ऑडी, रुगेरो फर्डिनान्डो अँटोनिओ गीसेपी व्हीन्सेन्झो : (२० जुलै १८६४ – २२ मार्च १९१३) रुगेरो ऑडी यांचा जन्म मध्य इटालीतील पेरुजिया भागात झाला. त्यांचे पूर्ण नाव रुगेरो फर्डिनान्डो अँटोनिओ गीसेपी व्हीन्सेन्झो ऑडी होते. ऑडी यांनी इटालीत पेरुजिया विद्यापीठात चार वर्षे, आणि बोलोग्न्या तसेच फ्लोरेन्स येथे प्रत्येकी एक वर्ष वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले व त्यांनी वैद्यक आणि शल्यशास्त्र विषयाची वैद्यकीय पदवी मिळाली.

प्रारंभी त्यांनी फ्लॉरेन्समधील इन्स्टिटयूट ऑफ फिजिऑलॉजीमध्ये संशोधक सहाय्यक म्हणून काम स्वीकारले. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिऑलॉजीचे संचालक लुसियानी त्यांचे मार्गदर्शक आणि वरिष्ठ होते. ऑडी यांना फ्रान्सच्या स्ट्रासबर्ग शहरात अभ्यास दौऱ्यानिमित्त जाण्याची संधी मिळाली. त्यांना तेथील एक्स्पेरिमेंटल फार्माकॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रासबर्गमध्ये काम करता आले. या कार्यकालात ऑडी यानी संयोजी ऊतींतून कॉन्ड्रिन सल्फेट हे संयुग वेगळे करण्यात यश मिळवले.

त्यांची इटालीच्या लिगुरीया प्रांतात, जेनोआ विद्यापीठात, शरीरक्रियाशास्त्र विभाग प्रमुख आणि संचालक म्हणून नेमणूक झाली. मानसिक आरोग्यविषयक समस्या आणि आर्थिक चणचणीमुळे त्यांना हे काम सोडावे लागले. त्यापुढे काही काळ ते काँगो या बेल्जियनची वसाहत असणाऱ्या देशात कार्यरत होते. दुर्दैवाने तेथे त्यांची आरोग्यविषयक समस्या अधिकच तीव्र झाली आणि पुढे काही भरीव काम करणे जमले नाही.

पेरुजिया विद्यापीठातील चौथ्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण चालू असताना, ऑडी, यकृतातून पित्तरस लहान आतड्यात कसा उतरतो याचा अभ्यास करत होते. त्यासाठी त्यांनी एका जिवंत कुत्र्यातील पित्ताशय (gall bladder) शस्त्रक्रिया करून काढून टाकले. असे केल्याने स्रवेल तेवढा पित्तरस सतत आतड्यात येत राहील. पचन क्रियेत पित्तरस काय भूमिका बजावतो हे कळेल अशी त्यांची योजना होती.

या अभ्यासातून ऑडी यांनी पित्तरस वाहक नलिकेच्या झडपेचा शोध लावला. यकृतात पित्तरस सतत स्रवतो. त्यातील बराच भाग पित्ताशयात साठवून ठेवला जातो. पित्तरस (bile) आणि स्वादुपिंडातून स्रवणारा स्वादुरस लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात म्हणजे आद्यांत्रात जेवणानंतर थोड्या वेळाने उतरतात. ही नलिका आद्यांत्रात जेथे उघडते तेथे एक गोल उंचवटा दिसतो. उंचवट्याच्या मध्यभागी एक वर्तुळाकार नलिकामुख दिसते. त्याभोवती अनैच्छिक स्नायुंचे एक गोल कडे दिसते. अशा बांगडीसारख्या वर्तुळाकार झडपेला समाकुंचनी स्नायू (sphincter) म्हणतात. या झडपेला कालांतराने ऑडी समाकुंचनी स्नायू असे नाव देण्यात आले. ज्या गोल उंचवट्यावर ऑडीचा समाकुंचनी स्नायू असतो त्याला व्हेटर तुंबिका (ampulla of Vater) हे नाव देण्यात आले.

काही रोगांत ऑडीच्या समाकुंचनी स्नायूचा दाह होतो याला ‘ऑडायटीस’ अशी शास्त्रीय संज्ञा ऑडी यांच्या नावावरून दिली आहे. ऑडी यांच्या प्रयोगात पित्ताशय काढलेल्या कुत्र्यात या स्नायूमागे स्वादु-पित्तरस नलिकेत पित्तरस साठला. त्यामुळे नलिका फुगली. पित्तरस साठतो याचा अर्थ ऑडीचा समाकुंचनी स्नायू आकुंचित स्थितीत असतो. तो शिथिल झाल्यावर  स्वादुरस आणि पित्तरस आंतड्यात येऊ शकतात. समाकुंचनी स्नायूमुळे स्वादुरस आणि पित्तरस आंतड्यात येणे नियंत्रित होते असा निष्कर्ष त्यांनी काढला.

ऑडी यांनी ‘आर्काईव्ह्ज इतालीनेस दे बायॉलॉजी’ (Archives Italiennes de Biologie) मध्ये असे नोंदून ठेवले की हा विशेष समाकुंचनी स्नायू असून आतड्याच्या भित्तिका स्नायूंवर त्याचे काम अवलंबून नसते. ऑडी यांनी समकुंचनी स्नायू किती क्षमतेने आकुंचित होतो याचे मापनही केले. त्यासाठी आवश्यक असे त्यांनी बनवलेले साधन सध्या या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाशी बरचसे मिळते जुळते होते.

ऑडी यांनी लिहिलेला ‘दी उना स्पेसियाल दिस्पोसीझिओन अ स्फिन्तेरे आलियो स्बोक्को देल कोलेडोको’ हा शोधनिबंध ॲनाली देल युनिव्हार्सिता लिबेरा दि पेरुजियामध्ये प्रकाशित झाला. बुलेतिनो देल सायन्झ मेडिके; आर्काईव्हो पर ले सायन्झ मेडिके; लो स्प्रेरिमेंताले बायॉलॉजिका; बुलेतिनो देल सायन्झ मेडिके; मॉनितोरे झूलॉजिकोसारख्या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांमध्येही त्यांचे अन्य लिखाण प्रकाशित झाले आहे. याशिवाय लुईजी बेलोनी या वैज्ञनिकाने ऑडी यांच्या संशोधनाविषयी विविध नियतकालिकामध्ये लिहिले आहे.

उत्तर आफ्रिकेतील ट्युनिशियामधील ट्युनिस शहरात ऑडी यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : नितीन अधापुरे