रोमिगएचजी. : (२३ जानेवारी १८९३ – १० डिसेंबर १९७६) रोमिग यांनी ओरेगॉन येथे उच्च विद्यालयात गणित व विज्ञान शिक्षक म्हणून आपल्या कार्याची सुरुवात केली. पुढल्याच वर्षी शिक्षक-अधिछात्र म्हणून अर्थाजनाची सोय करून त्यांनी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात भौतिक शास्त्रात द्विपदवीधर होण्यासाठी प्रवेश घेतला. बेल प्रयोगशाळेत रुजू होण्यापूर्वी ते सॅन जोस राज्य महाविद्यालयात गणित व भौतिकशास्त्र शिकवत होते. बेल प्रयोगशाळेत गुणवत्ता नियंत्रणासाठी शंभर टक्के तपासणीऐवजी स्वीकृती नमूना निवड (Acceptable Sample Selection), ही संकल्पना एच. एफ. डॉज यांच्यासह रोमिगनी प्रत्यक्षात आणली. दोघांनी मिळून ग्राहकांची तसेच उत्पादकाची जोखीम लक्षात घेऊन कसोटी क्षमता ही संकल्पना मांडली. गुणवत्ता नियंत्रणासाठी नमूना निवड ह्या विषयात रोमिग यांनी आधारसामग्रीचे गुणविशेष असा विचार न करता तिला चलांच्या स्वरूपात मांडून पहिली नमूना निवड योजना (Sampling Plan) तयार केली. डॉज व रोमिग ह्या दोघांनी मिळून द्विनमूना निवड योजनाही बनवली, ज्यामुळे नमूना सरासरी संख्या कमी होईल. जेव्हा नमुन्यात सदोष वस्तू अधिक प्रमाणात येतात तेव्हा परिशोधन (rectifying inspection) नमूना निवड करण्यासाठीची योजना देखील या दोघांनी मांडली व ती Bell System Technical Journal मध्ये डॉज व रोमिग यांनी तयार केलेली नमूना निवडीची सारणी प्रसिद्ध झाली.

परिशोधन नमूना निवड संदर्भात रोमिग यांनी गुणवत्तेसंदर्भात वेगेवगळ्या संकल्पना रूढ केल्या. उदा., प्रचालन लक्षण वक्र (Operating Characteristic Curve (OC), स्वीकार्य गुणवत्ता पातळी (Acceptable Quality Level), सरासरी बहिर्गामी गुणवत्ता सीमा (Average Outgoing Quality Limit) आणि स्वीकार्य गठ्ठा दोष टक्केवारी (स्वीगट) (Lot tolerance percentage defective). स्वीगटाने नमूना निवड योजनेमुळे कशाप्रकारचे संरक्षण मिळेल हे समजू शकते, पण योजनेमुळे कोणती गुणवत्ता स्वीकारली जाईल हे स्वीकार्य गुणवत्ता पातळीवरूनच समजू शकते. स्वीगट ही संख्याशास्त्रीय गुणवत्ता नियंत्रणामधील महत्त्वाची संकल्पना आहे. दुसऱ्या महायुद्ध काळात दारुगोळा वा बंदुकीच्या गोळ्यांची गुणवत्ता तपासतांना ती प्रत्यक्ष वापरली गेली. स्वीगट ही ग्राहक कमाल दुर्लक्षित करू शकेल अशी गुणवत्ता असते. ती स्वीगुपाच्या विरुद्ध असते. स्वीगुपा ही कमाल वेळा स्वीकारली जाणारी गुणवत्ता पातळी असते.

डॉज व रोमिग यांनी सरासरी बहिर्गामी गुणवत्ता सीमा आणि स्वीकार्य गठ्ठा दोष टक्केवारी यासाठी वेगवेगळ्या नमूना निवडसारणी प्रसिद्ध केल्या आणि प्रत्येकासाठी प्रचालन लक्षण वक्र सूत्रही दिले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात MIL-STD-105D या लष्करासाठी असलेल्या नमूना निवड योजनेसाठी मूळ गणन करणाऱ्या बेल प्रयोगशाळेतील समूहाचे नेतृत्व केले. गुणवत्तेच्या क्षेत्रातील अनेक योजनांवर काम करतानाच रोमिग ह्यांनी कोलंबिया विद्यापीठातून औद्योगिक अभियांत्रिकी विषयात पीएच्.डी. पदवी मिळवली.

दुसऱ्या महायुद्धानंतर नाटो (NATO) या संघटनेने रोमिग यांना पॅरिस येथे यूरोपातील १६५ प्रमुख अभियंतांना गुणवत्ता नियंत्रण संदर्भात प्रशिक्षण देण्याचे काम सोपवले.

रोमिग यांनी विपुल लेखन केले. त्यात चार पुस्तके आणि शंभराहून अधिक शोधनिबंधांचा समावेश आहे.

बेल प्रयोगशाळा सोडून रोमिग हे ह्युजेस विमान कंपनीत तांत्रिक संचालक झाले. पुढे इंटरनॅशनल टेलीमीटर या कंपनीत गुणवत्ता अभियांत्रिकी संचालक म्हणून रुजू झाले. गुणवत्ता नियंत्रण क्षेत्रात उच्च दर्जाचे तांत्रिक नेतृत्व करण्यासाठी रोमिग यांना अमेरिकन गुणवत्ता संस्थेचे अतिशय मानाचे असे शेव्हर्ट पदक प्रदान करण्यात आले.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर