हुक्स, बेल (hooks, bell) : (२५ सप्टेंबर १९५२ – १५ डिसेंबर २०२१). प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या, अभ्यासक आणि संशोधक. काळ्या स्त्रीवादाच्या मांडणीत आणि विकासात बेल यांचा फार मोठा सहभाग राहिला आहे. बेल यांचा जन्म हॉपकिंसविले येथे एका कष्टकरी कामगार अमेरिकन-आफ्रिकन कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव रोझा बेल वेटकिन्स आणि वडिलांचे वेओडिस वेटकिन्स होते. सहा अपत्यांपैकी त्या एक होत्या. बेल यांचे मूळ नाव ग्लोरिया जीन वेटकिन्स हे असून त्या बेल हुक्स या नावानेच ओळखल्या जातात. बेल हे त्यांच्या आईच्या आईचे म्हणजेच आजीचे नाव होते. स्त्रियांच्या वारश्याला अधोरेखित करून त्याचा सन्मान व्यक्त करण्यासाठी त्यांनी याच नावाने पुढे लेखन आणि कार्य केले. त्यांचे वडील हे रखवालदारीचे/चौकीदारीचे काम करीत, तर आई गौरवर्णीय कुटुंबांमध्ये मोलकरणीचे काम करीत असे.

अमेरिकेतील केंच्युकी शहरात वांशिक भेदभावातून तयार करण्यात आलेली हॉपकिंसविले ही काळ्या लोकांसाठी निर्माण करण्यात आलेली एक वेगळी वसाहत होती. याच ठिकाणी वांशिक भेदभावामुळे काळ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या वेगळ्या स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये बेल यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वांशिक भेदभाव नसणाऱ्या हॉपकिंसविले माध्यमिक शाळेतून त्यांनी पुढील शालेय शिक्षणपूर्ण केले; मात्र त्या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी प्रामुख्याने गौरवर्णीयच होते. अशा ठिकाणी शिक्षण घेताना त्यांना वांशिक भेदभावाचे अनुभवदेखील आले. त्यांनी १९७३ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठामधून इंग्रजी विषयात बी. ए. ही पदवी प्राप्त केली. पुढे १९७६ मध्ये विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम. ए. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी लॉस एंजेल्स येथील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया येथे इंग्रजी आणि एथनिक स्टडीज या विषयांत अध्यापनाचे कार्य केले. अध्यापन करीत असतानाच त्यांनी याच विद्यापीठातून १९८३ मध्ये ‘कीपिंग अ होल्ड ऑन लाईफ : रीडिंग टोनी मॉरिसन्स फिक्शन’ या विषयावर पीएच. डी.चे संशोधन कार्य पूर्ण केले. ऐंशीच्या दशकात येल युनिव्हर्सिटी येथे आफ्रिकन अँड आफ्रो-अमेरिकन स्टडीजचे अध्यापन केले. पुढे त्यांनी काही अन्य संस्थामध्ये वुमेन्स स्टडीज आणि इंग्लिशचे अध्यापन केले.

बेल यांनी स्त्रियांच्या दास्यत्वाची, त्यांच्या शोषणाची चिकित्सा केली. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने वर्ग, वंश, पितृसत्ता यांसारख्या भेदभावाच्या विविध रचनांमध्ये असणाऱ्या आतंरसंबंधाची मांडणी केली. त्यातील अंतर्विरोध आणि परस्परसंबंध तपासणार्‍या इंटरसेक्शनल फेमिनिस्ट म्हणून त्या सर्वत्र परिचित आहेत. बेल यांनी समाजातील विविध विषयांची, घटकांची आणि त्यांच्यातील आंतरसंबंधाची चिकित्सा केली. ती शोषितांच्या मुक्तिदायी राजकीय व्यवहारात उपयोगाची आहे. बेल यांनी लिंगभेद, काळ्या गुलाम स्त्रियांचे अनुभव, काळ्या स्त्रीत्वाची न संपणारी कुचेष्टा, पितृसत्तात्मक साम्राज्यवाद यांविषयी अनेक लेखन केले. त्यांनी वंशवाद व स्त्रीवादाच्या निमित्ताने काळ्या स्त्रिया आणि स्त्रीवाद यांविषयी विचार मांडलेत. स्त्रीवाद्यांचा नागरी अधिकारासाठीचा व मतदानासाठीचा लढा यांविषयावर मांडणी करण्यासोबतच वंश आणि लिंगभेदाचा काळ्या स्त्रियांवर होणारा परिणाम यांची सविस्तर चर्चा केली. गोऱ्या आणि काळ्या पुरुषांबरोबरच गोऱ्या स्त्रियांद्वारे काळ्या स्त्रियांवर शोषण होते, हे त्यांनी मांडले आहे. तसेच त्यांनी लिंगभेदावर बोलताना मध्यमवर्गीय गोऱ्या स्त्रीवाद्यांकडून वंश आणि वर्गाचा मुद्दा कसा दुर्लक्षित केला जातो, हे दर्शविले आहे. वंशभेद व लिंगभेदाविरुद्धची लढाई सुटी-सुटी लढता येणार नाही. शिवाय या लढाईत इतरांच्या चिकित्सेसह आत्मटीकेलाही महत्त्व देणे गरजेचे ठरते, असे त्यांचे मत होते.

बेल यांनी मार्जिन म्हणजेच ‘परीघा’चा अर्थ स्पष्ट केला आहे. संपूर्ण देशाचा भाग असूनही मुख्य प्रवाहातून ‘बाहेरचे’ असणे म्हणजे मार्जिनवर असणे होय. प्रस्थापित स्त्रीवादी सिद्धांकनाच्या संदर्भात केंद्र आणि परिघाचा विचार करताना केंद्रस्थानी असणाऱ्या स्त्रियांनीच बऱ्यापैकी सत्तेचे लाभ घेत स्त्रीवादी सिद्धांकन केले आहे. अशा स्त्रीवादी सिद्धांकनात परीघावर राहणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या जीवनवास्तवाची मांडणी अभावानेच आढळते. स्त्रीवादाचा परिवर्तनवादी व क्रांतिकारक प्रभाव समाजावर पडला पाहिजे, असे जर आपल्याला वाटत असेल, तर स्त्रीवाद ही जनसामन्यांची राजकीय चळवळ म्हणून आकार पावली पाहिजे. लैंगिक दमनचक्रातून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी आणि मुक्तीच्या विविध संघर्षांमध्ये पुन्हा नव्याने क्रांतिकारक तत्त्व आणण्यासाठी स्त्रीवादी चळवळ अत्यावश्यक आहे.

बेल यांनी स्त्रियांमधील भगिनीभावावर सखोल विवेचन केले आहे. वंश आणि वर्गावर आधारलेले स्त्रियांचे सामाजिक वास्तव लक्षात घेऊन भगिनीभावाचा अर्थ तपासून पाहिला पाहिजे, असे त्यांना वाटते. भगिनीभाव म्हणजे केवळ एकमेकींना आधार देणे इतका संकुचित अर्थ त्यांना मान्य नाही. स्त्रियांमधील भगिनीभाव विकसित होण्यासाठी स्त्रियांनी पुरुषी वर्चस्व टिकवणार्‍या मूल्यांच्या प्रभावातून मुक्त झाले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. ‘लिंगभेदाविरुद्ध समान जाणिवा असणार्‍या स्त्रियांचे राजकीय ऐक्य म्हणजे भगिनिभाव’ असे ते म्हणतात. पुरुषांकडे त्यांनी संघर्षलढ्यातील ‘कॉम्रेड्स’ म्हणून बघितले आहे. सामाजिक संबंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘सत्ता’ या घटकाबद्दलही त्यांनी विवेचन केले आहे. स्त्रीवाद्यांनी सत्तेच्या संदर्भात केलेल्या कार्याचे विविध पैलू त्यांच्या लेखनातून मांडले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात स्त्रीवाद्यांनी एकाच वेळी स्त्रियांच्या सत्तावंचिततेबद्दल मांडणी करून त्यांच्या समान अधिकारांसाठी आवाज उठवला. जहाल स्त्रीवाद्यांनी सत्तेच्या प्रचलित आशयाला छेद देत त्याचा अर्थ बदलण्यासाठी प्रयत्न केले. स्त्रियांचे श्रम, स्त्रीशिक्षण, स्त्रियांविरुद्ध हिंसा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकर्षाने मांडणी केली आहे. तसेच स्त्रीवादी चळवळ, क्रांतिकारक पालकत्व, स्त्रीवादी क्रांती इत्यादी महत्त्वाच्या विषयांवरदेखील त्यांनी आपले मत मांडले आहे.

बेल यांना आयुष्याच्या प्रवासात अनेक नागरिक हरवलेले आणि दिशा भटकलेले भेटले. त्यादृष्टीने त्यांनी शांततापूर्ण आणि शाश्वत आयुष्य जगणे म्हणजे फक्त जगातील संसाधनांचा योग्य वापर करणे इतकेच नसून आयुष्याच्या अर्थाची निर्मिती करणे हाही आहे, असे ते मानतात. त्यांनी वंश, वर्ग आणि लिंगभेदावर बोलताना ओळख, अस्तित्व, जमिनीची मालकी आणि सामाजिक-भौगोलिक अलगीकरणावरही बोलण्याची आवश्यकता स्पष्ट केली आहे. त्यांनी साम्राज्यवादी-वर्चस्ववादी-भांडवली गोऱ्या पितृसत्तेचे परीक्षण करत व्यवस्थेत या सर्वांचा परिणाम माणसांच्या सभासदत्वावर कसा होतो, याचे विविध संदर्भ स्पष्ट केले आहे.

बेल यांनी काळेपणा, काळी व्यक्तीकल्पना आणि गोरेपणा यांच्या विषयी असणाऱ्या तथाकथित मांडणीचे परीक्षण केले. तसेच यांकडे बघण्याच्या पर्यायी मार्गांची आवश्यकता नोंदवली आहे. साहित्य, चित्रपट, कला इत्यादी माध्यमांमधून काळ्या लोकांकडे व काळेपणाकडे बघण्याच्या प्रचलित दृष्टीकोनांची चिकित्सा त्यांनी केली आहे. वंश आणि प्रतिनिधित्वाविषयी बोलण्यासाठीचा प्रतिवाद तयार करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

आपली आंतरिक झीज भरून काढण्यासाठी प्रत्येकाला व्यक्त होणे गरजेचे आहे, असे बेल म्हणतात. केवळ शांत राहण्यातून काहीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच कदाचित जिवंत राहण्यासाठी कधी आपण  अस्तित्वातच नव्हतो किमान हे आठवून तरी आपण बोललं पाहिजे. लिंगभेद आणि वंशभेदामुळे काळ्या स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्यावर फार मोठा परिणाम झाला आहे. स्वतःचे विखुरलेपण जोडताना आणि राजकीय प्रतिकार करताना स्वजाणीव आणि सामूहिक संघर्ष यांचा दुवा जोडून ठेवावा, यांवर त्यांनी भाष्य केले आहे. समानतेवर आधारित बाह्य जग निर्माण करताना स्वतःच्या आतील जग जोडून ठेवण्यासाठी काळ्या भगिनींना त्यांनी अनेक उपाय सांगितले आहेत.

बेल यांच्या मते, ‘प्रेम जर कळले नाही, तर जगण्याला काही अर्थ उरणार नाही, हे मला अगदी बालपणापासून स्पष्ट होते’. आपल्या जीवनात व संस्कृतीत प्रेमाचे स्थान काय असावे, याविषयी सार्वजनिक चर्चाविश्वात व सार्वजनिक धोरणांमध्ये अभाव आढळून येतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रेमाच्या देवाणघेवाणीतील अपयशाचा संबंध बालपणात तयार झालेल्या धारणांशी असतो. प्रेमाविषयीची शिकवण आपल्याला लहानपणी घरातून मिळत असते. मग ते घर आनंदी असो वा दुःखी, सुरळीत चाललेले असो वा विस्कळीत अशा घरातूनच प्रेमाविषयीच्या धारणा आकार पावतात. ज्या घरांमध्ये कुठलेही आढेवेढे न घेता लहान मुलांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातात, अशा मुलांना प्रेमाचा फारच मर्यादित अर्थ कळत असतो. प्रेम म्हणजे फक्त एक चांगली भावना इतकेच त्यांना कळते. आपल्या गरजा पूर्ण होणे म्हणजे प्रेम असे ते समजतात; मात्र  प्रेम इतरांना द्यायचेही असते, हे अशा मुलांना कळत नाही. लहान मुलांची वाढ करण्याच्या पद्धतीवर हुक्स यांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली.

बेल यांनी स्त्री-पुरुषांच्या नात्यातील प्रमाणिकतेवरही प्रकाश टाकला आहे. प्रायव्हसीमुळे नाती घट्ट होतात; पण सिक्रसी किंवा गोष्टी एकमेकांपासून लपविण्यामुळे नात्यातील विश्वास तुटू शकतो, असे मौलिक निरीक्षण त्यांनी मांडले आहे. खोटेपणाला मोठ्या प्रमाणावर असलेल्या सांस्कृतिक मान्यतेमुळेसुद्धा आपल्यापैकी अनेकांना प्रेमाचा अर्थ कळू शकत नाही. व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात ‘प्रेम’ या संकल्पनेकडे बघण्याचे नवे परिवर्तनवादी मार्ग त्यांनी सांगितले आहेत. प्रेमाचा विचार न्याय आणि संस्कृतीच्या संदर्भात केला. पितृसत्ताक समाजात न्याय आणि संस्कृतीविषयीच्या प्रस्थापित धारणांमुळे प्रेम भावनेची होणारी कोंडी त्यांनी दर्शविली आहे. यातून निर्माण होणारे अंतर्विरोध अधोरेखित करून पर्यायी शक्यतांचा वेध घेतला आहे. स्वत:च्या अनुभवासह, सामाजिक निरीक्षणाचा भाग त्यात असल्यामुळे प्रेमाविषयीची त्यांची मते अधिक सर्वसमावेशक बनली आहेत. आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात सहृदयता, शांतता आणण्यासाठी स्वतःवरील प्रेमाचा पुनर्विचार करण्याची चालना त्यांनी स्पष्ट केली.

बेल यांनी ‘स्त्रीवाद ही लिंगभेद, लिंगाधारित शोषण-दमन थांबविण्यासाठीची चळवळ आहे’ अशी स्त्रीवादाची व्याख्या केली आहे. स्त्रीवादी चळवळ ही पुरुषांच्या विरोधात नसून लिंगभेदाच्या विरोधात आहे, हेही त्या प्रकर्षाने स्पष्ट करतात. ‘स्त्रीवादी जन्मत नाहीत, तर घडवल्या जातात’. क्रांतिकारी स्त्रीवादी जाणिवा घडवताना पितृसत्ता ही एक वर्चस्ववादी व्यवस्था असून तिचे संस्थांनीकरण व जतन कशा पद्धतीने झाले आहे, हे समजून घेण्यावर भर देणे त्या आवश्यक मानतात. चिकित्सक जाणीव निर्माण होण्यासाठी स्त्रीवादी शिक्षणाची गरज आणि भगिनीभावाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. स्त्रीवादातील मूलभूत सिद्धांत मांडून पितृसत्तात्मक, वांशिक आणि समलिंगी लोकांविरुद्ध असलेल्या व्यवस्थेला पर्याय निर्माण करून एका वेगळ्या भविष्यकाळाची अपेक्षा बेल यांनी व्यक्त केली आहे.

बेल यांनी ‘होमोफोबिया’ म्हणजेच समलिंगी व्यक्तींविषयी समाजात असणारी नापसंती आणि पूर्वग्रहांबद्दलदेखील मौलिक मत मांडले. कुटुंब, विविध चळवळी आणि वैचारिक चर्चाविश्व यांमध्ये अशा पूर्वग्रहांमधून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया आणि घडणाऱ्या व्यवहाराचा वेध त्यांनी घेतला. समलिंगी संबंधांविषयी प्रचलित असणाऱ्या पूर्वग्रहांमध्ये लैंगिक असमानता व वांशिक भेदभाव कसे कार्यान्वित असतात आणि सामाजिक संस्थांच्या पातळीवर अशा या पूर्वग्रहांची अभिव्यक्ती कशी होते, यावर त्यांनी मत मांडले.

बेल यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे परिवर्तनाशी बांधिलकी मानणाऱ्या शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी, वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांच्या स्वायत्तेचा अवकाश, शैक्षणिक संस्थांची पुनर्रचना अशा बाबींवर मत मांडली. त्यातून मुक्तिदायी ज्ञानव्यवहाराविषयी असणारा त्यांचा आग्रह आणि त्यासंदर्भातील त्यांची कटिबद्धता प्रकर्षाने व्यक्त होते.

बेल यांनी एकूणच स्त्रियांचे पुनरुत्पादनासंबंधी अधिकार, अंतर्गत व बाह्य सौंदर्याविषयी विचार, स्त्रीवादी वर्गसंघर्ष, जागतिक स्त्रीवाद, स्त्रिया आणि काम, वंश आणि लिंगभाव, हिंसेचे निर्मूलन, स्त्रीवादी पौरुषत्व, स्त्रीवादी पालकत्व, मुक्तीदायी विवाह आणि सहजीवन, स्त्रीवादी लैंगिक राजकारण, समलैंगित्व व स्त्रीवाद, स्त्रीवादी अध्यात्म, स्त्रीवादाची दूरदृष्टी इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सखोल मत व्यक्त केले आहे. काळ्या स्त्रीवादाच्या निमित्ताने त्यांनी आयुष्यभर मांडलेले विचार आणि दिलेला लढा भारतातील स्त्रीमुक्तीच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मौलिक कार्यासाठी त्यांना अमेरिकन बुक अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

बेल यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे. एन्ट आय ए वूमन, १९८१; फेमिनिस्ट थेअरी : फ्रॉम मार्जिन टू सेंटर, १९८४; टॉकिंग बॅक, १९८९; बिलाँगिंग – अ कल्चर ऑफ प्लेस, १९९०; यर्निंग, १९९०; ब्रेकिंग ब्रिड, १९९१; ब्लॅक लूक्स – रेस अँड रिप्रेझेंटेशन, १९९२; सिस्टर्स ऑफ द याम : ब्लॅक विमेन अँड सेल्फ रिकव्हरी, १९९३; आऊट लॉ कल्चर, १९९४; टीचिंग टू ट्रान्सग्रेस : एज्युकेशन ॲज दि प्रॅक्टिस ऑफ फ्रीडम, १९९४; आर्ट ऑन माय माइंड, १९९५; किलिंग रेज, १९९५; बोन ब्लॅक, १९९६; रिअल द रिअल, १९९६; वावुंड्स ऑफ पॅशन, १९९७; ऑल अबाऊट लव्ह : न्यू व्हीजन्स, १९९९; हॅपी टु बी नॅपी, १९९९; फेमिनिजम इज फॉर एव्हरीबडी :पॅशनेट पॉलिटिक्स, २०००; व्हेअर वुई स्टँड, २०००; बी बॉय बझ, २००१; साल्व्हेशन, २००१; कम्युनिअन, २००२; रॉक माय सोल, २००२; होममेड लव्ह, २००२; टिचिंग कम्युनिटी, २००३; वुई रिअली कुल, २००३; द विल टु चेंज, २००४; स्किन अगेन, २००४; व्हेन एंजल्स स्पिक ऑफ लव्ह, २००५; टिचिंग क्रिटिकल थिंकिंग, २००९; राइटिंग बियाँड रेस, २०१२ इत्यादी.

केंच्युकीमधील बरीया शहरातील बरीया कॉलेज येथे २०१४ मध्ये बेल यांच्या नावाने बेल हुक्स इंस्टिट्यूट स्थापन करण्यात आली. या संस्थेद्वारे त्यांच्या जीवन आणि कार्याचे दस्तऐवजीकरण करण्याला महत्त्व देण्यात येते. सोबतच भेदभाव, शोषण आणि दडपशाहीविरुद्ध बौद्धिक व्यवहाराचे विश्लेषण आणि पर्यायी मांडणी करण्यावरही भर देण्यात येतो.

बेल यांचे बरीया, केंच्युकी येथे निधन झाले.

संदर्भ : कांता, अभय व इतर (संपा.), परिवर्तनाचा वाटसरू, अंक १६, पुणे, २०२२.

समीक्षक : वंदना पलसाने