गिऱ्हे, जनाबाई कचरू : (१ जून १९५२).महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त गोपाळ समाजातील पहिल्या स्त्री आत्मचरित्रकार आणि शिक्षिका. त्यांचा  जन्म गुजराबाई माळी व बापुराव माळी या दाम्पत्यापोटी सांगवी येथे झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जैन महावीद्यालय पाथर्डी, अहमदनगर येथे झाले (१९७७). डी. एड. महाराष्ट्र महाविद्यालय अहमदनगर येथे झाले (१९८०-८१). डॉ. बा. आ. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी पदवी मिळविली (१९८४). १९८१ ला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रदीर्घ शिक्षण सेवेनंतर गिरणीरा तांडा, केंद्र पंढरपुर ता.जि औरंगाबाद येथे त्यांची मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाली (२००४) व येथूनच त्या निवृत्त झाल्या (२०११-१२).

जनाबाई गिऱ्हे यांचे मरणकळा (आत्मचरित्र,१९९२),पहाट गाणी (काव्यसंग्रह,२०१४), उघड्यावरच जगणं (कथासंग्रह,२०१४) हे मराठी साहित्यात जीवनानुभवाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण असलेले साहित्य प्रकाशित आहे. मरणकळा हे भटक्या समाजातील स्त्रीचे पहिले आत्मचरित्र होय. शिक्षणासाठी संघर्ष हे मरणकळा या आत्मकथनाचे मध्यवर्ती सूत्र आहे. गावोगावी फिरणाऱ्या, जीवनामध्ये स्थिरता नसणाऱ्या समाजातील अज्ञान, रूढी व परंपरा या सर्वांना प्रथम छेद देणारा जीवनानुभव या आत्मचरित्रात शब्दबद्ध झाला आहे. स्वतःच्या वडिलांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळे हा प्रवास त्यांना करता आला. उपाशीपोटी राहून प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत स्त्रीशिक्षण विरोधी सामाजिक परंपरांना न घाबरता, त्यासाठी स्व समाज बांधवांनी टाकलेला बहिष्कार आणि केलेला मानसिक छळ या सर्व स्तरातील विरोधाला तोंड देत जनाबाई गिऱ्हे यांचा शैक्षणिक प्रवास घडला आहे. हा प्रवास विविध अंगाने  महत्त्वाचा आहे, उत्कंठावर्धक आणि प्रेरणादायी आहे. एकामागून एक संकटे कोसळत असताना एक स्त्री स्वतःशी, समाजाशी कशी झुंज देते, या झुंजीचे, संघर्षाचे चित्रण म्हणजे मरणकळा हे आत्मकथन आहे.

त्यांचा पहाटगाणी हा ओव्यांचा संग्रह आहे. यामध्ये मोल, भरतार, मागणं, माहेर, साय, कुटन, उपकार, भावंडं, लगीन, जामीन, वनवास, चुडा, सून, लक्ष्मी, मुलगा व दळण इत्यादी विषयांवर ओव्या आहे. जात्यावरच्या ओव्यांना सांस्कृतिक संदर्भ असतो. या ओव्या स्त्रीशी, तिच्या अनुभवांशी, तिच्या दुःखाशी संबंधित असायच्या. पहाटगाणीमधील ओव्यांमधून सामाजिक चालीरीती व स्त्रियांचे अनुभवविश्व याचा अंदाज येतो. श्रीमंताचा नवरदेव व गरीबाचा नवरदेव यामध्ये खूप फरक असतो, या सामाजिक बाबी त्यांनी या ओव्यांतून मांडल्या आहेत. उघड्यावरचं जगणं या कथासंग्रहामध्ये भटक्या जाती-जमातीच्या माणसांच्या वाट्याला आलेले विदारक अनुभव लेखिकेने कथेच्या स्वरूपामध्ये लिहिले आहे. पालावरचं जग, पारधी, जन्माआधी मरण, चोर, दोषी कोण?, वैदू, बागायतदार आणि भटका, हुंडा, आई, कंजार भाट, स्वाभिमान दिवस, म्हसनजोगी, स्त्री ही भटक्यांची इत्यादी कथांचा समावेश आहे. भटक्या विमुक्त समाजावर अन्याय अत्याचार होतात, त्याचे चित्रण या कथासंग्रहात जनाबाई गिऱ्हे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात मरणकळा या आत्मचरित्राचा समावेश करण्यात आला आहे. जनाबाई गिऱ्हे यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मुकादम साहित्य पुरस्कार, रमाई पुरस्कार (औरंगाबाद, २००९), अखिल भारतीय गोपाळ समाज क्रांतिकारी विकास परिषद स्मृतिचिन्ह (वाशिम, २००१), आदिवासी भटके-विमुक्त गौरव पुरस्कार (२००४), वृत्तरत्न सम्राट गौरव पुरस्कार (२०१४) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.

संदर्भ :

  • गिऱ्हे, जनाबाई, मरणकळा, औरंगाबाद, २०१४.