राइट, एलीझूर :  (१२ फेब्रुवारी १८०४ – २२ नोव्हेंबर १८८५) अमेरिकत साउथ कॅनन, कनेटिकट येथे जन्मलेले राइट वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या पालकांसमवेत टॉलमज, ओहायो येथे गेले. तेथे स्थानिक शाळेत शिकल्यानंतर येल विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला आणि पदवीधर झाले. नंतर ते ओहयो येथील वेस्टर्न रिझर्व महाविद्यालय येथे गणित व विज्ञान विषयांचे अध्यापन करू लागले.

विमा व्यवसायातील फसवणूक आणि भ्रष्टाचार यांच्याकडे राइट यांचे लक्ष गेले. त्यांनी त्याविरुद्ध लेख लिहून विमाधारकाला आवश्यकता असेल तर, सोडमूल्य (surrender value) मिळाले पाहिजे याचा पाठपुरावा केला. यासाठी विमा कंपन्यांनी पुरेसा निधी ठेवला पाहिजे व सोडमूल्य दिले पाहिजे यासाठी मोहीम चालवली. राइट यांनी कंपन्यांच्या राखीव निधीसाठी तसेच संविधिक भांडवलासाठी गणितीय सूत्र शोधले. आयुर्विमा कंपन्यांनी राइट यांनी सुचवलेल्या सुधारणा स्वीकारल्या.

राइट यांनी मृत्यू सारणी (mortality tables) तयार केल्या. या सारणी एका शतकाहून अधिक काळ वापरल्या जात होत्या. यामुळे एखादी व्यक्ति त्याच्या वयाच्या विशिष्ट काल चौकटीत मृत्यू पावेल यांची संभाव्यता काढणे शक्य झाले. या मृत्यू सारणी त्यांनी वय, वजन, लिंग आणि धूम्रपानाची सवय इत्यादी अनेक चले लक्षात घेऊन तयार केल्या. सामान्यत: मृत्यू सारणीनुसार विशिष्ट काल अंतराळात एखादी व्यक्ति मृत्यू पावण्याची शक्यता जितकी जास्त तेवढा विम्याचा हप्ताही जास्त. राइट यांनी आठ वर्षे मॅसॅच्युसेट्स राज्याचे विमा कमिशनर म्हणून काम पाहिले.

राइट यांनी विविध बाबींसाठी पॉलिसीच्या किमती काढण्यासाठी एक नवे संचय सूत्र (accumulation formula) शोधले. त्यासंबंधीचे आकडेमोडीचे काम वेगाने करण्यासाठी अरिथमीटर (Arithmeter) नावाचे गुणाकार, भागाकार करण्याचे यंत्र शोधले. या यंत्राचा आधार हा लॉगरिथमिय तत्त्वावर असून ते चिती गणक सरकपट्टीप्रमाणे होते (a form of cylindrical slide rule). त्याचे त्यांनी पेटंट घेतले आणि तशी सुमारे २० यंत्रे तयार केली.

राइट यांना अभियांत्रिकी संशोधनातही रुची होती. रेलरोड टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी दाते बनविण्याचे यंत्र, पाण्याची तोटी आणि नळ जोडणीतील सुधारित युगमन यांची निर्मिती केली.

अरिथमीटर (Arithmeter)

आयुर्विम्याबाबत ते म्हणत, ‘एका जीवाच्या आयुष्याइतके दुसरे काहीच अनिश्चित नाही आणि हजारो जीवांच्या सरासरी आयुष्याइतक काहीच निश्चित नाही.’ गणिताबरोबरच त्यांचे गुलामगिरी निर्मूलनाच्या कामात मोठे योगदान आहे, म्हणून विमागणितज्ञाबरोबरच ते निर्मूलक (abolitionist) म्हणूनही ओळखले जातात.

राइट यांनी सेव्हींग बँक आयुर्विमा सारणी उदाहरणांसहीत तयार केली. आयुर्विम्यातील राजकारण व गूढ गोष्टी यावर लेखन केले. अन्य क्षेत्रातील त्यांचे लेखन म्हणजे राइट यांनी व्हिटीयर यांच्या ‘Whittier’s Ballads, and other Poems’ व ‘verse of La Fontaine’s Fables’ यांच्या परिकथा यांचे भाषांतर प्रसिद्ध केले. आणखी एक म्हणजे गुलामगिरी निर्मूलनाबाबतच्या नोंदीत भर म्हणून मयरोन हॉले आणि त्यांनी स्वातंत्र्य व खरा धर्म याबाबत काय केले, याविषयी लेखन केले.

विमागणितज्ञ राइट यांचे अमेरिकेत विमा क्षेत्रातील काम आणि त्याचबरोबर सामाजिक उत्थान आणि साहित्य यातील योगदान उपयुक्त ठरले.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर