मुखर्जी, शिप्रा गुहा : (१३ जुलै १९३८ – १५ सप्टेंबर २००७) शिप्रा गुहा मुखर्जी यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई आणि दिल्ली येथे झाले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी वनस्पती विज्ञानातून पदवी मिळवली. त्यांनी पदव्युत्तर एम. एस्सी पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातूनच मिळवली. प्रोफेसर बी. एम. जोहरी यांच्याकडे कांदा वनस्पतीच्या ऊती संवर्धनावर संशोधन करून पीएच्. डी. मिळवली. त्यांचे पोस्टडॉक्टरल संशोधन परागकोश संवर्धन पद्धतीने एकगुणीत पराग वनस्पती मिळवण्यावर झाले. त्यासाठी धतुरा इनोक्सिया नावाच्या धोत्र्याच्या एका जातीचे पराग मिळवले. त्यांचे हे महत्त्वाचे संशोधन इन व्हीट्रो सेल्युलर अँड डेव्हलपमेंटल बायोलॉजी या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले. त्यांनी केलेल्या संशोधनाचा वापर तांदूळ, गहू आणि बटाटा व इतर पिकांच्या सुधारित जाती मिळवण्यासाठी यशस्वीपणे केला जातो. त्यांच्या या संशोधनासाठी भारतातील वनस्पतीवैज्ञानिक एस. सी. माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभले. अमेरिकेत मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी, वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठ आणि एमएसयू/डीओई प्लांट रिसर्च लॅबोरेटरीमध्ये संशोधनकार्य केले. त्यांनी तांदूळ संशोधनासाठी एम. एस. स्वामिनाथन यांच्याबरोबर कार्य केले. त्यांनी टास्क फोर्स आणि वैज्ञानिक सल्लागार समिती, भारत सरकार बायोटेक्नॉलॉजी विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग सदस्य म्हणूनही काम केले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी आयुष्यातील तीस वर्षे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक या नात्याने व्यतीत केली. त्यानंतर त्या काही काळ वेस्ट व्हर्जिनिया या अमेरिकन युनिव्हर्सिटीत होत्या व नंतर त्या परत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत जीवविज्ञान विभागात शिकवण्यासाठी परतल्या. त्या म्हणत, ‘वनस्पतीविज्ञान मला लहान असल्यापासून आवडायचे. सर जगदीशचंद्र बोस यांच्या वनस्पतीवरील प्रयोगामधून मी प्रभावित झाले होते. वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्यातील चयपचय एकसारखे असते. या त्यांच्या संशोधनामुळे मला वनस्पती विज्ञानात संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली’ असे त्यांनी स्वत:वरील एका आत्मचरित्रात्मक लेखामध्ये लिहिले आहे. त्यांचा हा लेख पुरुष संशोधकांच्या गर्दीत अधिक उठून दिसला. त्या जेंव्हा पी. माहेश्वरी आणि बी. एम. जोहरी यांच्याकडे संशोधन करत होत्या तेव्हा महिला वैज्ञानिकांना संशोधकात स्थान असू नये असे त्यांचे सहकारी म्हणत असत. महिलांच्या सामाजिक स्थानामुळे त्यांना पुरुष वैज्ञानिकांच्या तुलनेने यश मिळत नाही या विधानावर त्या ठाम होत्या.
शिप्रा गुहा मुखर्जी यांना सीनियर नॅशनल बायोसायंटिस्ट पुरस्कार, ओम प्रकाश भसीन फाउंडेशन पुरस्कार आणि लायन्स क्लबकडून कनिष्क पुरस्कार मिळाले होते. इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बेंगलोर आणि नॅशनल अॅकेडेमी ऑफ सायन्स अलाहाबाद येथील फेलोशिप त्यांना मिळाल्या होत्या.
मेंदूच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
संदर्भ:
समीक्षक : मोहन मद्वाण्णा