नव-अभिजात अर्थशास्त्र हा मूळ अर्थशास्त्राचे एक वेगळ्या प्रकारे विवेचन करणारा दृष्टीकोन आहे. बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याच्या तत्त्वानुसार उत्पादन आणि उत्पन्नाच्या विभाजनाविषयीचे विवेचन नव-अभिजात अर्थशास्त्रात प्रामुख्याने केल्याचे दिसून येते. म्हणजेच मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वान्वये बाजारपेठेतील उत्पादन व उत्पन्न पातळीच्या निश्चितीविषयीचे मार्गदर्शन नव-अभिजात अर्थशास्त्राद्वारे केले जाते. उत्पादन व उत्पन्न निश्चितीकामी मर्यादित उत्पन्नधारकांच्या परिकल्पित उपयोगिता आणि विवेक पसंती सिद्धांतानुसार प्राप्त उत्पादन घटकांचा विनियोग करून केलेल्या उत्पादन खर्चाच्या आधारे नफा महत्तमीकरणाचे तत्त्व अंगिकारले जाते. नव-अभिजात अर्थशास्त्र सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विवेचनाची एक प्रकारे प्रभावी विचारशाखा मानली जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला केन्सवादी अर्थशास्त्राची जोड देऊन नव-अभिजात अर्थशास्त्राचा विकसित दृष्टीकोन वर्तमानकालीन मूलप्रवाही अर्थशास्त्रीय विचारावर आपला प्रभाव प्रस्थापित करताना दिसून येतो. पर्यायाने नव-अभिजात अर्थशास्त्राने वर्तमान मूलप्रवाही अर्थशास्त्रीय विचारवंतांमध्ये आपली स्वीकारार्हता निर्माण केल्याचे जाणवते; तथापि यामुळे नव-अभिजात अर्थशास्त्रीय विचारधारा टिकारहित आहे असे मात्र नाही.

नव-अभिजात अर्थशास्त्र हा शब्दप्रयोग सर्वप्रथम प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ थोरस्टेइन वेब्लेन यांनी इ. स. १९०० मध्ये आपल्या ‘अर्थशास्त्राची पूर्वकल्पना’ या प्रकाशित लेखात केला. आधुनिक अभिजात, ऐतिहासिक दृष्टीकोन आणि मार्क्सवाद व वेब्लेनप्रणीत नव-अभिजात अर्थशास्त्रीय दृष्टीकोनात मूलभूत तफावत आहे. वेब्लेन यांच्यानंतर सर जॉन रिचर्ड हिक्स, जॉर्ज जोसेफ स्टिग्लर, कार्ल मेंगर, विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ, लिऑन वॉलरस, जॉन बेट्स क्लार्क इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी नव-अभिजात अर्थशास्त्रीय विचारधारेला एक प्रकारे वृद्धींगत केल्याचे मानले जाते. वर्तमानकाळात मूलप्रवाही अर्थशास्त्राच्या संदर्भात नव-अभिजात अर्थशास्त्राचा प्रकर्षाने वापर होताना दिसून येतो. अर्थशास्त्रातील इतर अनेक विचारप्रवाहांचा विचार करताना नव-अभिजात अर्थशास्त्राचा उल्लेख एक मूलभूत विश्लेषण शाखा म्हणून केला जातो; कारण नव-अभिजात अर्थशास्त्राचा पाया असणारी अनेक गृहितके अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या इतर अनेक विचारधारांद्वारा वापरली जातात; परंतु यास संरचनात्मक अर्थशास्त्र, अर्थशास्त्राचा ऐतिहासिक दृष्टीकोन आणि मार्क्सवादी विचारधारेचा अपवाद हे असल्याचे मान्य करावे लागते.

नव-अभिजात अर्थशास्त्राच्या काही शाखा वेगळ्या दृष्टीकोनांवर आधारित असल्या, तरी रॉय वेइनस्ट्रॉब यांच्या मते, नव-अभिजात अर्थशास्त्र प्रामुख्याने तीन गृहितकांवर आधारित आहे. (१) मूल्यसंलग्न फलनिष्पत्तीसंदर्भात लोकांचे पसंतीक्रम तार्किक असतात. (२) व्यक्तींना उपयोगिता, तर संयत्रांना नफा महत्तमीकरणात रस असतो. (३) पूर्ण व तुलनात्मक माहितीच्या आधारे लोकवर्तणूक स्वतंत्र असते. या तीन गृहितकांवर निर्भर राहून नव-अभिजात अर्थतज्ज्ञांनी पर्यायी वापरांकरिता मर्यादित संसाधनांच्या विभाजन सूत्राचा ढाचा तयार केला आहे. वास्तविक पाहता संसाधनांच्या प्रस्तुत विभाजन प्रणालीच्या आकलनास नव-अभिजात सिद्धांतकारांनी नव-अभिजात अर्थशास्त्राची व्याख्या संबोधले आहे. जेव्हा जोन व्हायोलेट रॉबिन्सन आणि एडवर्ड हेस्टींग्ज चेंबरलीन यांनी साधारणपणे एकाच वेळी म्हणजे इ. स. १९३३ मध्ये अपूर्ण स्पर्धेचे अर्थशास्त्र आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा सिद्धांत हे स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित केले, तेव्हा नव-अभिजात अर्थशास्त्राच्या विश्लेषण पद्धतीत व एकंदरीतच विवेचनात आमूलाग्र बदल घडून आला. या दोन ग्रंथांच्या माध्यमातून बाजारपेठ व औद्योगिक संघटन सिद्धांताचा उदय झाला. याच विवेचनातून सिमांत प्राप्ती वक्रासारख्या विश्लेषण साधनांचाही जन्म झाला. पियेरो स्राफा या केन्सवादी अर्थतज्ज्ञांनी अधोरेखित केलेल्या मार्शल यांच्या अंशतः समतोल सिद्धांताला रॉबिन्सन यांच्या अपूर्ण स्पर्धा सिद्धांताद्वारे एकप्रकारे प्रतिसादच मिळाला होता. पियेरो यांनी नंतर वॉलरस आणि विल्फ्रेड पॅरेटो यांच्या सामान्य समतोल सिद्धांतावरही इ. स. १९३९ मध्ये टिप्पणी केल्याचे सर्वश्रुत आहे. या सर्व विचारमंथनातून नंतर अर्थशास्त्र विश्लेषणात समवृत्ती वक्र आणि क्रमवाचक उपयोगिता सिद्धांताचा उदय झाला. पर्यायाने नव-अभिजात अर्थशास्त्रातील गणिती प्रमेये व त्यांच्या वापराची पातळी अधिकच वृद्धींगत झाली. नंतर इ. स. १९४७ मध्ये पॉल सॅम्युएल्सन यांच्या अर्थशास्त्र विवेचनाचा पाय फाउंडेशन ऑफ इकॉनॉमिक ॲनॅलिसिस या ग्रंथाने गणिती प्रमेयाधारित अर्थशास्त्र विश्लेषणात अधिकच भर घातली. इ. स. १९४० च्या दशकात अमेरिकन अर्थशास्त्रीय विचारप्रणाली विविधताधारित होती, असे मानले जाते. त्या वेळी नव-अभिजात अर्थशास्त्र आणि संस्थात्मकवाद श्रेष्ठत्वाकरिता एकमेकांशी स्पर्धा करित होते. फ्रँक हाइनमन नाइट या शिकागो अर्थशास्त्र विचारप्रणालीकाराने या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणण्याचे अथक प्रयत्न केले; परंतु दुसर्‍या महायुद्धोपरांत नव-अभिजात अर्थशास्त्रीय विवेचनातील गणिती प्रमेयांच्या प्रभावी वापरामुळे हे काहीसे असाध्य झाले. त्यानंतर लिंडेन, फ्रिड्रिक ऑगस्ट फोन हायेक तसेच हिक्स यांच्या व्हॅल्यू अँड कॅपिटल (मूल्य आणि भांडवल) या ग्रंथाने नव-अभिजात अर्थशास्त्रीय विचारांना अधिक बळकटी दिली. त्यानंतर ॲरो-डेब्य्रू यांच्या कालबद्ध समतोल सिद्धांतास नव-अभिजात अर्थशास्त्रीय विचारप्रवाहाचा अंतिम टप्पा मानले गेले. गॅरल्ड डेब्य्रू यांच्या मूल्य सिद्धांतात १९५९ च्या ॲरो-डेब्र्यू सिद्धांताचा अधिकृत समावेश असल्याचे स्पष्टपणे जाणवते. तसेच ॲरो आणि लार्स पिटर हॅन्सेन यांचे १९७१ च्या सामान्य स्पर्धा विवेचनही या सिद्धांतावर बेतले आहे. नव-अभिजात अर्थशास्त्रीय विवेचनात होणार्‍या या सर्व प्रकारच्या योगदानाबरोबरच अर्थमिती (इकॉनॉमेट्रीक्स) विश्लेषण पद्धतीतही आमूलाग्र सुधारणा होत होत्याच. त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमतीतील बदल व समग्रतेच्या आकलनाबरोबरच समग्रलक्षी अर्थशास्त्राचे अध्ययन शक्यप्राय होत होते. १९५० पासून यूरोपियन राष्ट्रांत नव-अभिजात समन्वय तयार होण्याची प्रक्रिया कार्यरत झाली होती. या सर्व प्रयत्नांमधून केन्सवादी अर्थशास्त्र मूलप्रवाही होण्यास मदत झाली. त्या कामी हिक्स व सॅम्युएल्सन या द्वयीचे योगदान एकमेवाद्वितीय ठरले.

समग्रलक्षी अर्थशास्त्राने नव-अभिजात अर्थशास्त्रीय विचारधारेवर प्रभाव प्रस्थापित करताना जे. बी. से यांचा सिद्धांत आणि मूलभूत राजकीय अर्थव्यवस्थेच्या गृहितकांवरच आघात केल्याचे दिसून येते. पॅरेटो आशावाद आणि स्वयंशाश्वत बाजारपेठ समतोलाच्या दृष्टीकोनातून नव-अभिजात सिद्धांताचा विचार केला, तर उपरोल्लेखित सर्व घटनाक्रमाचे आकलन होण्यास मदत होते.

नव-अभिजात अर्थशास्त्रावर अनेकदा दुराग्रहाविषयक टिका केली जाते. असा युक्तिवाद केला जातो की, नव-अभिजात अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेवर वास्तव विवेचन न करता सैद्धांतिक विश्लेषणावरच अधिक निर्भर असल्याने त्यावर आपोआपच पॅरेटो आशावादाचा प्रभाव असल्याचे जाणवते. तसेच विवेकी वर्तनाचे गृहितक व्यक्ती व समाज यांच्या वास्तव वर्तणुकीकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे मानले जाते. नव-अभिजात अर्थशास्त्रातील ‘आर्थिक मनुष्य’ वास्तवातील मनुष्यापेक्षा अनके पटींनी भिन्न असतो. वर्तनमानसहित अनेक अर्थशास्त्रीय विचारवंतांनी नव-अभिजात ‘आर्थिक मानव’ प्रमेयावर टिका केल्याचे दिसून येते. वेब्लेन यांनी तर असा युक्तिवाद केला की, ‘नव-अभिजात अर्थशास्त्रात नमूद केलेला आर्थिक मानव भावनेच्या पातळीवर सुख-दुःखाचे मोजमाप करणारे यंत्र असून एकसंघ जगाच्या कल्पनेत रममान राहतो. इतकेच नाही, तर सभोवतालची सर्व परिस्थती बदलली किंबहुना पायाखालची भूमी नाहीशी झाली, तरी तो तसाच स्थिर राहतो’.

नफा महत्तमीकरणाच्या कल्पनेने मोठे औद्योगिक उद्योग कदाचित नव-अभिजात अर्थशास्त्रीय विचारसरणीने प्रभावित होतीलही; परंतु विस्तृत सामाजिक संदर्भात विचार केला, तर हे अयोग्यच असेल. कालौघात भांडवल विनियोग करून विकसित होत जाणार्‍या अर्थव्यवस्थेशी नव-अभिजात सर्वसाधारण समतोल प्रमेय अनुरूप असूच शकत नाही. १९६० च्या दशकात आर्थिक वृद्धी, भांडवल आणि विभाजनाचा सिमांत उत्पादकता सिद्धांत इत्यादी घटकांना केंद्रस्थानी ठेवून चर्चेत राहिलेल्या केंब्रिज भांडवल विवादानेही नव-अभिजात अर्थशास्त्राच्या मान्यामान्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होतेच. गणिती प्रमेयावरील अतिरिक्त अवलंबित्त्वाबाबतचा आक्षेपही नव-अभिजात अर्थशास्त्रीय विवेचनावर घेतला जातो. अर्थात, गणिती प्रमेयांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचे वास्तव विवेचन होतेच असे नाही. याचा प्रत्यय नव-अभिजात विवेचनातील सामान्य समतोलाच्या बाबतीत निश्चितपणे येतो. याबाबत मिल्टन फ्रीडमन यांनी असे विवेचन केले की, ‘प्रमेयांची उपयुक्तता त्याच्या गृहितकांवरील अवलंबित्त्वाऐवजी प्राक्कथन क्षमतेनुसार तपासली जावी’.

नव-अभिजात अर्थशास्त्र विवेचनाचे गृहितकांवरील अतिअवलंबित्व ही प्रमुख मर्यादा मानली जाते. उपरोल्लेखित टिकांच्या परिप्रेक्षात विचार केला, तर नव-अभिजात अर्थशास्त्रीय विचारप्रणाली सर्वमान्य आहे, असे संबोधता येणार नाही.

समीक्षक : राजस परचुरे