नेस्बिट, सेसिल जे. : (१० ऑक्टोबर १९१२ – २२ ऑक्टोबर २००१) सेसिल जे. नेस्बिट यांचा जन्म कॅनडातील फोर्ट विल्यम (आताचा थंडर बे), ऑन्टारिओ येथे झाला. नंतर कुटुंबासह ते अल्बर्टास्थित एडमन्टन येथे राहू लागले. त्यांचे शालेय शिक्षण एडमन्टनच्या व्हिक्टोरिया हायस्कूलमधून पूर्ण झाले. एक वर्ष नोकरी केल्यावर त्यांनी टोरांटो विद्यापीठात प्रवेश घेत गणितातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे नेस्बिट यांनी रिचर्ड ब्रावर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘On the regular representations of algebras’ या प्रबंधावर डॉक्टरेट मिळविली. त्यांनतर, ब्रावर यांच्या शिफारसीमुळे त्यांनी पीएच्.डी. पश्चातचे संशोधन अमेरिकेत प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीमध्ये केले.
नंतर नेस्बिट मिशिगन विद्यापीठाच्या गणित विभागात रुजू झाले आणि तिथे त्यांनी सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. कार्ल एच. फिशर यांच्यासह पुढे भरभराटीला आलेला, विमागणितावरील अभ्यासक्रम त्यांनी इथेच तयार केला होता. निवृत्तीनंतरची आठ वर्षे ते त्या विद्यापीठात गुणश्री (emeritus) प्राध्यापक होते.
नेस्बिट यांनी आर्टिन वलयांवर (Artin rings) एमिल आर्टिन आणि आर. एम. थ्राल यांच्यासह रिंग्ज विथ मिनिमम कंडिशन हे आजही वापरात असलेले, उत्कृष्ट पुस्तक लिहिले. गणितात वलय (ring) हा दोन क्रिया (उदा., बेरीज आणि गुणाकार) शक्य असलेला आणि विशिष्ट गुणधर्मांचा संच असतो. त्यांत बेरीज आणि गुणाकार अविकारक (identities) असून बेरीज-व्यस्त (additive inverses) असतात, बेरीज क्रमनिरपेक्ष असते आणि बेरीज गुणाकार क्रिया सहचारी तसेच वितरणशील असतात. याचे साधे उदाहरण म्हणजे, {…, −३, −२, −१, ०, १, २, ३,…} हा संच. वलय सिद्धांत हा गट अभ्यासाचा (ग्रुप थिअरी) विस्तार आहे. वलय सिद्धांताचे महत्त्व कालातीत असून गणित आणि विज्ञानाच्या अनेक शाखांत तो उपयुक्त आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीला, नेस्बिट यांनी बीजगणित आणि प्रतिनिधित्व सिद्धांत हाताळला. एकमापांकी प्रतिनिधित्व सिद्धांतावर (modular representation theory) आधारित त्यांचे सहा शोधनिबंध अॅनल्स ऑफ मॅथेमॅटिक्समध्ये प्रकाशित झाले. गणितातील प्रतिनिधित्व सिद्धांतात बीजगणितीय अमूर्त रचनांचा (उदा., रुबिक घन किंवा आकृतीत दर्शविलेल्या सारख्या) अभ्यास केला जातो. यासाठी अमूर्त रचनेचे प्रतिनिधित्व, त्यांतील घटकांचे सदिश अवकाशातील रेषीय रूपांतरण मिळवून केले जाते. यामुळे अमूर्त रचनेची प्रतिकृती संगणकाद्वारे रचता येते. या नंतर मात्र नेस्बिट विमागणिताकडे वळले. ते सोसायटी ऑफ ॲक्च्युअरीजचे अधिछात्र होते. दोन वर्षे ते त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते.
डोनाल्ड आर. शुएट या त्यांच्या पीएच्.डी.च्या विद्यार्थ्यासह नेस्बिट यांनी विमागणितात एक महत्त्वाचे सूत्र विकसित केले. हे सूत्र, चयनशास्त्रातील समावेश-अपवर्जन (inclusion–exclusion) या दोन किंवा अधिक संचांतील घटकसंख्या अचूकपणे मोजण्याच्या सूत्राचे सामान्यीकरण आहे. शुएट-नेस्बिट सूत्राच्या संभाव्यताशास्त्रीय आवृत्तीचे विमागणितातील व्यावहारिक उपयोजन मोठे आहे. सर्वसाधारण, संतुलित स्थितीवर आधारलेल्या जीवनवार्षिकी (Annuity) आणि जीवनविम्याचा निव्वळ एकल हप्ता या सूत्राने ठरविता येतो.
ते अमेरिकन अकॅडमी ऑफ ॲक्च्युअरीजचे संस्थापक सदस्य होते. ॲक्च्युअरीअल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च फंडचे चार वर्ष संचालक म्हणून काम केल्यानंतर नेस्बिट त्याचे संशोधन-संचालक म्हणून काम करत राहिले.
नेस्बिट यांनी मिशिगन विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच पोर्तो रिको आणि कोस्टा रिका येथील सरकारी कर्मचार्यांसाठी निवृत्तीवेतन निधी योजना यशस्वीरित्या विकसित करून दिल्या. मिशिगन राज्यातील अॅन आर्बरमध्ये नेस्बिट यांनी १८ वर्षे शहराच्या निवृत्तीवेतन मंडळावर काम केले. ते सल्लागार असतानाच्या काळांत, शहराचा निवृत्तीवेतन निधी १.५ कोटी अमेरिकन डॉलर्सवरून १८.२ कोटी डॉलर्सपेक्षाही अधिक झाला होता. शहरातील कामगारांना मिळणाऱ्या आरोग्य-लाभाच्या संदर्भांत नेस्बिट यांनी महत्त्वपूर्ण बदल करून ते कृतीत आणले. पुढे अमेरिकन सोसायटी ऑफ ॲक्च्युअरीजचे तज्ज्ञ म्हणून त्यांनी अमेरिकन सामाजिक सुरक्षितता प्रणालीचा विमागणिती अंगाने सखोल अभ्यास केला.
नेस्बिट यांनी १९७१ मध्ये मार्जोरी बुचरसह मॅथेमॅटिक्स ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट आणि १९८६मध्ये बावर्स, जर्बर, हिक्मन आणि जोन्स यांच्यासह ॲक्च्युअरीअल मॅथेमॅटिक्स ही पुस्तके लिहिली. यापैकी ॲक्च्युअरीअल मॅथेमॅटिक्स हे विमागणितातील सर्वोच्च प्रतीचे मानले जाणारे पुस्तक जगभर वापरले जाते.
४३ वर्षांच्या अध्यापन काळात, नेस्बिट यांचे उत्साही, प्रतिभाशाली प्राध्यापकत्व लाभलेल्या अनेकजणांनी विमा-उद्योग आणि विमागणित व्यवसायात महत्त्वाची पदे भूषवली. निवृत्तीनंतर, नेस्बिट यांनी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसह संशोधन चालू ठेवले. सामाजिक सुरक्षितता-कार्यक्रम म्हणून मुख्यत: वयोवृद्ध आणि अपंग यांच्यासाठी त्यांनी विशेष विमायोजना तयार केल्या. निवृत्तीनंतर प्रकाशित झालेल्या त्यांच्या शोधनिबंधांतून स्वीकृत वित्तव्यवस्थापन (अॅडॉप्टिव्ह फायनान्सिंग) आणि जोखीम सिद्धांत यांचे उपयोजन वार्षिकी आणि विम्यावर करणे, यांसारख्या अनेक वादग्रस्त प्रश्नांचा उहापोह आहे.
नेबिस्स्ट यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मिशिगन विद्यापीठाच्या अनेक पदवीधरांनी सेसिल जे. नेस्बिट चेअर इन ॲक्च्युअरीअल मॅथेमॅटिक्स अध्यासन निर्माण केले. मिशिगन विद्यापीठातर्फे त्यांना डिस्टींग्विश्ड फॅकल्टी गव्हर्नन्स अवॉर्ड हा प्रतिष्ठित विद्याशाखा पुरस्कार देण्यात आला. २००३ पासून या विद्यापीठाचा गणित विभाग सेसील जे. आणि एथेल एम नेस्बिट यांच्या संयुक्त नावाने विमागणिताला लक्षणीय योगदान देणाऱ्या तरुण संशोधकाला विमागणितीय प्राध्यापकत्व सन्मान देत आहे.
नेस्बिट यांनी आंतरराष्ट्रीय शांतता व न्याय परिषदेवरही (International Council for Peace and Justice) काम केले.
संदर्भ :
- https://de.zxc.wiki/wiki/Cecil_J._Nesbitt
- http://www.self.gutenberg.org/articles/eng/Cecil_J._Nesbitt
- http://faculty-history.dc.umich.edu/faculty/cecil-j-nesbitt/memorial
समीक्षक : विवेक पाटकर