योगसाधनेतील एक मुद्रा प्रकार. षण्मुखी ही संज्ञा ‘षट्’ आणि ‘मुखी’ या दोन शब्दांनी तयार झाली आहे. या मुद्रेमध्ये दोन डोळे, दोन कान, नाक आणि मुख ही सहा मुखे बंद करून अवधान अंतर्मुख करणे अभिप्रेत आहे.

षण्मुखी मुद्रा

कृती : ध्यानास योग्य अशा आसनात, शक्यतो पद्मासनात वा सिद्धासनात बसावे. हळूवारपणे, परंतु खोल श्वास घ्यावा व रोखून धरावा. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी कान बंद करावेत, दोन्ही तर्जनी डोळ्यांवर ठेवून डोळे बंद करावेत, मधल्या बोटांनी नाकपुड्या बंद कराव्यात आणि दोन्ही अनामिका व कनिष्ठिका अनुक्रमे ओठांच्या वर व खाली ठेवून ओठ मिटून घ्यावेत. मध्यमांनी दिलेला दाब मोकळा करून नाकपुड्या उघडाव्या व श्वास आत घ्यावा. पूरकाच्या शेवटी (श्वास आत घेतल्यानंतर) नाकपुड्या बंद करून कुंभक (श्वास रोखून धरणे) करावा. शक्य तेवढा वेळ कुंभक ठेवून नंतर मधल्या बोटांचा दाब कमी करून नाकपुड्या मोकळ्या कराव्यात व रेचक (श्वास सोडणे) करावा. श्वास रोखलेल्या स्थितीतच आज्ञा किंवा अनाहत चक्रातील ध्वनी श्रवण करावा.

षण्मुखी मुद्रा

ही मुद्रा प्रत्याहारासाठी म्हणजेच मनाला विषयांपासून मागे फिरविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. विज्ञानभैरवतंत्र (३६) या ग्रंथात असे म्हटले आहे की, या मुद्रेमध्ये प्रकाशाचे दर्शन होते आणि साधकाला परमस्थिती प्राप्त होते. ध्वनीच्या विविध आविष्कारांच्या अनुभवातून शेवटी ज्या अनाहत नादापासून विश्वाची उत्पत्ती झालेली आहे त्या नादाचा चित्ताला अनुभव येणे हे या मुद्रेचे अंतिम उद्दिष्ट होय. नादयोगात या मुद्रेला असाधारण महत्त्व आहे.

 

समीक्षक : मकरंद गोरे