतल्या सर्व लोकांचे लसीकरण करण्यात काही हशील नसल्याचे हेन्डरसन यांना या योजनेच्या सुरुवातीलाच जाणवले व त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकार्‍याने पितज्वराच्या विषाणूच्या नायनाटासाठी वापरलेली समकेंद्री (रिंग रूट) लसीकरणाची पद्धत उपयोगात आणण्याचे ठरवले. या पद्धतीमध्ये कोणत्याही रोगाचे रुग्ण शोधून काढून रोग्यांना व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना आणि या सर्वांच्या रोजच्या संपर्कातील माणसांना त्या रोगावरची लस टोचण्यात येते व रोगप्रसार होऊ नये यासाठी त्यांना समाजापासून काहीकाळ अलग ठेवण्यात येते. समकेंद्री लसीकरणामुळे १९६६ ते १९७७ या साधारण अकरा वर्षात जागतिक आरोग्य संघटनेला देवीसारखा रोग समूळ नष्ट करता आला.

परंतु या यशात कामगारांच्या जोडीने योजनेचे संचालक या नात्याने हेन्डरसन यांचा सिंहाचा वाटा होता. इथिओपियाच्या आरोग्यमंत्र्याने सहकार्याला नकार दिल्यावर हेन्डरसन स्वतः इथिओपियाला गेले, त्या देशाच्या राजाच्या (हेले सेलासी) वैयक्तिक डॉक्टरची त्यांनी ओळख करून घेतली व त्यांच्याद्वारे आपली मागणी मंजूर करविली. सोविएट युनियनची देवीवरची लस कनिष्ठ दर्जाची आहे हे लक्षात आल्यावर आपल्या वरिष्ठांच्या सल्ल्याची पर्वा न करता किंवा अमेरिका व रशियामधल्या तणावाचा विचार न करता हेन्डरसन मास्कोला गेले व त्यांनी अधिक चांगल्या दर्जाच्या लशीची मागणी केली. या त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळेच अकरा वर्षात ही योजना सफल झाली. १९७७ साली सोमालियात सापडलेला देवीचा रुग्ण जगातील शेवटचा रुग्ण ठरला. त्यानंतर तीन वर्षांनी जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना देवीची लस टोचण्याची गरज नसल्याचे जाहीर केले.

जागतिक आरोग्य संघटनेचे काम संपुष्टात आल्यावर हेन्डरसन जॉन हॉपकिन्स सार्वजनिक आरोग्य विद्यालयाचे अध्यक्ष होते. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून हेन्डरसन यांनी दोन वर्षे काम पाहिले. नंतरची दोन वर्षे आरोग्य आणि मानवी सेवा विभागाचे उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्याला पुरेसा वाव नाही म्हणून ते पद सोडून ते प्रोफेसर म्हणून पुन्हा जॉन हॉपकिन्स सार्वजनिक आरोग्य विद्यालयात दाखल झाले. याच विद्यालयात जैविक दहशतवादाच्या प्रतिकाराची धोरणे ठरवण्यासाठी त्यांनी एका विभागाची स्थापना केली, या विभागाचे ते पहिले संचालक होते.

सन १९८० साली देवीचे निर्मूलन झाले असल्याने यानंतर अमेरिका व रशियाने राखून ठेवलेले देवीच्या विषाणूंचे अधिकृत स्त्रोत नष्ट करावेत की पुढील अभ्यासासाठी सांभाळून ठेवावेत यावर जेव्हा वैज्ञानिकांत चर्चा झाली तेव्हा हे विषाणू पुन्हा मोकळे सुटून त्यांनी हैदोस घालू नये यासाठी त्यांना नष्ट करण्याची मागणी हेन्डरसन यांनी केली तर बाकी काही वैज्ञानिक या विषाणूचा वापर जर जैविक अस्त्र म्हणून केला गेलाच तर पुन्हा लस बनवण्यासाठी हे विषाणु कामी येतील या मताचे होते. परंतु अमेरिकन वैद्यकीय संघटनेच्या संशोधन पत्रिकेत हेन्डरसन आणि इतर चौदा वैज्ञानिकांनी लिहिलेल्या लेखात, समाज आता अधिक हलता फिरता असल्याने देवीचे विषाणू जर आता मोकळे झाले तर जास्त विध्वंस होण्याची शक्यता वर्तवली.

हेल्थ इनसायडरला दिलेल्या मुलाखतीमध्ये हेन्डरसन यांनी जगावर जैविक दहशतवादाचे संकट कायम असल्याने अमेरिकेने दक्ष व सुसज्ज राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. जैविक युद्ध होण्याची शक्यता कमी आहे पण ती शून्य निश्चितच नाही असेही ते म्हणाले. यानंतर सप्टेंबर २००१ ला, ११/९ च्या हल्ल्यानंतर एक आठवड्याने अमेरिकेत पोस्टातून अँथ्रॅक्‍स या रोगाचे बीज सिनेटर्सच्या कार्यालयात पाठवण्यात आले व या रोगाची लागण होऊन पाकिटे हाताळणारे दोघे जण मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर नोव्हेंबर२००१ मध्ये अमेरिकेच्या आरोग्य व मानवी सेवा मंत्रालयाने नवीन स्थापन केलेल्या सार्वजनिक आरोग्य सुसज्जता विभागाचे प्रमुख म्हणून हेन्डरसन यांची नियुक्ती झाली. मृत्युसमयी ते आरोग्य सुरक्षितता विषयावरच्या शैक्षणिक संशोधन पत्रिकेचे आजन्म संपादक होते.

देवी निर्मूलनाचे श्रेय लाखो लोकांच्या एकत्रित केलेल्या कामाला असल्याने त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले नाही, पण चीन, जपान, ब्रिटन, थायलंड व इतर अनेक देशांनी त्यांना वेगवेगळे चौदा पुरस्कार दिले होते, त्यापैकी अमेरिकेकडून मिळालेले अध्यक्षीय स्वातंत्र्य पदक प्रख्यात आहे.

देवी आणि देवीचे निर्मूलन आणि देवी या रोगाचा मृत्यु ही सहलेखकांबरोबर लिहिलेली त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.

वार्धक्याने खाली पडून त्यांचे देहावसान झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे