राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे : (स्थापना : ३ जानेवारी १९५०) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाच्या प्रगतीसाठी काही विशेष योजना आखल्या गेल्या. त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशाचा विकास करण्यावर भर देण्यात आला. हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन करणार्‍या संस्था निर्माण करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने राष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (Council of Scientific and Industrial Research) या आधीच स्थापन करण्यात आलेल्या संस्थेची मदत घेण्यात आली. या महामंडळाला स्वातंत्र्यानंतर नवनवीन वैज्ञानिक संस्था सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. या प्रयत्नातून देशात अनेक नवीन संशोधन संस्था उभ्या राहिल्या. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही त्यातलीच एक होय. ही संस्था एनसीएल, पुणे या नावाने प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची पुणे शहरात सुरूवात झाली. पुणे शहराच्या पाषाण भागात विस्तीर्ण अशा परिसरात ह्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. जे. डब्ल्यू. मॅकबेन हे कॅनॅडियन शास्त्रज्ञ या संस्थेचे पहिले संचालक होते. दोन वर्षांनी ते निवृत्त झाल्यावर जी. आय. फिंच हे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ या संस्थेचे पाच वर्ष संचालक होते. नंतर मात्र एनसीएलचे पहिले भारतीय संचालक कृष्णासामी वेंकटरामन ह्यांनी सूत्रे हाती घेतली. नोबेल पुरस्कार विजेते रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इंग्लंड मधून पीएच्. डी. पदवी मिळवली होती. आपल्या नऊ वर्षांच्या कालावधीत त्यांनी संस्थेला चांगली दिशा दिली. एनसीएलच्या जडणघडणीत त्यांच्याबरोबरच त्यांच्यानंतर आलेल्या संचालकांनी मोलाचे योगदान दिले. त्यामध्ये बी. डी. टिळक, एल. के. दोराईसामी, आर. ए. माशेलकर, पॉल रत्नासामी, एस. सीवराम, डॉ. सौरव पाल, नांगिया, लेले या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विज्ञानाची एक महत्त्वाची शाखा रसायनशास्त्र या विषयाच्या अनेक उपशाखांवर संशोधन केले जाते. मागील सात दशकात या संस्थेने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे. कोणत्याही संशोधन संस्थेच्या कार्याचे मूल्यमापन त्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक नियतकालिकात किती लेख प्रकाशित केले यावर ठरते. या दृष्टीने विचार करता या संस्थेचा क्रमांक बराच वरचा लागतो. त्याचबरोबर या संस्थेतील तरुण शास्त्रज्ञांना अनेकवेळा शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक प्राप्त झाले आहे. शुद्ध रसायनशास्त्राबरोबरच रासायन आभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र या विषयात देखील या संस्थेत काम केले जाते. या दृष्टीने या संशोधन संस्थेत खालील विभाग कार्यरत आहेत.

१. भौतिकी आणि मटेरियल रसायनशास्त्र (Physical and Materials Chemistry).
२. कार्बनी रसायनशास्त्र (Organic Chemistry).
३. रसायन अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास (Chemical Engineering & Process Development).
४. बहुवारिक विज्ञान आणि अभियांत्रिकी (Polymer Science and Engineering).
५. उत्प्रेरक (Catalysis).
६. जीवरसायन विज्ञान (Biochemical Science).
७. वनस्पती ऊती विकास (Plant Tissue Culture).

याशिवाय, असेंद्रिय (Inorganic ), संप्रेरक आणि इतर अनेक शाखांत येथे काम चालते.

एनसीएल या संस्थेच्या कामाचे अनेक पैलू आहेत. रसायने बनविणार्‍या कारखान्यांना मदत करणे, उपयुक्त रसायनांची निर्मिती करणे आणि सामाजिक समस्या सोडविण्यासाठी काम करणे अशा अनेक स्तरांवर ही प्रयोगशाळा कार्य करीत असते. या तीनही क्षेत्रात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने बहुमोल अशी कामगिरी केली आहे. नवीन रसायन बनविले किंवा नवीन प्रक्रिया शोधून काढली तर तिचे स्वामित्व हक्क म्हणजेच पेटेंट्स घ्यावी लागतात. या क्षेत्रातही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खूपच अग्रेसर आहे. या संस्थेच्या नावावर शेकडो पेटेंट्स आहेत.

मागील सात दशकाच्या कालावधीत या संस्थेत अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनाचे कार्य केले आहे. त्याचबरोबर शेकडो विद्यार्थ्यांनी या संस्थेत संशोधन करून पीएच्. डी. प्राप्त केली आहे. या सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने एनसीएल ॲल्युमिनाय असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेने नवसंशोधक आणि अनुभवी संशोधक यांना एकत्र आणले आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्रात नवीन प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यांना जुन्या शास्त्रज्ञांच्या अनुभवाचा फायदा मिळतो.

संशोधन संस्थेने संशोधनाबरोबरच नवीन संशोधक निर्माण करावेत अशी अपेक्षा आहे. त्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएच्. डी. चे संशोधन करण्यासाठीची संधी तरुण शास्त्रज्ञांना दिली जाते. २०१० सालापासून संस्थेने एम. टेक्. ही पदवी द्यायलाही सुरुवात केली आहे. रसायनशास्त्र आणि रसायन-आभियांत्रिकी या क्षेत्रातील नवनवीन विषयावर काम करणारे देशातील सर्वात जास्त संशोधक या संस्थेत असतात. त्यांच्या संशोधनासाठी लागणार्‍या सुविधा ही संस्था पुरविते.

संशोधन प्रक्रियेत वाचनालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे ओळखून या संस्थेच्या स्थापनेपासून वाचनालयाचा विकास करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आजमितीस संदर्भ ग्रंथ, संशोधनपत्रिका, प्रबंध अशा अनेक बाबींनी समृद्ध असे वाचनालय या संस्थेत आहे. त्याला नॉलेज रिसोर्स सेंटर असे समर्पक नाव दिलेले आहे. शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधन करणारे विद्यार्थी यांना आवश्यक ती माहिती पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य हे केंद्र करते. हवा असलेला संदर्भ पटकन मिळावा यासाठी वाचनालयाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटॅलागची सुविधा वाचनालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अनेक प्रसिद्ध संशोधकांनी या संस्थेत काम केले आहे. यात दोन मराठी भाषक शास्त्रज्ञांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यातील एक आहेत बाळ दत्तात्रय टिळक. इंग्लंड मधील प्रतिथयश ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी. फील. आणि डी. एससी. या मानाच्या पदव्या प्राप्त करून टिळक भारतात परतले. १९६६ ते १९७८ या कालावधीत ते एनसीएलचे संचालक होते. त्यांनी रघुनाथ माशेलकर यांना परदेशातून भारतात परत येण्यास उद्युक्त केले. १९७५ ते १९९५ असा दीर्घ काळ माशेलकरांनी या संस्थेत व्यतित केला. त्यातील शेवटची सहा वर्षे (१९८९ ते १९९५) माशेलकर या संस्थेचे संचालक होते. आपल्या संचालक पदाच्या कार्यकाळात त्यांनी या संस्थेला एक वेगळी दिशा दिली. त्यातून भारतीय रासायनिक उद्योगांना उपयुक्त असे महत्त्वाचे संशोधन या संस्थेत होऊ लागले. २००४ मध्ये सीएसआयआरच्या कामाचे मूल्यमापन करून नवीन मार्गदर्शक सूचना देण्यासाठी केळकर समिती स्थापन केली होती. या समितीने असे सुचविले की संस्थेने सीएसआयआरच्या अधिपत्याखाली येणार्‍या इतर संस्थांच्या सहकार्याने नवीनतम संशोधन हाती घ्यावे. यासाठी अकॅडेमी ऑफ सायन्स इनोव्हेशन ॲंड रिसर्च या गटाची निर्मिती करण्यात आली. या गटात सामील होऊन एनसीएलने अनेक नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. विज्ञानाच्या विकासाबरोबरच समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे हे संशोधन संस्थेचे एक महत्त्वाचे काम असते. त्याहीपेक्षा नवीन पिढीत संशोधनाची आवड निर्माण करण्याची मोठी जबाबदारी या संस्थांवर असते. आपली ही जबाबदारी ओळखून कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲंड इंडस्ट्रीयल रिसर्च या संघटनेने केंद्रीय विद्यालय संघटनेशी एक करार केला आहे. पुणे आणि मुंबई परिसरातील केंद्रीय विद्यालयांच्या शाळांची जबाबदारी एनसीएलवर टाकण्यात आली आहे. या शाळांखेरीज परिसरातील इतर शाळांचा समावेशदेखील या योजनेत करण्यात आला आहे. जिज्ञासा नावाच्या कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षक, विद्यार्थी त्यांचे पालक यांच्यासाठी विविध उपक्रम एनसीएल राबवित असते. विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण, विज्ञान विषयावरची व्याख्याने, शाळेतील विद्यार्थ्यांची संस्थांना भेट, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असे एनसीएलने राबविलेले काही उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार एनसीएलने; कौशल्यविकास हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर काम करणार्‍या कारागीरांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात उद्योग धंद्याच्या गरजा लक्षात घेऊन नवीन कौशल्ये शिकविली जातात. प्रशिक्षणात नोंदणी केलेल्या ज्ञानार्थींना माहिती बरोबरच पुरेसा अनुभव मिळेल याची व्यवस्था केली जाते. या कार्यक्रमामुळे पुण्याची एनसीएल आणि देशातील रासायनिक उद्योग यांच्यामध्ये उत्तम संबंध प्रस्थापित झाले आहेत.

संदर्भ :

समीक्षक : श्रीनिवास केळकर