हॉन, थॉमस : (१६ मे १९३८) थॉमस हॉन मुळातले ऑस्ट्रीयन असून सध्या स्वित्झर्लंडमध्ये बाझल विद्यापीठात सेवानिवृत्तीनंतरही प्राध्यापकाचे पद भूषवित आहेत. त्यांचा जन्म जर्मनीमध्ये दुइस्बर्ग येथे झाला. जर्मनीत टूबिंगेन येथे मॅक्स प्लांक संस्थेमध्ये त्यांनी विषाणूशास्त्राचा अभ्यास केला. त्यांना त्या विषयात पदविका मिळाल्यानंतरही ते त्याच संस्थेमध्ये सूक्ष्म विषाणूंची संरचना कशी होते, त्यांचे वेगवेगळे भाग एकत्र येऊन विषाणू कसा बनतो याचा त्यांनी बॅक्टेरिओफाज हे मॉडेल वापरून अभ्यास केला. हे विषाणू परोपजीवी असतात त्यामुळे यजमानपेशी असल्या तर त्यांच्या पेशीतच विषाणूंची वाढ घडून येते, त्यांची भरभराट होते. बॅक्टेरिया जीवाणूमध्ये वाढणार्‍या, अनेकदा त्यांच्या विनाशास कारण होणार्‍या या विषाणूंना बॅक्टेरिओफाज म्हणतात. आपल्या संशोधनासाठी थॉमस हॉन यांनी एफडी या नावाचा छोटा फाज व इश्चरेशिया कोली ह्या जीवाणूंचा यजमानपेशी म्हणून वापर केला. एफडी फाज जीवाणूच्या शरीरात घुसल्यानंतर कोणकोणत्या अवस्थांतून जातो, त्याचे कोणते भाग कधी व कसे बनतात, ते एकत्र येऊन यजमानपेशीत अनेक एफडी विषा leena णू (म्हणजे बॅक्टेरिओफाज) कसे तयार होतात याचा थॉमस  यांनी अभ्यास केला. विषाणूशास्त्रातल्या त्यांच्या या संशोधनामुळे थॉमस यांना पीएच्.डी. प्रदान करण्यात आली. थॉमस हॉन यांचे पोस्ट डॉक्टरल संशोधन पण याच विषयावर केंद्रित आहे. अमेरिकेत स्टानफोर्ड विद्यापीठात त्यांनी पोस्ट डॉक्टरल संशोधन केले. हे संशोधन पूर्ण केल्यानंतर ते स्वित्झर्लंडमध्ये परतले व बाझल विद्यापीठातल्या जैविक केंद्राचे ते कनिष्ठ गटनेता बनले. इथेही त्यांनी आपल्या पत्नी डॉक्टर बार्बरा हॉन यांच्यासमवेत आपल्या आवडत्या विषयावरचे म्हणजे विषाणूशास्त्रामधले संशोधन चालू केले. फक्त विषाणूंचे मॉडेल म्हणून एफडी बॅक्टेरिओफाज हा छोटा विषाणू न वापरता त्यांनी आपले लक्ष लाम्डा (lambda) या छोट्या विषाणूवर केंद्रित केले.

ह्या लाम्डा विषाणूचे यजमानपेशीच्या शरीरात स्थित्यंतर कसे घडून येते, एका विषाणूपासून अनेक विषाणू कसे तयार होतात याचा त्यांनी पद्धतशीर अभ्यास केला. हे संशोधन परीक्षानलिकेमध्ये विषाणूंच्या भागांचे एकत्रीकरण कसे करावे किंवा विषाणूंची गुणसूत्रे त्यांच्या कॅप्सिडमध्ये (कॅप्सिड म्हणजे लाम्डा फाजच्या डोक्याचे बाहेरील आवरण) कृत्रिमरित्या कशी भरता येतील याचे मूलभूत संशोधन मानले जाते. साधारण याच काळात जनुकांमध्ये फेरबदल घडवण्यासाठी पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञान अस्तिवात येत होते. अशा तंत्रज्ञानात तोवर डीएनएचा वाहक (carrier) म्हणून प्लास्मिड वापरले जायचे पण त्यात जोडता येईल असा डीएनएचा तुकडा आकाराने फारच लहान असे. पेशीचा एखादा तरी गुणधर्म बदलवण्यासाठी या डीएनएच्या तुकड्याचा आकार थोडा वाढवणे गरजेचे होते. प्लास्मिडच्याऐवजी लाम्डा फाज जर वाहक म्हणून वापरला तर हा आकार दुपटीने वाढू शकत होता किंवा या लाम्डा फाजच्या गुणसूत्रावरचा कॉस नावाचा छोटासा अंश जर फेरफार केलेल्या प्लास्मिडला जोडला तर जनुकाचा आकार वाढवून पुनः ते कॉस्मिड (कॉस+प्लास्मिड=कॉस्मिड) कृत्रिमपणे फाजच्या आवरणातून आत घुसवणे शक्य होणार होते. असा वाहक फाज नैसर्गिकरित्या यजमानपेशीमध्ये संक्रमित होतो व कॉस्मिडच्या रेणूंची संख्या अनेक पटींनी वाढवतो म्हणून पुनःसंयोजित (रीकॉम्बिनंट) डीएनए तंत्रज्ञानात लाम्डा फाजच्या एकत्रीकरणावरच्या थॉमस व बार्बरा हॉनच्या संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे.

ह्या क्रांतीकारी संशोधनामुळे बाझलमधल्या जैविक केंद्रातून थॉमस हॉन यांना बाझलमधल्याच फ्रेडरिक मिशर संस्थेमध्ये गटनेता म्हणून स्थान मिळाले. त्यांच्याबरोबरच बार्बराही नवीन संस्थेत दाखल झाल्या. या बदलाचा एक परिणाम असा झाला की जीवाणूंच्याऐवजी अधिक गुंतागुंतीच्या व खूप गुणसूत्रे असलेल्या युकॅरीऑटिक पेशींवर त्यांना संशोधन करता आले. त्यासाठी त्यांनी वनस्पतींच्या पेशींची निवड केली आणि फ्रेडरिक मिशर संस्थेमधल्या इतर वनस्पती अनुवंशशास्त्र  तज्ञांबरोबर ते दोघे वनस्पतींच्या पेशी परिवर्तनावर काम करू लागले. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी वाहक म्हणून त्यांनी वनस्पतींच्या सामान्य पेशीचे ट्युमरमध्ये रुपांतर करणार्‍या आणि सामान्यपणे एका जीवाणूमध्ये (Agrobacterium tumefaciens) वस्ती करणार्‍या प्लास्मिडची (Ti plasmid) निवड केली. सुदैवाने त्यांनी विकसित केलेली ही एकच पद्धत एकदल व द्विदल अशा दोन्ही प्रकारच्या धान्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणू शकली. या कामावरील हॉन दम्पतीचा संशोधन लेख नेचर या प्रख्यात संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

वनस्पतींच्या विषाणूवरचे त्यांचे कामही तेवढेच प्रसिद्ध आहे. वनस्पतीमधला पहिला रेट्रो विषाणू, कॅलीफ्लॉवर मोझेक विषाणू त्यांनी शोधला तसेच हे विषाणू प्रथिन निर्मिती कशी करतात यावरही त्यांनी संशोधन केले. लाम्डा विषाणूप्रमाणे हा कॅलीफ्लॉवर मोझेक विषाणू जैवतंत्रज्ञानाच्या पद्धतींनुसार वनस्पतींच्या पेशींमध्ये बदल घडवण्यासाठी वाहक म्हणून वापरला जातो.

सध्या ते बाझल विद्यापीठात रेण्वीय-जीवशास्त्राचे व्याख्याते आहेत. आजवर त्यांचे साधारण दोनशे संशोधनपर लेख सेल, जर्नल ऑफ व्हायरॉलॉजी, नेचर, न्यूक्लीईक सिड रिसर्च यासारख्या प्रख्यात संशोधनपत्रिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यूरोपियन रेण्वीय-जीवशास्त्र संघटनेचे (EMBO) ते सभासद आहेत.

गेली अनेक वर्षे जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते भारतीय संशोधकांशी सहकार्य करीत आहेत. आरएनए आय (RNAi) या लहान आकाराच्या रायबोन्युक्लीईक आम्लाच्या मदतीने प्रथिन संश्लेषणाचे नियमन कसे करता येईल या प्रकल्पावर ते भारतीय शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करीत आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामधील अन्नधान्याची गुणवत्ता सुधारेल तसेच एकंदर उत्पादनात वाढ होईल अशी आशा आहे.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे