वूड्स, वानेसा : (१९७७ – ) वानेसा वूड्स यांच्या बालपणी कुटुंबात वांशिक भेदामुळे तीव्र कलह होत असे. बालपणीच्या त्यांच्या आठवणी कडवट आहेत. त्यामुळे वानेसा त्यांच्या बालपणाबद्दल बोलत नाहीत. परिणामी त्यांच्या बालपणाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी विज्ञान प्रसार या विषयात एम.एस्सी. ही पदव्युत्तर पदवी मिळविली.

विज्ञान लेखक, पत्रकार, प्राणी वर्तनशास्त्रज्ञ असणाऱ्या वानेसा यांची जन्मभूमी ऑस्ट्रेलिया आहे. परंतु त्यांचे बरेचसे महत्त्वाचे काम आफ्रिकेत, विशेषत: रिपब्लिक ऑफ द काँगो आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो (सध्याच्या झायर) या देशांत झाले आहे. तेथील प्रकल्प त्यांनी मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्हॉल्युशनरी अँथ्रपॉलॉजी या संस्थेत कार्यरत असताना केला. बोनोबो, चिंपँझी आणि मानव यांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास करण्यास त्यांना मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधून योग्य सहकारीही मिळाले. डिस्कवरी या दूरचित्र वाहिनीसाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशांतील वन्यजीवनाविषयी त्या स्वतंत्रपणे सदरे लिहीत असतात. तसेच त्यासंबंधी चित्रण करून तीही दूरचित्र वाहिन्यांना पुरवीत असतात. बीबीसी वाइल्ड लाईफ, नॅशनल जिओग्राफिक (ऑस्ट्रेलिया) यांच्यासाठीही शक्य तेव्हा लिहित असतात. न्यू सायंटिस्ट, लाइव्ह सायन्स यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकातही त्यांचे लिखाण प्रकाशित होत असते.

बोनोबो (Pan paniscus) या एक प्रकारच्या चिम्पान्झींसारख्या हुशार आणि संवेदनशील प्राण्यांच्या आणि चिंपँझींच्या (Pan troglodytes) तुलनात्मक  अभ्यासासाठी वानेसा जगप्रसिद्ध  आहेत. पूर्वी बोनोबो यांना छोटे चिंपँझी (pigmy Chimpanzee) म्हणत असत. नंतर लक्षात आले की ते एका वेगळ्या जातीत मोडतात. वानेसा यांनी आपल्या निरिक्षणातून बोनोबो आणि चिंपँझींतील शारीरिक फरक स्पष्ट केला आहे. बोनोबो चणीने चिंपँझींपेक्षा थोडेसे लहान असतात, विशेषतः माद्यांमध्ये हा फरक प्रकर्षाने दिसतो. बोनोबोंचा चेहरा अधिक गडद असतो. ओठ जास्त लाल असतात. बोनोबोंचे केस अधिक लांब असतात. तसेच बोनोबोंच्या कपाळमध्यावरचे केस मध्यभागी भांग पाडल्या सारखे दिसतात. चिंपँझीत तसे दिसत नाहीत. चिंपँझींच्या आवाजापेक्षा बोनोबोंचा आवाज उच्च कंप्रतेचा (frequency) असतो. बोनोबोंचे हातपाय चिंपँझींच्या हातापायांपेक्षा सडपातळ आणि नाजूक असतात.

कॉस्टारिका या लॅटिन अमेरिकन देशात जंगलात फिरून संशोधन करीत असताना त्यांच्यावर एका घातक प्रकारच्या (killer bees) मधमाश्यांनी हल्ला केला. अंगभर दंश आणि डोळ्यांना इजा झाली. या प्रसंगातून त्यांना अशा मधमाश्यांवर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. जपानमधील क्योटो येथील वास्तव्यात त्यांनी चेरीच्या बहरावर अभ्यासपूर्ण आणि सविस्तर लिखाण करून आपले अनुभव लोकाना उपलब्ध करून दिले.

परंतु हे त्यांच्या दृष्टीने विषयांतर आहे. त्यांचा अभ्यास करण्याचा मुख्य विषय प्रायमेटसपैकी बोनोबो, चिंपँझी आणि मानव हे प्राणी.  बोनोबो आणि चिंपँझी या दोन जातींच्या प्राण्यांच्या, आपापल्या गटांत सहकार्य करून राहण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांत, वानेसा आघाडीवर आहेत. सिडनीतील प्राणी संग्रहालयात स्वयंसेविका म्हणून काम करत असताना डेबी कॉक्स या सेवाभावी काम करणाऱ्या संशोधक कार्यकर्त्या महिलेशी वानेसा यांचा परिचय झाला. पुढे त्यांची मैत्री झाली. युगांडात चिंपँझींचा संहार होत होता. जगभर सुजाण नागरिकांत त्याबद्दल चिंता व्यक्त होत होती. परंतु या समस्येचा अभ्यास झाला नव्हता. युगांडात एकूण किती चिंपँझी आहेत ही अगदी प्राथमिक गोष्ट देखील माहीत नव्हती. म्हणून डेबी यांनी, चिंपँझींच्या जनगणनेसाठी मदत करण्यास वानेसा यांना युगांडात येण्याचे आमंत्रण दिले. त्याचा मान ठेवून त्या युगांडातील चिंपँझींसाठी असलेल्या एनगाम्बा आयलंड या अभयारण्यात वानेसा पोचल्या. ही जागा म्हणजे इकोलो या बोनोबो – बोनोबोंचे जग आहे. या अभयारण्यात डेबी कॉक्स या एक अनाथालय चालवितात. हे अनाथालय ज्यांचे आईबाप माणसांनी क्रूरपणे ठार मारले आहेत अशा चिंपँझींच्या पिल्लांसाठी होते. त्यांच्या लोला या बोनोबो या संस्थेत सध्या साठ अनाथ बोनोबोंच्या आणि चिंपँझींच्या पिल्लांची काळजी घेतली जाते. या पिल्लांची जोपासना केली जाते. त्यांना सर्वतोपरी मदत करून वाढवणे आणि शक्य झाल्यास वनात त्यांचे पुनर्वसन करणे असे प्रयत्न लोला या बोनोबो  करत असे.

लोला या बोनोबो मध्येच वानेसा आणि मानववंश शास्त्रज्ञ, प्राध्यापक ब्रायन हेअर यांची प्रथम भेट झाली. वानेसा यांना बोनोबो संगोपनाचा काही अनुभव नव्हता. पण डेबी यांनी सोपवलेल्या बालुकू या दोन वर्षाच्या, डोळ्यादेखत आपल्या आईची हत्या पाहिलेल्या बोनोबो पिल्लाने त्यांना गळामिठी मारली आणि वानेसा यांना बोनोबो या विषयाने जणू झपाटून टाकले.  डेबीप्रमाणेच वानेसा यांनीही चिंपँझी आणि बोनोबोंचा अभ्यास आणि संवर्धन हे आपले जीवनकार्य बनवले.

लोला या बोनोबोतील कार्यकर्ते विशेषतः महिला स्वतःच्या बाळांप्रमाणे या पिलांची काळजी घेतात. या प्रेमळ व दक्ष महिलांच्या अंगाखांद्यावर ही पिल्ले बागडत असतात. अंधश्रद्धेपोटी अनेक बोनोबोंनी स्वतःची बोटे गमावली आहेत. आपल्या डोळ्यादेखत आई–मावश्या यांना मारून टाकणे असे भयानक शारीरिक, मानसिक अत्याचार पाहिले आहेत. अशा पिल्लांची मने विदीर्ण झालेली असतात. अशा बोनोबो आणि चिंपँझींच्या पिल्लांची लोला या बोनोबोच्या सेविका स्वतःच्या बाळांप्रमाणे काळजी घेतात. कळपाच्या मूळ प्रवाहात सामील व्हायला त्यांना मदत करतात. सुदैवाने संस्थेच्या जवळच सुमारे पंच्चाहत्तर एकर जागेत जंगल आहे. त्याचा थोड्या मोठ्या पिल्लांना दिवसभर खेळण्यासाठी उपयोग होतो.

बोनोबोंच्या पिल्लांची बोटे तोडू नका. ही जाणीव आफ्रिकन जंगलातील गरीबांना करून द्यावी लागते. त्याच वेळी वनवासी जनतेला दारिद्र्यावर मात करण्यासाठी रोजगार निर्माण करणेदेखील महत्त्वाचे ठरते. बोनोबोंच्या जातीला विलोपनाचे भय आहे. ती वाचविणे आपल्या सर्वांच्या हातात आहे.

वानेसा आणि त्यांचे पती ब्रायन वेगवेगळे खेळ योजून बोनोबो त्यांच्या पुढील समस्या कशा सोडवतात हे जाणून घेतात. वानेसा आणि सहकाऱ्यांनी असेही निरीक्षण नोंदून ठेवले, की नर बोनोबो मादी बोनोबोंपेक्षा शरीराने मोठे आणि ताकदवान असतात. पण एखाद्या नराने एखाद्या मादीशी मुद्दाम दुष्टपणा करायला सुरुवात केली तर चार पाच माद्या गटाने त्याच्यावर चालून जातात आणि त्याला जन्माची अद्दल घडवतात. चिंपँझींप्रमाणे बोनोबो हिंस्त्र नसतात. बोनोबोंच्या कळपांमध्ये स्त्रीसत्ताक तर चिंपँझींच्या कळपांमध्ये नरसत्ताक समाजव्यवस्था दिसते. चिंपँझींच्या कळपांमध्ये अंतर्गत तसेच अन्य कळपांबरोबरचे संघर्ष शरीरबळावर, हिंसाचार करून प्रसंगी काही चिंपँझींना क्वचित त्यांच्या पिल्ल्लाना ठार मारूनही सोडवले जातात.  बोनोबोंच्या कळपांमध्ये लैंगिक व्यवहार करून समस्या शांततेने सोडवल्या जातात.

वानेसा आणि ब्रायन यांच्या मते बोनोबोंतील वर्तनाचा, त्यातील फरकांचा अधिक सखोल आणि मोठ्या प्रमाणात अभ्यास होणे गरजेचे आहे. वानेसा आणि ब्रायन यांनी बोनोबो आणि चिंपँझींच्या निरीक्षणातून पूर्णतः नवे काही मुद्दे उत्क्रांतीशास्त्रज्ञांपुढे आणि मानसशास्त्रज्ञांपुढे  आव्हान म्हणून उभे केले आहेत.

सध्या वानेसा नॉर्थ कॅरोलायना येथे ड्यूक विद्यापीठात मानव उत्क्रांती वंशशास्त्र विभागात  संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्या लवकरच स्वतंत्रपणे बोनोबो आणि आणि चिंपँझींच्या मानसशास्त्रीय जडणघडणीबाबत, वागणुकीबाबत प्रयोग करतील व मानवजातीला नवनवी माहिती मिळवून देतील अशी आशा आहे.

वानेसा यांनी मुलांसाठी तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी इट्स ट्रू! स्पेस टर्नस यू इन्टू स्पॅघेटी या पुस्तकाला द रॉयल सोसायटी ऑफ युनायटेड किंग्डमतर्फे अक्लेम्ड बुक अॅवार्ड देण्यात आला आहे. वानेसा यांनी प्रौढांसाठी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके म्हणजे: बोनोबो हॅन्डशेक: अ मेमॉयर ऑफ लव्ह अँड अॅडव्हेंचर इन द काँगो (या पुस्तकाला लॉवेल थॉमस पुरस्कार मिळाला आहे) आणि इट्स एव्हरी मंकी फॉर देमसेल्व्हज: ए ट्रू स्टोरी ऑफ सेक्स, लव्ह अँड लाईज इन द जंगल. वानेसा यांना पत्रकारितेसाठीचे ऑस्ट्रेलियन सायन्स पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

वानेसा यांना इजी सभेचे निमंत्रण मिळाले. इजी सभा हा वार्षिक मेळावा विज्ञान, अभियांत्रिकी,कला, संगीत अशा विविध क्षेत्रात नवसृजन करण्यात रस घेणाऱ्या, चाकोरी बाहेरचे मार्ग चोखाळणाऱ्या लोकांसाठी असतो. अशा सभेत वानेसा यांनी दिलेल्या व्याख्यानामुळे  वन्यजीवनाबद्दलचे स्वानुभवाधारित ज्ञान मिळवणे किती कष्टाचे असते याची श्रोत्यांना जाणीव झाली.

बोनोबोंवरील निरिक्षणातून प्रेम करा, युद्ध नको असे धोरण बोनोबो ठेवत असावे असे वानेसा यांना वाटते. जगात सर्वात जास्त मित्रत्वाने वागणारेच जगात टिकाव धरतील हे तत्त्व वानेसा यांना बोनोबोंच्या वागणुकीतून स्पष्ट होते असे वाटते. बोनोबो आणि चिंपँझी या दोन्ही जातींच्या जिनोमचे मानवी जिनोमशी ९८.७ टक्के साधर्म्य आहे. परंतु चिंपँझी प्रसंगी हिंस्त्र होतात, तर बोनोबो कायम शांत राहतात. असा फरक का, बोनोबोंप्रमाणे चिंपँझींना आणि माणसांनाही  शांतपणे जगण्यास प्रवृत्त करता येईल का? अशा प्रश्नांच्या उत्तरात मानवी स्वभाव समजून घेण्याचे रहस्य दडलेले आहे. त्यासाठी बोनोबोंवर अधिक संशोधन व्हायला हवे.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा