सीझाल्पिनो आंद्रिया : (६ जून १५१९ – २३ फेब्रुवारी १६०३) आंद्रिया सीझाल्पिनो यांचा जन्म इटालीतील अरेझ्झो, टस्कॅनी येथे झाला. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे वडील गवंडीकाम, बांधकामाची कंत्राटे घेणे अशी कामे करीत असावेत. तरीही त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत होते. त्याकाळी आपल्या मुलाला वैद्यकीय शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी आधार दिला. सीझाल्पिनो यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. लुका घिनी हे पिसा विद्यापीठात प्राध्यापक होते. ते सीझाल्पिनो यांचे वैद्यकशास्त्रातील शिक्षक. घिनी वैद्यकीय प्राध्यापक होतेच, शिवाय पिसा विद्यापीठातील वनस्पती उद्यानाच्या संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत होते. घिनी यांनी हे वनस्पती उद्यान सुरू केले होते. त्यांच्या पश्चात या दोन्ही जबाबदाऱ्या सीझाल्पिनो यांच्याकडे आल्या. घिनी यांचे स्वतःचे लिखाण फारसे मिळत नाही परंतु त्यांनी शिक्षक म्हणून अनेक प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ घडवले. उदा., युलीसे अन्द्रोवांडी, आंद्रिया सीझाल्पिनो, पिअर्तो मॅटीओली, बार्तोलोमिओ मारांता आणि लुईजी अँगुइल्यारा इत्यादी.

सीझाल्पिनो शिकत असताना त्यांच्या वैद्यकीय शिक्षणक्रमात वनस्पतीशास्त्र हा एक विषय होता. वनस्पतींपासून औषधी द्रव्ये मिळू शकतात; त्यामुळे तो व्यावहारिक उपयोगाचाही होता. सीझाल्पिनो यांनी वनस्पती वर्गीकरणावर दीर्घकाळ विचार करून स्वतःची नवी वर्गीकरण पद्धत सुरू केली. त्यांनी लॅटिन भाषेत एक पत्र त्यांचे ज्येष्ठ मित्र आणि समर्थक, अल्फोन्सो टॉर्नाब्यूओनी यांना लिहिले. ते पत्र सीझाल्पिनो यांचे दे प्लान्तीस लीब्री XVI हे वनस्पती वर्गीकरणाची नवी पद्धत मांडणारे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी तब्बल वीस वर्षे आधी लिहिले आहे. त्यात वनस्पती वर्गीकरणाच्या, त्यांच्या डोक्यात घोळत असलेल्या मुद्द्यांवर लिहिले आहे. सीझाल्पिनो यांच्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या पद्धतींत औषधी गुणधर्म हा पायाभूत निकष मानला जाई. कधी वनस्पतीच्या नावाच्या आद्याक्षराप्रमाणे ही वर्गीकरणे करत. या पद्धती पुरेशा तर्कनिष्ठ न वाटल्यामुळे त्यांनी वनस्पतींच्या विविध भागांची रचना वर्गीकरणासाठी विचारात घेण्याचा पायंडा पाडला. फळे आणि बिया यांची बाह्यरचना त्यांनी वनस्पती वर्गीकरणासाठी विचारात घेतली. त्याकाळी सूक्ष्मदर्शक नव्हते म्हणून अंतर्रचना विचारात घेण्याचा प्रश्नच नव्हता.

आपले गुरू घिनी यांनी सांगितल्यावर सीझाल्पिनो यांनी शुष्क वनस्पतीसंग्रह (हर्बेरियम) बनवले. ते तयार करण्याचा सीझाल्पिनो यांचा हेतू गुरूंबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करायचा होता. तर घिनी यांना भविष्यात दीर्घकाळ संदर्भ म्हणून तो शिक्षकाना आणि विद्यार्थ्याना उपयोगी पडावा असे वाटत होते. सध्या त्यापैकी दोन संग्रह माहीत आहेत. त्यापैकी एकात सातशे अडुसष्ट नमुने आहेत. हा संग्रह सीझाल्पिनो यांनी बिशप अल्फोन्सो टॉर्नाब्यूओनी यांना दिला होता. सध्या त्याची फ्लोरेन्स विद्यापीठात म्युसिओ दि स्तोरिया नॅचरल दि फिरेन्झ शुष्क वनस्पती संग्रहात गणना होते.

सीझाल्पिनो यांच्यामुळे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाला एक वैचारिक, सैद्धांतिक बैठक मिळाली. त्याकाळी पूर्णतः नवी अशी प्रजातीची संकल्पना त्यांनी मांडली आणि जीनस  (Genus) ही शास्त्रीय संज्ञाही रूढ केली. सीझाल्पिनो यांनी वनस्पती उद्यानात आणि अन्य क्षेत्रात जाऊन वनस्पतींचे नमुने गोळा केले. त्यांच्या याद्या केल्या. वनस्पतींची वा त्यांच्या गुणधर्मांची तुलना करून योग्य वर्गीकरण केले. नमुने जपून ठेवले. हे सारे परिश्रम घेणे, विद्यापीठात तीन भिन्न ज्ञानशाखा वैद्यकशास्त्र, वनस्पतीशास्त्र व औषधशास्त्र शिकवण्याच्या जोडीला चालू होते. काहीवेळा सीझाल्पिनो यांना वनस्पतींचे नमुने जमवत हिंडताना जीवाश्म मिळत. त्यांनी ते निरखून योग्य अनुमान काढले होते की समुद्रीजीव पाण्याबाहेर क्वचित येतात. तेथे मरतात. दीर्घ काळाने त्यांचे खडकात रूपांतर होते.

सीझाल्पिनो यांच्या अभ्यासाचा आवाका आणि अथक परिश्रम याचा परिपाक म्हणजे वनस्पतीशास्त्र ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून ओळखली जाऊ लागली. सीझाल्पिनो यांना पोप क्लेमेंट आठवे, यांचा वैयक्तिक वैद्यकीय अधिकारी म्हणून राहण्याचा, तसेच रोममधील सॅपिएन्झा विद्यापीठात शिकवण्याचा मान मिळाला. सॅपिएन्झा विद्यापीठ, यूरोपातील एक अतिप्राचीन विद्यापीठ इ.स. १३०३ मध्ये स्थापले गेले.

सोबत दिलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्र साधे आणि अनाकर्षक वाटते. परंतु ते फार महत्त्वाचे पुस्तक आहे. दे प्लान्तीस लीब्रीच्या सर्व सोळा खंडांचा विस्तार विचारात घेतला तर त्यांनी किती प्रचंड काम केले आहे हे लक्षात येईल. सीझाल्पिनो यांनी लिहिलेल्या ‘दे प्लान्तीस लीब्री’ (XVI De plantis libri XVI) या सोळा खंडांच्या ग्रंथात ॲरिस्टॉटल आणि थिओफ्रेस्टस यांच्या तत्त्वांप्रमाणे वर्गीकरणाचे विवेचन केले आहे. या खंडातील चौदा प्रकरणांत वनस्पतींचे पोषण, बीजांकुरण, फुले, फळे, बिया, वैद्यकीय उपयोग अशा आशयाची संक्षिप्त रूपरेषा दिली आहे. वनस्पतींच्या पोषणासंदर्भात त्यांनी असे निरीक्षण मांडले की प्राण्यांमध्ये रक्तवाहिन्या असतात; तशा वनस्पतींतही असल्या पाहिजेत. मात्र त्या वाहिन्यांचा आकार अतिसूक्ष्म असल्यामुळे त्या आपल्याला दिसत नाहीत. वड, शेर अशा झाडांच्या डहाळ्या किंवा पाने तोडली, कापली गेली तर पांढरा चीक बाहेर पडतो. तो अशा वनस्पतींच्या सूक्ष्मवाहिन्यांतून वाहत असावा.

सीझाल्पिनो यांनी मानवी रोग आणि विकार याबद्दलही लेख प्रसिद्ध केले आहेत. विशेषतः हृदयरोग, छातीतील इतर दुखणी, सिफिलीस (गर्मी म्हणजेच उपदंश) सारखे गुप्त  म्हणजेच लैंगिक संक्रमण होणारे रोग यावर लिहिले आहे. हृदय हे रक्ताभिसरण क्रियेच्या केंद्रस्थानी आहे हे अनुमान त्यांनी काढले होते. नीलांमधून पोषक पदार्थ हृदयात जातात. नंतर हृदयात रक्त आणखी परिपूर्ण होते आणि मग धमन्यांमधून शरीरभर जाते. हृदय ही एक प्रकारची कार्यशाळाच (त्यांनी वापरलेला इटालियन शब्द officina) आहे. त्यांना नीला आणि धमन्या यांना जोडणाऱ्या नलिका असाव्या असे वाटत होते. परंतु त्या दृष्टीने त्यांनी काही प्रयोग केले नाहीत. तरीही ढोबळ रूपात प्राण्यांच्या रक्ताभिसरणासंबंधी काम त्यांनी केले होते. विल्यम हार्वे यांच्यापूर्वी प्राण्यांच्या रक्ताभिसरणासंबंधी सर्वात प्रगत काम सीझाल्पिनो यांनीच केलेले आढळते.

पुढील पंधरा खंडांत स्वतःच्या पद्धतीनुसार सुमारे १५०० वनस्पतींचे वर्णन आणि वर्गीकरण त्यांनी केले आहे. या पूर्ण संग्रहात आकृत्या किंवा तक्ते नाहीत. त्यामुळे हे खंड सामान्य वाचकांसाठी समजायला अवघड किंवा अनाकर्षक झाले असे दिसते. सीझाल्पिनो यांनी त्यांच्या नव्या पद्धतीनुसार वनस्पतींचे वर्गीकरण केले. परंतु त्यात असणारे ॲरिस्टॉटलच्या काळापासून प्रचलित असे काष्ठीय वनस्पती आणि शाक (हर्ब) वनस्पती हे दोन गट तसेच ठेवले. पुढे त्यांचे बत्तीस उपगटही केले. त्यातील काही अजूनही वापरात आहेत. उदा., कोनीफर्स, लेग्यु्मिनॉसी कुल, कॉम्पोझिटी कुल, क्रूसिफेरेसी, समुद्रशैवाल इत्यादी. वनस्पतीत काष्ठ असणे वा नसणे असे वर्गीकरण निकष बदलणे गरजेचे होते पण सीझाल्पिनो यांनी तसे केले नाही. सीझाल्पिनो यांच्या समजुतीप्रमाणे फुलांतील पुंकेसर संरक्षणासाठी असतात. वनस्पती लैंगिक पुनरुत्पादन करत नाहीत. पण ही समजूत पाचशे वर्षांपूर्वी रूढ होती.

सीझाल्पिनो, मार्सेलो माल्पिघी, जॉन रे, नेहेमिया ग्रू या वनस्पतीशास्त्रज्ञांत वनस्पती लैंगिकतेविषयी बराच वाद झाला होता. शेवटी कामारेरीयस आणि गॉटलिब कॉलरिटर या दोघांनी वनस्पती लैंगिक पुनरुत्पादन करतात हे नि:संदेह सिद्ध केले. वनस्पतीशास्त्राच्या संकल्पना कशा उत्क्रांत होत गेल्या हे सीझाल्पिनो यांच्या लिखाणातून समजत जाते. दे प्लान्तीस लीब्री हे जगातील वनस्पतीशास्त्राचे पहिले पाठ्यपुस्तक मानले जाते.  कार्ल लीनियस, जॉन रे यासारख्या तरुण वर्गीकरणशास्त्रज्ञांना सीझाल्पिनो यांच्यामुळे स्फूर्ती मिळाली. सीझाल्पिनो यांच्या शुष्क वनस्पती संग्रहाचा संदर्भ म्हणून पुढच्या कित्येक पिढ्यांना उपयोग झाला. लीनियस यांच्या पूर्वीच्या काळातील वनस्पतींविषयक पुस्तकांत दे प्लान्तीस लीब्री सर्वोत्तम समजले जाते.

हे पुस्तक जगापुढे आणण्यात आयरिश वनस्पती तज्ज्ञ जॉन रटी यांनी मोलाची भूमिका निभावली. जॉन यांनी त्यावर संपादकीय संस्कार करवून तो संग्रह इतरांना उपलब्ध करून दिला.

सीझाल्पिनो यांचा मृत्यू रोममध्ये झाला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा