गटमान, लुडविग : (३ जुलै १८९९ – १८ मार्च १९८०) लुडविग गटमान यांचा जन्म जर्मन ज्यू कुटुंबात टोस्ट येथे झाला. त्याकाळी टोस्ट सिलेसिया शहर जर्मन अधिपत्याखाली होते. आता ते टिस्खेक पोलंडचा भाग आहे. ते केवळ तीन वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब सिलेसियन शहरात (सध्या चोरझाओ पोलंड) स्थलांतरित झाले. सिसेलियन हयूमॅनिस्टिक ग्रामर स्कूल येथून अ‍ॅबिटूर (आपल्या बारावी समकक्ष) परीक्षा त्यांनी दिली. त्याच वेळी त्यांना सैन्यात बोलावणे आले.

गटमान यांचा पहिला रुग्ण पायाच्या अंग़ठ्यास इजा झालेला होता. कोइनोश्चुटा येथे ते अपघात रुग्णालयात त्यावेळी काम करीत होते. रुग्ण कोळशाच्या खाणीमध्ये कामगार होता. जखम दूषित झाल्याने नंतर रुग्णाचा मृत्यू झाला. गटमान यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रेस्लाऊ येथे वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ केला. त्यांनी एमडी पदवी मिळवली. नंतर गटमान ब्रेस्लेऊमध्ये चेताशल्यतज्ञ (न्यूरोसर्जन) होते आणि विद्यापीठात अध्यापन करीत. त्याकाळी ओटफ्रिड फोएस्टर इन्स्टिट्यूटमधील प्रशिक्षण त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले.

ब्रिटिश शासनाने गटमान यांना नॅशनल स्पायनल इंज्युरी सेंटर प्रस्थापित करण्याची विनंती केली. हे केंद्र स्टोक मॅन्डेव्हिले हॉस्पिटल बकिंगहॅमशायरमध्ये उभे करायचे होते. त्यासाठी प्रथमच रॉयल एअर फोर्समधील पाठीच्या कण्याचा अपघात झालेल्या वैमानिकांना  उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. या सर्व वैमानिकांची विमाने युद्धात कोसळून दुर्घटनाग्रस्त झाली होती. सैन्यातील रुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या अवयवामध्ये ताकद आणण्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्वास विकसित होण्यासाठी खेळाचा उपयोग करता येईल असे त्यांना वाटले.

त्यांनी स्टोक मॅन्डेव्हिले खेळ स्पर्धा भरवल्या. हा दिवस लंडन ऑलिम्पिक उद्घाटनाचा होता. मज्जारज्जूची इजा झालेल्या सर्व खेळाडूंनी चाकाच्या खुर्चीवरून स्पर्धेत भाग घेतला. राष्ट्रीय पातळीवरील खेळात भाग घेण्याची ही त्यांची पहिलीच संधी होती. गटमान यांनी या स्पर्धेस पॅरॅप्लॅजिक (Paraplegic) गेम्स असे नाव दिले. त्याचे नाव लवकरच पॅरालिम्पिक गेम्स झाले. पुन्हा याला समांतर खेळ (पॅरलल गेम्स) म्हणू लागले. यामध्ये इतर शारीरिक दुर्बलतेचा समावेश झाला.

सन १९५२ मध्ये १३० आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी स्टोक मॅन्डेव्हिले स्पर्धेत प्रवेश घेतला. दर वर्षी मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे ऑलिम्पिक स्पर्धा संयोजकांना आणि आंतरराष्ट्रीय समुदायास ही कल्पना आवडली. स्टोक मॅन्डेव्हिले स्पर्धेमध्ये गटमान यांना सर थॉमस फिययर्नले कप आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कामिटीकडून देण्यात आला. हा कप देण्यामागील भूमिका सामाजिक आणि मानवी दृष्टीने चाकाच्या खुर्चीवरील खेळ स्पर्धा प्रचलित केल्याबद्दल होती.

 गटमान लुडविग यांच्या सन्मानार्थ गुगलने केलेले डूडल

सन १९६० साली भरलेल्या रोम ऑलेम्पिक स्पर्धेच्या वेळीच स्टोक मॅन्डेव्हिले स्पर्धा भरवण्यात आली. १९८४ पासून या स्पर्धेचे नाव पॅरलिम्पिक गेम्स असे देण्याचे ठरवण्यात आले. गटमान यांना अनेक पुरस्कार देण्यात आले. दुसऱ्या एलिझाबेथ राणीने गटमान याना नाइटपद देऊन गौरव केला. त्यांच्या सन्मानार्थ रशियाने खास टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१९ साली नॅशनल पॅरालिम्पिक हेरिटेज सेंटरमध्ये त्यांच्या नावाने एक लहानसे संग्रहालय उभे करण्यात आले. हे संग्रहालय स्टोक मॅन्डेव्हिले स्टेडियमजवळ आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या १२२व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गूगलने खास डूडल प्रसिद्ध केले होते.

हृदय विकाराने त्यांचे निधन झाले.

 

 

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी